कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

मटार पनीर

 मटार पनीर: 


साहित्य: एक कप मटार, 200 ग्रॅम पनीर, एक मोठा कांदा, 3 टॉमेटो, 7/8 लसूण पाकळ्या, 7/8 काजूगर, एक इंच आलं तुकडा, एक टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून लाल तिखट नेहमीचं, एक टीस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून  सायीचं दही, तेल दोन टेबलस्पून, जीरं पाव टीस्पून, मीठ चवीनुसार, साखर एक टीस्पून

कृती: मटार थोडं मीठ आणि पाणी घालून वाफवून घ्या, शिजले पाहिजेत पण मोडायला नको. 

पनीर तुकडे करून घ्यावे. कांदा, टॉमेटो लांब चिरून घ्यावे. आलं लसूण सोलून घ्यावे, आल्याचे तुकडे करावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात आधी काजूगर तळून बाजूला काढून घ्यावे. आता त्यात कांदा आलं लसूण घालून परतावे. कांदा मऊ झाला की त्यात टॉमेटो घालून परतावे. टॉमेटो मऊ झाला की त्यात गरम मसाला घालून मिश्रण गार करत ठेवावे. मिक्सर जार मध्ये आधी काजूगर फिरवून घ्यावे. त्यातच तयार कांदा टॉमेटो मिश्रण घालून थोडे पाणी घालून गुळगुळीत वाटावे. कढईत एक टेबलस्पून तेल घालून त्यात जीरं घालावं ते तडतडल्यावर वाटप घालावे. तेल सुटेपर्यंत परतत रहावे.


पनिरला थोडं मीठ आणि तिखट लावून ठेवावे. मसाला छान परतला गेला की त्यात काश्मिरी लाल तिखट, नेहमीचं लाल तिखट, मीठ घालून मिक्स करावे. सायीचं दही घालावे. लक्षात ठेवा मीठ आपण मटार  शिजताना पण घातलंय आणि पनिरला पण लावलंय. थोडं साधारण अर्धा कप पाणी घालावे. शिजलेले मटार आणि मॅरीनेट केलेलं पनीर घालून एक उकळी काढावी. साखर घालावी. चव बघून लागेल ते वाढवावे. 

गरमागरम मटार पनीर पोळी, पुरी, नान बरोबर सर्व्ह करावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा