कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

पातळ अळू

 पातळ अळू किंवा अळवाचं फतफतं:




साहित्य: 

एक कप शिजलेलं अळू, अर्धा कप शिजलेली देठी, दोन टेबलस्पून डाळीचं पीठ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून सांडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, मीठ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, आवडीनुसार काजूगर, एक टेबलस्पून चणाडाळ, पाच सहा सुक्या मिरच्या, पाव टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाणी दीड लीटर, एक टेबलस्पून ओलं खोबरं, तेल एक टेबलस्पून

कृती:  शेंगदाणे आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा.अळूची पानं शिरा काढून धुवून घ्या. चिरून शिजवून घ्या. देठी सोलून चिरून वेगळी शिजत ठेवा. गार होऊ द्या. भिजलेले शेंगदाणे आणि चणाडाळ शिजवून घ्या.  काजूगर हवे असतील तर ते गरम पाण्यात भिजत घाला. अळूची पानं मिक्सरला थोडं फिरवा( गरज असेल तर). चिंचेचा कोळ काढून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. दोन सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवा. तेलात मोहोरी घाला. तडतडली की मेथी दाणे, लाल मिरच्या घाला. हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. आता फिरवून घेतलेली पानं आणि शिजलेली देठी घालून परता. एक लिटर पाणी घ्या. त्यात डाळीचं पीठ नीट मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका. हे पाणी कढईत घाला. चवीनुसार मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घाला. सांडगी मिरची मिक्सरमधून बारीक करून ती घाला. गोडा मसाला घाला. उरलेलं पाणी अंदाज बघून घाला.  शिजलेले डाळ दाणे घाला.  भिजलेले काजूगर घाला. ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून लागेल ते वाढवा.  पातळ अळू तयार! 



वरून  सुक्या मिरच्यांची फोडणी दिली तर अजून खमंग लागते.

✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा