कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

गवार मुठीया भाजी

 गवार मुठिया भाजी:


घरची ओव्याची पानं भरपूर झाली होती म्हणून त्याचं काहीतरी करून बघायचं होतं. पिठल्यात, कढीत छान लागतातच. भजी तर आवडती! आज थोडा वेगळा प्रकार.

साहित्य: गवार अर्धा किलो, 

एक वाटी दूध थोडं पाणी, तिखट मीठ,साखर  आणि खोबरं कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.

मुठिया साहित्य: एक वाटी ओव्याची चिरलेली पानं, एक वाटी कोथिंबीर, पाऊण वाटी कणीक किंवा जोंधळे पीठ किंवा दोन्ही मिक्स, दोन चमचे बेसन, तीळ दोन चमचे, तिखट एक चमचा, मीठ, किंचित सोडा, एक चमचा तेल, हिंग चिमूटभर, एक चमचा रवा

कृती: गवार मोडून धुवून त्यात एक वाटी दूध आणि थोडं पाणी घालून शिजवून घ्या.. पण गरगट

नको.

ओव्याची पानं धुवून चिरून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या.  दोन्हीही एकत्र करून त्यात अंदाजे मीठ घालून चुरून घ्या. त्यात सगळी पीठे, रवा, तीळ, तिखट, सोडा, हिंग, तेल घालून शक्यतो त्या पाल्याच्या ओलाव्यात पीठ भिजवा. लागलं तर किंचित पाणी घ्या. चव बघा, तिखट, मीठ व्यवस्थित असेल तर तळल्यावर चव राहते.

छोटे छोटे गोळे करून मध्यम ते मंद आचेवर तळून घ्या. 


आता भाजीसाठी कढई तापत ठेवा. तेल घाला. तापलं की मोहोरी, हळद, हिंग आणि थोडं लाल तिखट घाला. त्यात वाफवलेली गवार घाला. त्याचं पाणी नको.

त्यात मीठ, साखर घालून दोन मिनिटं परता. आता तळलेले मुठिया घालून परता.

खोबरं कोथिंबीर घालून सर्व्ह करा.


टीप: मुठिया करून वाफवून पण घालता येतात ती रेसिपी मी आधी दिलीय.

दुसरी कोणतीही पालेभाजी घेऊ शकता.

ओव्याची पानं आहेत म्हणून मी ओवा नाही घातला पण नाहीतर मुठीया करताना ओवा घाला.


गवार दुधात शिजवली की उग्रपणा कमी होतो इति सासूबाई. 

दूध छान पनीर होऊन राहतं, पाणी काढून टाका किंवा भाजीतच

आटवा. या भाजीत ओवा फोडणीत पण छान लागतो


✍️मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा