कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २० जानेवारी, २०१९

मासवडी

मासवडी:
साहित्य: सारण: पाऊण वाटी खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी तीळ, पाव वाटी खसखस, दोन कांदे, पाव वाटी लसूण, कोथिंबीर चिरून अर्धी वाटी, तिखट एक चमचा, गरम मसाला एक चमचा, मीठ
बाहेरचं आवरण: एक वाटी बेसन पीठ, एक चमचा मैदा, दीड वाटी पाणी, अर्धा चमचा तिखट, मीठ, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, दोन चमचे तेल, जाड प्लास्टिक पिशवी
कृती: खोबरं, तीळ, खसखस वेगवेगळे भाजून घ्या. कांदा बारीक चिरा. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. कढईत एक चमचा तेल घालून त्यात कांदा आणि लसूण सोनेरी रंगावर परतून घ्या. खोबरं,  तीळ, खसखस मिक्सरला भरडसर वाटून घ्या. कांदा, लसूण मिक्सरला फिरवा. तीळ, खोबरं, खसखस आणि कांदा, लसूण वाटप एकत्र करा, त्यात थोडी कोथिंबीर, मीठ, तिखट, गरम मसाला सगळं घालून नीट मिक्स करा. याची चव सणसणीत हवी. हे सारण दोन वाटी बेसनाला पुरते.
आता एका भांड्यात एक वाटी बेसन, मैदा चमचाभर, तिखट,मीठ आणि दीड वाटी पाणी एकत्र करा. बेसनाची गुठळी मोडून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, ओवा, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात तयार पीठ घालून मंद गॅसवर ढवळत रहा. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढा. तेवढ्यात पिशवीच्या दोन बाजू कापून घ्या. एका बाजूवर कोथिंबीर पसरा. बेसनाला वाफ आली, घट्ट गोळा झाला की गॅस बंद करा. बेसन थोडं गार होऊ द्या. आता कोथिंबीर लावलेल्या भागावर तो गोळा ठेवा. पिशवीचा दुसरा भाग त्यावर ठेवून लाटण्याने पटापट लाटून घ्या.
पिशवीचा वरचा भाग बाजूला करा. लाटलेल्या बेसनावर सारण पसरा.
एका बाजूने पिशवी सोडवत गुंडाळून रोल करा.
सुरीने वड्या कापा.

मस्त साईड डिश तयार आहे! चव एकदम चमचमीत!
✍🏻 मिनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा