कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

दुधी हलवा

 दुधी हलवा


साहित्य: एक की दुधी भोपळा, 350 ग्रॅम खवा, एक ते सव्वा वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, तूप तीन चमचे, सजावटीसाठी बदाम काप, काजूगर, बेदाणे

कृती: दुधी स्वच्छ धुवून किसून घ्यावा. कढईत तूप तापत ठेवावे. दुधीचा किस घालून तुपावर परतावा. दहा पंधरा मिनीटं परतला की त्याचा रंग बदलतो. खव्यातील गुठळी मोडून घ्यावी. परतलेल्या किसात साखर, खवा मिक्स करून पुन्हा मंद गॅसवर परतावे. साखरेमुळे मिश्रण थोडे सैल होईल . घट्टपणा आला की त्यात वेलची पावडर, काजू बदाम काप, बेदाणे मिक्स करावे. चव बघून लागल्यास साखर वाढवावी.तयार हलवा गार व्हॅनिला आईस्स्क्रीमचा गोळा घालून किंवा गरम आपल्या आवडी प्रमाणे सर्व्ह करावा.


✍🏻मिनल सरदेशपांडे

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

कणकेचा हलवा

 कणकेचा हलवा: 


साहित्य: एक कप रवाळ कणिक, एक कप गूळ, पाऊण कप तूप, दोन कप दूध, चवीला मीठ, काजूगर, बदाम, बेदाणे, एक टीस्पून सुंठ पावडर, वेलची पावडर

कृती: गहू थोडे रवाळ दळावेत.


कढईत निम्मे तूप घालावे. त्यात काजूगर, बदाम काप, बेदाणे तळून बाजूला ठेवावेत.  आता त्यात कणिक घालून खमंग तांबूस भाजून घ्यावी.

दूध गरम करावे. गॅस मंद करून हळूहळू दूध घालावे, गूळ घालावा, ढवळत राहावे. उरलेले तूप वेलची पावडर, एक टीस्पून सुंठ पावडर, मीठ,  तळलेले काजू, बेदाणे घालून नीट मिक्स करावे. एक वाफ काढावी. हलवा तयार आहे!

 टीप: यासाठी तुम्ही साखर पण वापरू शकता पण गुळाचा खमंग लागतो.

दुधाऐवजी पाणी पण वापरतात पण दुधातील जास्त छान लागतो. 

तूप एवढं नको असेल तर अर्धा कप घेऊ शकता.

नेहमीची कणिक घेतली तर दुधाचे प्रमाण एकास दीड पुरते. 


✍🏻 मीनल सरदेशपांडे

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मेथी मटर मलई: कांदा लसूण शिवाय

 मेथी मटर मलई:  कांदा लसूण शिवाय



साहित्य: एक जुडी मेथी, एक कप मटार, अर्धा कप साय,  अर्धा कप दही, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, एक टीस्पून लाल तिखट, मीठ, एक टीस्पून गरम मसाला, दहा बारा काजू,  एक  मोठा टॉमेटो, तेल दोन टेबलस्पून, एक टीस्पून साखर, एक कप पाणी, धने पावडर पाव टीस्पून, जिरे पावडर पाव टीस्पून

कृती: मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. मटार थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत.  टॉमेटो थोडे पाणी घालून वाफवून घ्यावा कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात काजू तळून बाजूला ठेवावेत. आता त्यात चिरलेली मेथी घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावी. बाजूला काढून ठेवावी. काजूगर आधी बारीक करावेत त्यात आलं टॉमेटो घालून पेस्ट करून घ्यावी. कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. टॉमेटो काजू पेस्ट दोन मिनिटं परतून त्यात साय, दही, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, जीरे पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता त्यात परतलेली मेथी,  शिजलेले मटार, एक कप पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. नीट मिक्स करून उकळी आणावी. चव बघून काही लागल्यास वाढवावे. 

✍🏻मीनल सरदेशपांडे

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

शेवग्याच्या पाल्याची भाजी

 शेवग्याच्या पाल्याची भाजी: 


शेवगा ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. पावसात कोकणात बऱ्याच वेळा अशा परसात सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्या केल्या जातात. साहित्य: शेवग्याची पाने चिरून एक कप(250ml), दोन कांदे, चणाडाळ दोन टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, तेल एक टेबलस्पून, मोहोरी 1/4 टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, ओलं खोबरं दोन टेबलस्पून, मीठ अर्धा टीस्पून, गूळ एक टीस्पून

कृती:  डाळ धुवून रात्री भिजत घालून सकाळी थोडं मीठ घालून शिजवून घ्यावी, डाळ मोडणार नाही इतपत शिजवावी.शेवग्याची पानं, पुढचे कोवळे तुरे काढून  धुवावेत. पाणी  निघून गेल्यावर बारीक चिरावेत.  अर्धा कप पाणी घालून कुकरला शिजवून घ्यावे. कांदा बारीक चिरावा.कढईत तेल तापवावे. मोहोरी घालावी ,ती तडतडली की कांदा घालून परतावा.  कांदा परतला की हिंग, हळद, लाल तिखट घालून परतावे. शिजलेला पाला थोडा पिळून घ्यावा, आणि परतावा. मीठ, गूळ, ओलं खोबरं, शिजलेली डाळ घालून ढवळावे. हवं तर थोडं पाणी घालून एक वाफ काढावी. चवीनुसार लागेल ते वाढवावे.

टीप: पीठ पेरून पण ही भाजी छान होते.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

मूगडाळ पालक सूप

 मूगडाळ पालक सूप: दोन टीस्पून मूगडाळ, दहा पालकची पानं, दोन लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड, लोणी, आमचूर पावडर पाव टीस्पून



कृती: पालक पानं धुवून चिरून घ्या. मूगडाळ धुवून घ्या. लसूण पाकळ्या सोलून घ्या. तिन्ही गोष्टी एकत्र करून थोडं पाणी घालून शिजवून घ्या.  गार करून मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर मिरपूड घाला. आमचूर पावडर घाला.एक उकळी काढा. देताना थोडं लोणी घालून सर्व्ह करा. या साहित्यात एक बाऊल  सूप होईल.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

ज्वारीचा फुलका

 साहित्य: एक वाटी पाणी, चिमूटभर मीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ


कृती:  एका कढईत एक वाटी पाणी घ्या.

त्यात चिमूटभर मीठ घाला, मध्यम गॅसवर उकळी काढा. गॅस बारीक करून त्यात पीठ मिसळा. नीट ढवळून एक वाफ काढा.  गॅस बंद करा. थोडं गार झाल्यावर मळून घ्या.


पोळीप्रमाणे लाटा.  दोन्ही बाजू भाजून घ्या. हवं असेल तर शेवटी गॅसवर भाजा पण तव्यावर पण मस्त फुगतो फुलका! 



 रोज गहू खाणं तब्येतीला चांगलं नाही पण भाकरी येत नाही त्यासाठी हा पर्याय आहे.

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

रवा पोहे डोसा

 रवा पोहे डोसा:


साहित्य: रवा दोन कप, पोहे एक कप, तांदूळ पीठ अर्धा कप, बेसन पाव कप, एक टीस्पून लाल तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट, दोन कप ताक, तेल तीन टीस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, हिंग पाव टीस्पून, आलं पेस्ट एक टीस्पून, कढीलिंब पानं सातआठ, मीठ, पाणी

कृती:  तेलाची मोहोरी, हळद, हिंग घालून फोडणी करून गार करत ठेवा.रवा, तांदूळ पीठ, बेसन चार कप पाण्यात भिजवून ठेवा. पोहे धुवून पाणी निथळून घ्या. त्यात दोन कप ताक घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या, रव्याच्या मिश्रणात घाला.


त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं पेस्ट घाला. गार फोडणी मिसळा. कढीलिंब बारीक चिरून घाला. मिश्रणात डोश्याचे पीठ असते तेवढे सरसरीत होईल इतपतच पाणी घाला, नीट मिक्स करा. तवा तापवून त्यावर तेल लावून नेहमीप्रमाणे डोसे घाला. दोन्ही बाजू भाजून घ्या, चटणी आणि लोण्यासोबत सर्व्ह करा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे