कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० मार्च, २०२१

कलिंगडाचे सरबत

 कलिंगडाचे सरबत:


साहित्य: 1 कप कलिंगडाच्या फोडी, 1 कप गार पाणी, 1 लिंबू, काळं मीठ, पुदिना पानं पाच सहा, साखर लागल्यास

कृती: कलिंगडाच्या बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये कलिंगडाच्या फोडी, एक लिंबाचा रस,  पुदिना,अर्धा टीस्पून काळं मीठ घालून फिरवा. पाणी घालून परत एकदा फिरवा. गाळून घ्या. चव बघून लागली तर साखर घाला.

सोमवार, २९ मार्च, २०२१

चिंचेचे सरबत

 चिंच गुळाचे सरबत:


साहित्य: एक कप गूळ, अर्धा कप साखर, तीन टेबलस्पून चिंचेचा कोळ, जीरं पावडर 1 टीस्पून, धने पावडर अर्धा टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, साधं मीठ चवीनुसार

कृती:  साखर आणि गुळात एक कप पाणी घालून दोन तारी पाक करा. गॅस बंद करून त्यात चिंचेचा कोळ, जीरं पावडर, काळं मीठ, धने पावडर मिक्स करा. मिश्रण गार झालं की फ्रीजमध्ये ठेवा. सरबत करताना एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात दीड टेबलस्पून तयार मिश्रण घाला. लागलं तर साधं मीठ घाला. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


टीप: चिंचेच्या आंबट पणावर गुळाचे प्रमाण कमीजास्त करा.

शनिवार, २७ मार्च, २०२१

पपई मिल्कशेक

पपई/पपया मिल्कशेक:

साहित्य: पपयाच्या फोडी 1 कप, गार दूध 2 कप, साखर 4 टीस्पून, वेलची पावडर चिमूटभर, बर्फाचे खडे

कृती: पपया साल आणि बिया काढून फोडी करा. ज्युसर जार मध्ये पपया च्या फोडी, दूध, साखर आणि वेलची पावडर एकत्र करा. मऊ होईपर्यंत फिरवा. बर्फ घालून गारेगार सर्व्ह करा.


काकडी कैरी/लिंबू सरबत:

 काकडी कैरी/लिंबू सरबत:


साहित्य: 

काकडी दोन, दोन टेबलस्पून कैरी किस किंवा दोन लिंबाचा रस, अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून जीरं पावडर, थोडीशी कोथिंबीर किंवा पुदिना, सहा टीस्पून साखर, साधं मीठ पाव टीस्पून, आलं अर्धा इंच तुकडा, पाणी 1 लीटर

कृती: काकडी सोलून तुकडे करा. एक कैरी किसून घ्या किंवा दोन लिंबाचा रस काढा. आलं सोलून घ्या. ज्युसर जार मध्ये काकडी तुकडे, कैरी किस किंवा लिंबू रस, साखर,दोन्ही मीठ, आलं, जीरं पावडर, दहा बारा पानं कोथिंबीर किंवा पुदिना घाला. एक ग्लास पाणी घाला, आणि सगळं मिश्रण बारीक होईपर्यंत फिरवा. एक भांड्यात घालून उरलेलं पाणी घाला. चव बघून काही हवं तर वाढवा. 


टीप: मला यात पुढे साखर नाही आवडत तुम्हाला हवी तर वाढवा.


गुरुवार, २५ मार्च, २०२१

कॉफी केक

 कॉफी केक:


साहित्य: 4 टीस्पून इन्स्टंट कॉफी पावडर, अर्धा कप दूध, अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर,, अर्धा कप तेल,  दीड कप मैदा, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून व्हीनिगर, चिमूटभर मीठ

कृती: कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्या. कुकरमध्ये एक वाटी मीठ पसरा. आता मध्यम गॅसवर कुकर  दहा मिनिटं प्रिहिट करायला ठेवा.

एका भांड्यात तेल पिठीसाखर, दही, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, सोडा, कॉफी पावडर एकत्र करून चाळणीने चाळून फेटलेल्या मिश्रणात मिक्स करा. एक दिशेने ढवळत रहा, हळूहळू त्यात  दूध मिक्स करा. केकच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रणात व्हीनिगर घालून मिश्रण पटापट फेटा आणि केकच्या भांड्यात ओता.  मिठावर स्टीलचा स्टॅण्ड ठेवून त्यावर केकचं भांडं ठेवा.

कुकरचं झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅसवर आणि 35 मिनिटं बारीक गॅसवर केक भाजा. 45 मिनिटांनी झाकण उघडून बघा, सूरी घालून त्याला केक चिकटला नाही की केक तयार!


1 कप = 250ml

✍🏻

मीनल सरदेशपांडे

बुधवार, २४ मार्च, २०२१

चिंच गुळाची बाजारी चटणी

 चिंचगुळाची चटणी:  ही चटणी बाहेरून आणलेल्या सामोसा कचोरी सोबत मिळते.

साहित्य:


१) एक कप (250ml) गूळ,

२) पाव कप साखर

३)२ टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ

४)अर्धा टीस्पून शेंदेलोण

५)अर्धा टीस्पून पादेलोण

६) दोन टीस्पून काश्मिरी लाल तिखट

७) अर्धा टीस्पून नेहमीचं लाल तिखट

८) अर्धा टीस्पून धने

९) अर्धा टीस्पून बडीशेप

१०) पाव टीस्पून जीरं

११) अर्धा कप पाणी

कृती:

१) गूळ, साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. 

२) धने, जीरं, बडीशेप गरम करून घ्या, गार करून भरड वाटा.

३) गूळ साखर विरघळली आणि एक तारी पाक झाला की गॅस बंद करून त्यात दोन्ही प्रकारचं मीठ, तिखट, चिंच कोळ आणि मसाला घालून ढवळा.

परत एक कढ काढा.

४) गार करत ठेवा, गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा.

५) गार झाल्यावर ही चटणी घट्ट होईल.


मंगळवार, १६ मार्च, २०२१

लिंबू पुदिना शिकंजी

 आजची उन्हाळा स्पेशल पेय रेसिपी: लिंबू पुदिना शिकंजी! 


आता बऱ्याच ठिकाणी  सरबताच्या गाडीवर हे लिहिलेलं दिसलं म्हटलं काय असते शिकंजी ते करून पाहू, घ्या बघू गारेगार!

याचा मसाला असतो, थोडं भाजून जीरं चार चमचे, दोन चमचे काळं मीठ, एक चमचा मिरी, अर्धा चमचा साधं मीठ असं एकत्र करून वाटायचं. सब्जा बी भिजत घालायचं. एक ग्लास पाणी, तीन चमचे साखर,  एक चिमूट मीठ, एक लिंबाचा रस आणि मूठभर पुदिना हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं. लागेल तेवढं पाणी घाला. प्यायला देताना सब्जा बी एक चमचा, त्यावर तयार लिंबू पुदिना सरबत त्यावर थोडा मसाला भुरभुरावून द्यायचं.