कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

आंबा पुराण:

आंबा पुराण: आला आंब्याचा सिझन आला!! आंब्याचा सिझन सुरू झाला की आम्हा कोकणातील लोकांची तोंडीलावण्याची चिंता मिटते. आंबा तिखट आणि गोड दोन्ही चवींशी अगदी प्रेमाने मिसळून जातो... अगदी कोकणी माणसासारखा! कैऱ्या यायला लागल्या की लोणचं, कांदा कैरीची चटणी, टक्कु, रायते, कोयाडे, मुरांबा, आंबे डाळ, उकडांबा: .... https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_93.html (कोयाडे)
काय करू आणि काय नाही असं होऊन जातं अगदी!
https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_41.html (उकडांबा) उन्हाळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना स्वागतासाठी पन्ह तयार होऊ लागते, तोवर हळूहळू आंबा केशरी रंग धारण करायला लागतो. मग तर रोज शाही थाट अर्थात आमरस पोळी! पायरी आंब्याचा रस म्हणजे अहाहा! हापूस आंबा तर राजाच, गार दुधात थोड्या फोडी आणि रस मिसळला की वेगळं पक्वान्न झालं! https://minalmangesh.blogspot.in/2017/04/blog-post_30.html आईस्क्रीम चा तर प्रोग्रॅम असती आमच्याकडे, आईस्क्रीम पॉट वर घरच्याघरी प्रत्येकाने फिरवून फिरवून, बाजूला खडे मीठ आणि बर्फ टाकून तयार झालेलं आईस्क्रीम जीभ जड होईपर्यंत खायचं, अगदी डिश मोजत मोजत! आणि आंब्याला पुडिंग, केक याचंही वावडं नाही... उगाच म्हणाल हा गावठी आंबा याला काय कळतंय यातलं? पण इथेही कोकणी माणसासारखा कुठेही चपखल बसतो आंबा! https://minalmangesh.blogspot.in/2017/05/blog-post_19.html आम्हा सुगरणींना तर पर्वणीच असते या दिवसात! आंब्याचे साट, आटवलेला रस, आंबोशी, आमचूर अशी साठवणीची कामं ही सुरू असतात. तरी कोणी पाहुणे आले तर की सांदण, आंब्याची कढी, आंब्याचा शिरा, केला जातोच! अगदी परसातील नारळ काढले तरी चटणी जरा कैरी टाक गं.. हे सहज होतं!
जाती तरी किती.. हापुस, पायरी, भोपळी, आंबी, तोतापुरी, मालगीस, रायवळ, पावशी... नुसत्या रायवळचे किती प्रकार... एखादा विचित्र वासाचा रायवळ बाजारात सहज खपतो... पण आमच्याकडची गुरं सुद्धा त्याला तोंड नाही लावत!
बाकी कैरीचं लोणचं कितीही करा पण बेगमीच्या लोणच्याला उतरवून काढलेला हापुसच हवा!... किती बोलू पण आता वेळ नाहीय... पन्ह्या साठी कैऱ्या शिजवल्यात

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

पहिला प्रयत्न होममेड केक:





कोथिंबीर वडी:

कोथिंबीर वडी:


कोथिंबीर जुड्या तीन, दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, एक चमचा ओवा, एक चमचा धने पावडर, एक चमचा जीरे पावडर, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, दोन चमचे तेल, मीठ

कृती:

 कोथिंबीर निवडून धुवा, चाळणीवर निथळत ठेवा. बारीक चिरा. वाटीने मोजून घ्या. माझी अगदी चेपून भरून चार वाट्या कोथिंबीर झाली. कढईत दोन चमचे तेल तापवा. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून परता आणि दोन मिनिट झाकण ठेवा. एका पातेल्यात दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, तिखट, मीठ, धने, जीरे पावडर, ओवा, हळद सगळं एकत्र करा. त्यात भज्यांच्या पिठाइतपत होईल असे पाणी घाला. गुठळी राहू देऊ नका. आता परतलेल्या कोथिंबिरीत हे तयार पीठ घालून ढवळा. मंद गॅसवर वाफ येऊ द्या. थाळ्याला तेलाचा हात लावा. मिश्रण मधेच ढवळा. दहा मिनिटात मिश्रण घट्ट होईल आणि हाताला चिकटणार नाही. आता ते मिश्रण थाळ्यात थापा.

 वड्या पाडा. गार झाल्यावर तळा किंवा तव्यावर लावा.

स्वीट कॉर्न उसळ:

स्वीट कॉर्न उसळ:
साहित्य:
 सहा कणसं, दोन कांदे, सात आठ लसूण पाकळ्या, एक चमचा कांदा लसूण मसाला, एक वाटी ओलं खोबरं, एक चमचा लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल चार चमचे

 कणसं वाफवून दाणे काढून घ्या. कांदे लांब लांब चिरा. लसूण सोलुन घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात कांदा आणि लसूण परता, तांबूस होऊ द्या. आता त्यात ओलं खोबरं घालून परता. गॅस बंद करून गार करा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक वाटा. कढईत दोन चमचे तेल घ्या. त्यात वाटप घालून परता. हळद, तिखट घाला. आता त्यात पाणी घाला. कांदा लसूण मसाला, मीठ घाला. हवा असल्यास गरम मसाला घाला. शिजलेले मक्याचे दाणे घालून उकळी काढा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

टॉमेटो सॉस: होममेड:

टॉमेटो सॉस: होममेड: साहित्य:


 एक की टॉमेटो, 10 मिरी दाणे, 5 लवंगा, दोन इंच दालचिनी तुकडा, एक कांदा, आठ लसूण पाकळ्या, एक टीस्पून लाल तिखट, दीड टीस्पून मीठ, 60 ग्रॅम साखर, एक टीस्पून व्हीनिगर, अर्धा टीस्पून सोडियम बेंझॉईट

कृती:

 टोमॅटो धुवा. दोन भाग करा. कांदा सोलून चार भाग करा. लसूण सोलून घ्या. टॉमेटो, कांदा, लसूण, मिरी, दालचिनी, लवंगा एक भांड्यात एकत्र करा. त्यात पाणी न घालता कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी घेऊन पंधरा मिनिटं वाफवा. गार होऊ द्या. गार झाल्यावर मिक्सरला फिरवून बारीक करा. स्टीलच्या मोठया पातेल्यात गाळून घ्या. त्यात साखर, मीठ, तिखट घाला. मिश्रण गॅसवर ठेवा. ढवळत रहा. मिश्रण घट्ट होत आलं की गॅस बंद करा. (टॉमेटो आंबट असल्याने पातेलं स्टीलचंच वापरा. आणि मोठं यासाठी कढताना मिश्रण बाहेर उडतं, त्याने हात भाजू नये.)
पूर्ण गार झाल्यावर त्यात एक चमचा व्हीनिगर आणि अर्धा चमचा सोडियम बेंझॉईट घालून नीट मिक्स करा. आता कोरड्या सॉसच्या बाटलीत भरा. भरताना वर थोडी जागा ठेवून गळ्याखाली भरा.
एका पातेल्यात ही भरलेली पाऊण बाटली बुडेल असे पाणी उकळत ठेवा. पाणी उकळले की तळात कुकरची जाळी ठेवून त्यावर भरलेल्या बाटल्या झाकण न लावता ठेवा. सॉस थोडा वर येईल. पाच मिनिटं ठेवून गॅस बंद करा. बाटलीला लगेच झाकण लावा. आणि पाण्यातून काढून ठेवा. यामुळे सॉस छान टिकतो.
(तिखट आणि मीठ हे प्रमाण चव घेऊन बघा, ते खारट पणावर किंवा तिखटपणा वर बदलू शकते.)
मी तीन किलो टॉमेटो चा केला, माझ्या अर्धा की चार बाटल्या सॉस झाला
.

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

व्हॅलेंटाईन डे स्पेशल केक

आजची व्हॅलेंटाईन डे स्पेशल डिश घेऊन आलेय! खरं तर केक ही काही वेगळी डिश नाही पण आपण स्वतः केलेल्या डिशची मजाच काही वेगळी असते!

घेऊन आलेय व्हॅलेंटाईन स्पेशल रोझ फ्लेवर एगलेस केक... अर्थात होममेड !!!

साहित्य: मैदा 200 ग्रॅम, दोन टीस्पून कोको पावडर, दीड टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून खायचा सोडा, 200 मिली दूध, दीड चमचा व्हीनिगर किंवा दीड चमचा लिंबाचा रस, 50 ग्रॅम पिठीसाखर, चार चमचे रोझ सिरप, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि 250 ग्राम मिल्कमेड, 100 मिली रिफाईंड सनफ्लॉवर तेल, रेड फूड कलर
मिल्कमेड साठी: अर्धा ली दूध, 200 ग्रॅम साखर ( मिल्कमेड तयार मिळतं पण मी घरी केलं)
आयसिंग साठी: 400 ग्रॅम व्हीप क्रीम
सजावटीसाठी: पायपिंग बॅग, नोझल्स, कलर, सिल्व्हर बॉल्स आणि गोल्डन बॉल्स
कृती: 1)एका कढईत अर्धा लीटर दूध आणि 200 ग्रॅम साखर घेऊन आटवावे. रबडीसारखं व्हायला हवं.
2)तयार मिल्कमेड गार करा, प्लेन नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या.
3) लिंबाचा रस काढून घ्या.
4) मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, खायचा सोडा एकत्र करून दोन वेळा चाळून घ्या.
5)मिल्कमेड, तेल, पिठीसाखर एकत्र करून फेटा.
6) 200 मिली दूध नॉर्मल टेम्परेचर चे घ्या.
7) त्यात व्हीनिगर किंवा लिंबाचा रस, 1/8 टीस्पून फूड कलर , व्हॅनिला इसेन्स, दोन टीस्पून रोझ सिरप मिसळा.
8) ओव्हन 180 डिग्री ला पाच मिनिटं प्रिहीट करा.
9) कुकरला करणार असाल तर दीड वाटी मीठ कुकरच्या तळाला पसरा, रिंग आणि शिट्टी काढून ठेवा, आणि पाच मिनिटं फुल फ्लेम वर प्रिहिट करा.
10) केक पॉट ला तूप लावून घ्या.
11) पाच नं ला फेटलेल्या मिश्रणात चाळलेला मैदा आणि दूध थोडे थोडे घालून फेटत राहा.
12) सगळे घालून मिश्रण नीट फेटून केकच्या भांड्यात ओता.
13) ओव्हनला 180 डिग्रीवर 30 मिनीटं बेक करा.
14) किंवा कुकरमध्ये मिठावर कुकरची जाळी ठेवून त्यावर केक पॉट ठेवा.
15) झाकण लावून मिडीयम फ्लेमवर 30 मिनिटं ठेवा.
16) ओव्हन किंवा कुकर 30 मिनिटांनी उघडून सुरीचे टोक केकमध्ये घालून बघा.
17) चिकटला तर परत दहा मिनिटं ठेवा.
18) तयार केक बाहेर काढून पंखा न लावता गार होऊ द्या.
19)पूर्ण गार झाल्याशिवाय आयसिंग करू नका.
20) आयसिंग साठी दोन वाट्या (400 ग्रॅम)व्हीप क्रीम घेऊन ते बिटरने 10 मिनीटं फेटावे. क्रीम नाईफवर
घेतल्यावर खाली पडताकामा नये.
21)गार झाल्यावर केक पॉट ताटात उपडे करा.


22) कटिंग नाईफ ने केकचे दोन भाग करा.
23) दोन चमचे रोझ सिरप आणि दोन चमचे पाणी एकत्र करा. बेसच्या केकवर हे पाणी सगळीकडे शिंपडा.
24) आता त्यावर क्रिम पसरा. दुसऱ्या केक पीसवर पण हे पाणी शिंपडून तो क्रीम पसरल्यावर त्यावर ठेवा.
25) आता पूर्ण केकला सगळीकडून क्रीम नीट लावा.
26) लावलेले क्रीम प्लेन करा.
27) पायपिंग बॅग मध्ये आवडीचे नोझल लावून त्यात क्रीम भरा आणि केक सजवा. कलर घालूनही तुम्ही केक सजवू शकता.
28) बरेच डेकोरेशन मटेरीयल मिळतं मी त्यातले सिल्व्हर बॉल्स आणि गोल्डन बॉल्स आणून फुलांवर ठेवले.
29) सुंदर असा केक घरच्या घरी तयार आहे.
30) केक फ्रीजमध्ये ठेवा.
31) असा स्वतः केलेला केक आणि सोबत गुलाब मग काय व्हॅलेंटाईन डे स्पेशल झालाच समजा!!
माझा तर झाला, तुम्ही काय केलंत?


बुधवार, ७ फेब्रुवारी, २०१८

घरचा शेफ मध्ये महाराष्ट्र टाइम्सला आज माझी रेसिपी आलीय


पेरुचे सरबत:

पेरुचे सरबत:
साहित्य :
 एक वाटी पेरूच्या फोडी ( एक मध्यम पेरू पिकलेला), एक लिंबू, सहा चमचे साखर एक ली पाणी, मीठ, अगदी एक चिमूट लाल तिखट
कृती:
 पेरूची वरची साल काढून फोडी कराव्यात. ज्युसर जारला पाणी, साखर आणि फोडी फिरवून घ्याव्यात. यात बिया क्रश होत नाहीत. आता मिश्रण गाळून घ्यावे. आता त्यात लिंबाचा रस, मीठ, अगदी थोडं लाल तिखट आणि उरलेले पाणी घालून सारखे करावे. गरजेनुसार लागेल ते वाढवा.
थंडगार करून सर्व्ह करा.