कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

गवार मुठीया भाजी

 गवार मुठिया भाजी:


घरची ओव्याची पानं भरपूर झाली होती म्हणून त्याचं काहीतरी करून बघायचं होतं. पिठल्यात, कढीत छान लागतातच. भजी तर आवडती! आज थोडा वेगळा प्रकार.

साहित्य: गवार अर्धा किलो, 

एक वाटी दूध थोडं पाणी, तिखट मीठ,साखर  आणि खोबरं कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.

मुठिया साहित्य: एक वाटी ओव्याची चिरलेली पानं, एक वाटी कोथिंबीर, पाऊण वाटी कणीक किंवा जोंधळे पीठ किंवा दोन्ही मिक्स, दोन चमचे बेसन, तीळ दोन चमचे, तिखट एक चमचा, मीठ, किंचित सोडा, एक चमचा तेल, हिंग चिमूटभर, एक चमचा रवा

कृती: गवार मोडून धुवून त्यात एक वाटी दूध आणि थोडं पाणी घालून शिजवून घ्या.. पण गरगट

नको.

ओव्याची पानं धुवून चिरून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या.  दोन्हीही एकत्र करून त्यात अंदाजे मीठ घालून चुरून घ्या. त्यात सगळी पीठे, रवा, तीळ, तिखट, सोडा, हिंग, तेल घालून शक्यतो त्या पाल्याच्या ओलाव्यात पीठ भिजवा. लागलं तर किंचित पाणी घ्या. चव बघा, तिखट, मीठ व्यवस्थित असेल तर तळल्यावर चव राहते.

छोटे छोटे गोळे करून मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या. 


आता भाजीसाठी कढई तापत ठेवा. तेल घाला. तापलं की मोहोरी, हळद, हिंग आणि थोडं लाल तिखट घाला. त्यात वाफवलेली गवार घाला. त्याचं पाणी नको.

त्यात मीठ, साखर घालून दोन मिनिटं परता. आता तळलेले मुठिया घालून परता.

खोबरं कोथिंबीर घालून सर्व्ह करा.


टीप: मुठिया करून वाफवून पण घालता येतात ती रेसिपी मी आधी दिलीय.

दुसरी कोणतीही पालेभाजी घेऊ शकता.

ओव्याची पानं आहेत म्हणून मी ओवा नाही घातला पण नाहीतर मुठीया करताना ओवा घाला.


गवार दुधात शिजवली की उग्रपणा कमी होतो इति सासूबाई. 

दूध छान पनीर होऊन राहतं, पाणी काढून टाका किंवा भाजीतच

आटवा. या भाजीत ओवा फोडणीत पण छान लागतो


✍️मीनल सरदेशपांडे

चिकू कलाकंद

 चिकू कलाकंद:



 चांगला लागतो. आमच्या बाबांनी घराजवळ दोन चिकुची कलमं लावलीत. त्यामुळे भरपूर होतात.

यावेळी घरात खाणारी मंडळी कमी होती देऊन घेऊन सुध्दा एकदम बरेच तयार झाले.

साहित्य: दीड वाटी चिकुचा गर, एक वाटी पनीर, एक वाटी खवा, एक वाटी साखर, वेलची पावडर, काजू, बदाम काप सजावटीसाठी.


कृती: चिकूची साल आणि बी काढून फोडी मोजून कढईत घ्या. हाताने किंचित कुस्करून घ्या अगदी गुळगुळीत नको. तुकडे रहायला हवेत.

खवा, पनीर दोन्हीही मोकळं करून घ्या. चिकू मध्ये पनीर, खवा आणि साखर घालून सगळं मिश्रण नीट मिक्स करा. मंद आचेवर ढवळत रहा. फार सैल होत नाही.


१५ मिनिटात गोळा व्हायला लागतो. वेलची पावडर घालून तूप लावलेल्या ताटात थापा. वरून काप लावून मार्किंग करून ठेवा.


गार झाल्यावर  बर्फी कापून अलगद डब्यात ठेवा.

अतिशय सुंदर चिकुची चव येते.


टीप: साखर सम्राट मुळात चिकू चालणार नाही त्यामुळे हे एखादं खायला चालेल.


चिकू गोड असतो तरीही साखर का तर पनीर आणि खवा याच्या निम्मे इतकीच साखर आहे ती तेवढी लागतेच नाहीतर वडी पडणार नाही.


अजून कमी हवी तर पाऊण वाटी घ्या एक न घेता. पण मी दिलेल्या प्रमाणात गोड गोड होत नाही.

कलाकंद एकदम वडीसारखा नसतोच त्यामुळे खूप वेळ ठेवून घट्ट नका करू.

हे गावठी चिकू किंचित रवाळ असतात त्याने अजून मजा येते 

✍️मीनल सरदेशपांडे

भोपळ्याचे घारगे

 भोपळ्याचे घारगे:




साहित्य: भोपळ्याचा कीस दोन वाट्या घट्ट भरून, गुळ बारीक चिरून दोन वाट्या, तांदूळ पिठी दोन वाट्या, साजूक तूप दोन चमचे, चवीपुरतं मीठ, पाव वाटी ओलं खोबरं, किंचित हळद, तळणीसाठी तेल


 कृती: भोपळ्याचा कीस वाटीत दाबून घट्ट भरून  मोजून घ्या. कढईत दोन चमचे तूप घालून त्यात हा किस परतून घ्या. परतून किंचित मऊ झाला की त्यात गूळ घाला. मीठ हळद ओल खोबरं घालून गूळ विरघळेपर्यंत मंद गॅसवर ठेवा. गूळ विरघळला की त्यात तांदूळ पिठी मिक्स करा आता व्यवस्थित ढवळून कढईवर झाकण ठेवा दोन मिनिट वाफ येऊ द्या. आता ही तयार झालेली आट झाकून गार होऊ द्या. गार झाल्यावर गोळे करून थापून मध्यम गॅसवर तळा. थापताना खसखस लावली तर अजून छान लागते बघा करून!




✍️ मीनल सरदेशपांडे

लाल भोपळा मखाणे खीर

 लाल भोपळा मखाणें खीर:




लाल भोपळ्याचे गोड आणि तिखट अनेक प्रकार होतात.

मी एकदा हलवा पण करून पाहिला होता पण मला त्यात शिजलेल्या भोपळ्याचा तो एक जो वास येतो तो नाही आवडला.

पण खीर मात्र मस्त लागते.


साहित्य: भोपळ्याचा कीस एक वाटी, दूध १ लीटर, तूप १ चमचा, साखर, जायफळ पावडर, केशर, बदाम काप, मखाणे एक वाटी

कृती: कोरड्या कढईत मखाणे भाजून बाजूला ठेवा. कढईत तूप घाला. त्यात भोपळ्याचा कीस घालून परता.

कीस शिजला की त्यात सायीसह

किंवा न तापवता एक लीटर दूध घाला. चवीप्रमाणे साखर घाला. गरम केलेले मखाणे पावडर करून मिसळा. बदाम काप, केशर घालून मंद आचेवर उकळू द्या. जायफळ खरं तर दुधात उगाळून लावलं तर स्वाद जास्त छान येतो.

किंवा मग किसून घाला.

खीर तयार आहे!


टीप: मखाणे अख्खे पण घालता येतात पण पावडर घातली की खीर पण दाट होते. ते नसतील तर थोडी दूध पावडर लावली तरीही खीर दाट होते.

किंवा वेळ असेल तर छान आटवून तर काय अप्रतिम होतेच.

हा रंग आलाय तो भोपळा परतल्यावर आलाय आणि केशर.

भोपळ्या  ऐवजी गाजर पण छान होते खीर.

✍️ मीनल सरदेशपांडे