कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

ब्रेड रोल

 ब्रेड रोल:  


अर्धा की बटाटे, अर्धा टीस्पून मिरची वाटून, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून लसूण पेस्ट, मीठ, फोडणी साठी तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट पाव टीस्पून, कोथिंबीर पाव कप, प चिरलेली, तळायला तेल, एक स्लाईस ब्रेड पॅक, पाणी


कृती: शिजलेले बटाटे सोलून  बारीक फोडी करा. आलं, लसूण मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ त्या फोडीना नीट लावून घ्या. कढईत तेल तापत ठेवा,  मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. तिखट घाला. गॅस बारीक करून त्यात तयार फोडी घालून परता. पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवा. चव बघून तिखट मीठ वाढवा. 

भाजी गार होऊ द्या. 

 भाजीचे  मुटक्यासारखे आकार करून घ्या


. स्लाईसच्या कडा कापून घ्या. 

पसरट भांड्यात पाणी घ्या. त्यात स्लाईस बुडवून त्यातलं पाणी हातावर प्रेस करून काढून टाका. त्यात मुटका ठेवून दाबून लंबगोल आकार द्या.

कढईत तेल तापत ठेवा. त्यात तयार रोल सोडून तळून घ्या. सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.


✍🏻  मीनल सरदेशपांडे

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

मटार पनीर

 मटार पनीर: 


साहित्य: एक कप मटार, 200 ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा, 3 टॉमेटो, 7/8 लसूण पाकळ्या, 7/8 काजूगर, एक इंच आलं तुकडा, एक टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून लाल तिखट नेहमीचं, एक टीस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून  सायीचं दही, तेल दोन टेबलस्पून, जीरं पाव टीस्पून, मीठ चवीनुसार, साखर एक टीस्पून

कृती: मटार थोडं मीठ आणि पाणी घालून वाफवून घ्या, शिजले पाहिजेत पण मोडायला नको. 

पनीर तुकडे करून घ्यावे. कांदा, टॉमेटो लांब चिरून घ्यावे. आलं लसूण सोलून घ्यावे, आल्याचे तुकडे करावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात आधी काजूगर तळून बाजूला काढून घ्यावे. आता त्यात कांदा आलं लसूण घालून परतावे. कांदा मऊ झाला की त्यात टॉमेटो घालून परतावे. टॉमेटो मऊ झाला की त्यात गरम मसाला घालून मिश्रण गार करत ठेवावे. मिक्सर जार मध्ये आधी काजूगर फिरवून घ्यावे. त्यातच तयार कांदा टॉमेटो मिश्रण घालून थोडे पाणी घालून गुळगुळीत वाटावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात जीरं घालावं ते तडतडल्यावर वाटप घालावे. तेल सुटेपर्यंत परतत रहावे.


पनिरला थोडं मीठ आणि तिखट लावून ठेवावे. मसाला छान परतला गेला की त्यात काश्मिरी लाल तिखट, नेहमीचं लाल तिखट, मीठ घालून मिक्स करावे. सायीचं दही घालावे. लक्षात ठेवा मीठ आपण मटार  शिजताना पण घातलंय आणि पनिरला पण लावलंय. थोडं साधारण अर्धा कप पाणी घालावे. शिजलेले मटार आणि मॅरीनेट केलेलं पनीर घालून एक उकळी काढावी. साखर घालावी. चव बघून लागेल ते वाढवावे. 

गरमागरम मटार पनीर पोळी, पुरी, नान बरोबर सर्व्ह करावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

चकली कृती: भाजणी सहित

 चकली:


 भाजणी:


साहित्य: 1 की तांदूळ, अर्धा की चणाडाळ, पाव की उडीद डाळ, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, अर्धी वाटी जीरे, धने एक वाटी

कृती: तांदूळ धुवून सावलीत वाळवावेत. तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य एकेक करून मध्यम गॅसवर भाजावे. खूप जास्त  भाजू नये. सर्व गोष्टी एकत्र करून बारीक दळावे.


चकली साठी साहित्य:  भाजणी पीठ 1 की, दोन कप पाणी, अर्धा कप तेल, 3 टेबलस्पून तिखट, 5 टीस्पून मीठ, 2 टीस्पून ओवा किंचित भरडून, 2 टीस्पून पांढरे तीळ, तळणीसाठी तेल

कृती: पाणी आणि तेल एका पातेल्यात एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ, ओवा घालून उकळी काढा.  उकळी आली की गॅस बंद करून त्यात भाजणी आणि तीळ मिक्स करून झाकून ठेवा. दहा मिनिटांनी पीठ लागेल तसं पाणी घेऊन मळा, फार सैल नको. मी फूड प्रोसेसर मध्ये मळून घेते.

तयार गोळा सोऱ्यात भरून चकली जाड प्लॅस्टिक पिशवीवर पाडा. कढईत तेल गरम करून घ्या. मध्यम आचेवर चकल्या तळा. 

मस्त कुरकुरीत चकल्या तयार आहेत.

 टीप: मी हळद नाही घालत तुम्ही हवी तर घाला.

एक किलोत 60 ते 70 चकल्या होतात.

चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं की चकल्या छान होतात. 

गॅस सतत लहान मोठा करत बसू नका. त्यामुळे तेलाचा ताव कमी जास्त होतो आणि चकली बिघडते.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

लाल माठ पराठा

 लाल माठ पराठा:


साहित्य: पाच वाट्या कणिक, अर्धी वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन, लाल तिखट 1 टीस्पून, मीठ ,हळद पाव टीस्पून, दोन टेबलस्पून तेल,  लाल माठ एक जुडी, (शिजून एक कप होईल) अर्धा चमचा लसूण पेस्ट

कृती: लाल माठ निवडून स्वच्छ धुवून घ्यावा. बारीक चिरावा, शिजवून घ्यावा. कणिक, तांदूळ पिठी, बेसन एकत्र करावं. त्यात तिखट, मीठ, हळद घालावी. तेल घालावे. शिजलेला माठ आणि लसूण पेस्ट मिक्स करून , चव बघून पीठ घट्ट मळावे.


या पिठाचे पोळीसारखे लाटून पराठे करा किंवा पुऱ्या करा.

दोन्ही छान लागते. लाल माठ पराठा भाजताना मध्यम आचेवर भाजा, मुळात लाल रंग असल्याने पटकन काळे डाग पडायची शक्यता असते.

चटणी, सॉस, लोणी कशाही बरोबर मस्तच लागतात. त्यानिमित्ताने लाल माठ खाल्ला जातो!!

मिनल सरदेशपांडे

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

पातळ अळू

 पातळ अळू किंवा अळवाचं फतफतं:




साहित्य: 

एक कप शिजलेलं अळू, अर्धा कप शिजलेली देठी, दोन टेबलस्पून डाळीचं पीठ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून सांडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, मीठ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, आवडीनुसार काजूगर, एक टेबलस्पून चणाडाळ, पाच सहा सुक्या मिरच्या, पाव टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाणी दीड लीटर, एक टेबलस्पून ओलं खोबरं, तेल एक टेबलस्पून

कृती:  शेंगदाणे आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा.अळूची पानं शिरा काढून धुवून घ्या. चिरून शिजवून घ्या. देठी सोलून चिरून वेगळी शिजत ठेवा. गार होऊ द्या. भिजलेले शेंगदाणे आणि चणाडाळ शिजवून घ्या.  काजूगर हवे असतील तर ते गरम पाण्यात भिजत घाला. अळूची पानं मिक्सरला थोडं फिरवा( गरज असेल तर). चिंचेचा कोळ काढून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. दोन सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवा. तेलात मोहोरी घाला. तडतडली की मेथी दाणे, लाल मिरच्या घाला. हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. आता फिरवून घेतलेली पानं आणि शिजलेली देठी घालून परता. एक लिटर पाणी घ्या. त्यात डाळीचं पीठ नीट मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका. हे पाणी कढईत घाला. चवीनुसार मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घाला. सांडगी मिरची मिक्सरमधून बारीक करून ती घाला. गोडा मसाला घाला. उरलेलं पाणी अंदाज बघून घाला.  शिजलेले डाळ दाणे घाला.  भिजलेले काजूगर घाला. ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून लागेल ते वाढवा.  पातळ अळू तयार! 



वरून  सुक्या मिरच्यांची फोडणी दिली तर अजून खमंग लागते.

✍🏻मीनल सरदेशपांडे