कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

उकड गऱ्याची भाजी:

उकड गऱ्याची भाजी:
या सिझनला उकड गऱ्यांची भाजी बरेचदा होते. घरातल्या सगळ्या मंडळींना कामाला लावून आदल्यादिवशी तयारी करून ठेवावी लागते. यासाठी फणस पण चांगल्या जाड गऱ्यांचा उतरवून काढावा लागतो. फणस पडलेला असेल तर भाजीचे गरे कडू होऊ शकतात.

विळीला तेल लावून घ्यावे. फणसाचे चार भाग करून कागदाने सगळा चीक पुसून घ्यावा. मधला जाड दांडा म्हणजे पाव आणि वरची काटे असलेली साल हणजे चारखंड काढून गऱ्यांच्या शेडी सुपात कागदावर ठेवाव्यात. आता घरातील सर्व भाजी प्रेमी मंडळींना कामाला लावावे. गऱ्यांवर असलेल्या पात्या किंवा सांगूळ काढून गरे साफ करावेत. गऱ्याचे दोन भाग करून आतील बी म्हणजे आठीळा काढाव्यात. त्यावरचे मऊ आवरण काढून त्या एका डब्यात एकत्र कराव्यात. गऱ्याचे चार किंवा सहा तुकडे करावेत.

 आता बाजूला ठेवलेल्या आठीळा थोड्या ठेचाव्यात किंवा विळीवर तुकडे करावेत. त्यावर असलेले कडक आवरण काळजीपूर्वक काढावे. एखादं जरी राहिलं तरी खाताना त्रास होतो.

ही झाली पूर्व तयारी!!
आता एक पातेल्यात पाणी गरम करावे. त्यावर राहील अशी चाळण घेऊन त्यात गरे ठेवावेत आणि वर झाकण ठेवून छान वाफ काढावी. गरे किती आहेत त्यावर वेळ अवलंबून! तोपर्यंत आठीळा पाणी मीठ आणि हळद घालून कुकरला शिजवून घ्याव्यात. दहा मिनीटांनी गरे शिजलेत का पहावे. गार करायला ठेवावेत. कढईत एक वाटी तेल तापवावे. उगाच वाटीभर तेल वाचून दचकू नका. ही भाजी अशीच करायची असते. तेल तापलं की त्यात दहा बारा सांडगी मिरच्या तळून घ्याव्यात. एक चमचा मेथी, पाच सहा सुक्या मिरच्या, मोहोरी, एक चमचा हिंग हळद आणि लाल तिखट अशी फोडणी करावी. त्यात वाफवलेले गरे घालून परतावेत. त्यात मीठ, गूळ घालावा. तळलेल्या सांडगी मिरच्याची पावडर करून घ्यावी. त्यातली एक चमचा भाजीत घालावी. आता शिजलेल्या आठीळा घालून नीट ढवळावी. पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. परत अर्धी वाटी तेलाची फोडणी करून एक भांड्यात काढून ठेवावी. खाताना भाजीवर सांडगी मिरची, तेलाची फोडणी घेऊन नुसती किंवा पोळी भाकरी बरोबर खावी.
मला तर ही भाजी नुसतीच आवडते फक्त वर ताजे ओलं खोबरं घातलं की नाश्त्याला मस्त डिश तयार!!
आता मे महिन्यात एकदाच येणाऱ्या या पाहुण्याचं स्वागत करताना उगाच तेल किती ... असे अभद्र विचार आणू नयेत... पाहुणे रागवायचे!
टीप: फणसाचे गरे मोजून त्यात घालायच्या वस्तू टीस्पून मध्ये बसवणं अवघड आहे... माझं प्रमाण पंधरा माणसांसाठी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा