कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

मिश्र पिठाची धिरडी


साहित्यः  मिश्र पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर,  पाणी, तेल.

मिश्र पीठ : ३ वाट्या तांदूळ, ३ वाट्या चणा डाळ, एक वाटी उडीद डाळ, एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी जोंधळा, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी तूर डाळ, 1टेबलस्पून मेथी, 1 टेबलस्पून धने, अर्धा टेबलस्पून जीरं हे सर्व एकत्र करून दळून आणावे.


कृती:
  आपल्याला लागणार असेल तेवढे त्यार पीठ घ्या. या पिठात तिखट, मीठ चवीनुसार घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.  पाणी घालून डोश्यासारखे पीठ भिजवा. तवा तापत ठेवा. तेल पसरा. आता तयार मिश्रण गोल पसरवा. एक मिनिट झाकण ठेवा. झाकण काढून धिरडे परता. दुसरी बाजू भाजून घ्या. गरमागरम धिरडे सॉस, लोणी, चटणी बरोबर खायला द्या.
 या पिठात मेथी पाने, पालक, कांदा, टॉमेटो असे काहीही घालून वेगवेगळ्या चवीची धिरडी बनवू शकता.

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

करवंद सरबत

उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.


कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या.

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

लाल भोपळ्याचे सार/ सूप

साहित्य:
 लाल भोपळा पाव कि, दोन मोठे टॉमेटो, एक मोठा कांदा, पाच सहा लसूण पाकळ्या, सहासात मिरी दाणे, अगदी छोटा दालचिनीचा तुकडा, लाल तिखट पाव चमचा, तूप दोन चमचे किंवा लोणी, जीरं पाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ, साखर, कढिलिंबाची पाच सहा पाने





असे कराः
भोपळ्याची पाठ काढून फोडी करा. टॉमेटोचे चार भाग करा. कांदा सोलून त्याचे चार भाग करा. यात लसूण पाकळ्या, मिरी, दालचिनी आणि थोडे पाणी घालून वाफवून घ्या. गार करा. मिक्सरला फिरवून गाळून घ्या.
आता चवीनुसार मीठ, साखर , लाल तिखट घाला. गरजेनुसार पाणी घाला. जर महाराष्ट्रीयन सार करायचं तर तूपाची जीरं, हिंग, कढिलिंबाची चरचरीत फोडणी द्या. सारात लाल तिखटाऐवजी मिरचीपण वापरू शकता.
सूप हवं असेल तर फक्त लोणी घाला आणि गरमागरम प्या.

सोमवार, २० मार्च, २०१७

पुदिनावाली मुगाची आमटी

पुदिनावाली मुगाची आमटी
साहित्य: एक वाटी सालासह किंवा साधी मूगडाळ, ७/८ लसूण पाकळ्या, चार ओल्या मिरच्या, अर्धी वाटी ओलं खोबरं, मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबीर, पाव चमचा जीरं, पाव चमचा मोहोरी, मीठ, एक लिंबू, दोन चमचे साखर, फोडणीसाठी चार चमचे तेल, हळद.


अशी कराः डाळ धुवा आणि मऊ शिजवून घ्या. पुदिना, लसूण पाकळ्या, मिरच्या, खोबरं, कोथिंबीर बारीक वाटून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. जीरं, मोहोरी, हळद घाला. शिजलेली डाळ घोटून फोडणीत घाला. वाटप घाला. गरजेनुसार पाणी घाला. मीठ, साखर घाला. लिंबू पिळा. छान उकळी काढा. मी कढिलिंबाची पाने घातलीत.
गरमागरम आमटी आणि भात अहाहा!!!

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

कोबीची पचडी

साहित्यः
 एक मध्यम कोबीचा गड्डा, एक डाळींब लहान, एक लिंबू, ओल्या मिरच्या चार, कोथिंबीर, मीठ, साखर, दोन चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद.
कृती:
 कोबी धुवा आणि किसून किंवा फूडप्रोसेसरला आपल्या आवडीनुसार जाड बारीक करा. डाळींब सोलून घ्या. कोबीच्या किसावर लिंबू पिळा, एक चमचा साखर, मीठ घाला. व्यवस्थित एकत्र करा. तेल तापत ठेवा. मोहोरी पाव चमचा घाला. तडतडली की मिरच्यांचे तुकडे घाला. गॅस बंद करून हिंग हळद घाला. तयार फोडणी कोबीच्या मिश्रणावर घाला. नीट एकत्र करा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. आता डाळींब दाणे घालून हलक्या हाताने मिसळा.
आमच्याकडे थोडी आंबट आवडते पचडी, मी दाण्याचे कूट घालत नाही.




शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

आल्याची वडी


साहित्यः
आलं किसून एक वाटी, साखर एक वाटी, सायीसह दूध किंवा नुसते दूध अर्धी वाटी

कृती:
आलं स्वच्छ धुवावे. सालं काढून किसून घ्यावे.किसल्यावर मिक्सरला फिरवावे. आधी मिक्सरला फिरवले तर दोर रहातात. जेवढा आल्याचा कीस तेवढी साखर आणि त्याच्या निम्मे सायीसकट दूध घ्यावे. मिश्रण कढईत एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे.
गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटाला तूपाचा हात लावून त्यात मिश्रण थापावे. वड्या पाडाव्यात.
साखरेचे प्रमाण आल्याच्या तिखटपणावर वाढवावे. मी या वड्या थोड्या जास्त सुकवल्यात कारण ओल्या राहिल्या तर जास्त टिकत नाहीत. सायीसह दूध वापरल्याने आल्याचा तिखटपणा कमी येतो.

सालासह मुगाचे लाडू

साहित्यः
 दोन वाट्या सालासह हिरवे मूग, एक वाटी डाळं, एक वाटी पोहे, एक वाटी सुकं खोबरं, पिठीसखर दोन वाट्या, साजूक तूप एक वाटी, बेदाणे, वेलची पावडर.


कृती:
 मूग मंद आचेवर तांबूस भाजून घ्यावेत. भाजलेले मूग आणि डाळं एकत्र रवाळ दळून आणावं. सुकंखोबरं किसून भाजावे. कढईत पोहे घालून तेही भाजून घ्यावेत. आता कढईत तूप घ्यावे. तूप आधी थोडे वगळावे, लागेल तसे घ्यावे. तूपात भाजलेले मूगाचे पीठ घेऊन मंद आचेवर भाजावे. तांबूस खमंग भाजावे. गार करायला ठेवावे. भाजलेले पोहे मिक्सरला रवाळ दळावे. हे पीठ भाजलेल्या मूगाच्या पिठात मिसळावे. पिठीसाखर मिसळा. वेलची पावडर मिसळावी. गरज असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे. बेदाणे लावून लाडू वळावेत.