कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, २१ मार्च, २०१८

दह्यातील उकडांबा:

आज लोणच्यासाठी बरण्या धुवून ठेवायच्या म्हणून बघायला गेले तेव्हा लक्षात आलं मिठात आंबे राहिलेत दोन अजून.. म्हटलं चला करून टाकू तोंडीलावणं!

साहित्य: मिठातले उकडांबे दोन, एक वाटी दही, दोन चमचे साखर, दोन ओल्या मिरच्या, चिमुटभर हिंग, पाव चमचा जीरं, तीन चमचे तूप, कोथिंबीर बारीक चिरलेली, मेतकूट दोन चमचे( ऐच्छिक)

कृती: मिठातला उकडांबा
उकडांबा करण्यासाठी वेगळे खास रायवळ आंबे असतात.... नाहीतर कोणतेही छोटे रायवळ तयार आंबे दहा बारा घ्या. पण हे आंबे झाडावरून उतरून काढलेले हवेत, पडलेले टिकत नाहीत. आंबे स्वच्छ धुवा. देठाकडचा चीक जाऊ द्या. पातेल्यात पाणी उकळून त्यात घालून दहा मिनिटं उकळावेत. पाण्यातून चाळणीवर काढून गार होऊ द्यावेत. आंबे पूर्ण गार व्हायला हवेत. आता देठाकडून साल थोडी सोडवून ठेवा. एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत आंबे बुडतील इतपत पाणी घ्या. पाणी खारट लागेल इतपत मीठ घाला. आता पूर्ण गार झालेले आंबे पाण्यात बुडवून झाकण लावा. हे आंबे वर्षभर टिकतात. त्यावर पांढरा साक धरतो सायीसारखा तो अधून मधून काढून टाकायचा. माझी आजी मोठी चिनीमातीची बरणी भरून करायची हे आंबे आणि त्याच्या तोंडाला स्वच्छ पांढरं कापड घट्ट बांधायची.. दादरा बांधणं म्हणतात त्याला! आणि मग कोणी आलं गेलं हे आंबे द्यायची! विशेषत: श्रावण महिन्यात तोंडीलावणं म्हणून हे आंबे काढले जायचे!

कृती: दह्यातील उकडांबा:
हा मिठातला आंबा काढून घेऊन त्याच साल सोलावं.. आतील गर काढून घ्यावा. नीट कुस्करून घ्यावा. त्यात दही साखर मेतकूट आणि कोथिंबीर घालावी. तूपाची जीरं, मिरच्या, हिंग घालून फोडणी करावी. ही फोडणी या उकडांब्याला द्यावी. छान मिक्स करावे. मीठ घालावे लागत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा