कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

मक्याचा उपमा/ भाजी

 मक्याचा उपमा/भाजी: 


साहित्य: तीन कणसं, दोन कांदे, एक लिंबू, मीठ, अर्धी वाटी तेल, तीन ओल्या मिरच्या (तिखटपणावर कमी जास्त), मोहोरी पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, कोथिंबीर

कृती: तीन कणसं  सोलून उकडून घ्यावीत.  गार झाल्यावर दाणे काढून  घ्यावेत. मिक्सर जारमध्ये थांबून थांबून   फिरवावेत.  भरड व्हायला हवेत. कढईत तेल तापत ठेवावे.  तापलं की मोहोरी घालावी. मोहोरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे, कांदा घालून मऊ होईपर्यंत परतावा. आता हिंग, हळद घालून परतावे. आता भरड वाटलेले दाणे घालावेत. लिंबू पिळावे. मीठ घालून नीट मिक्स करावे. थोडावेळ परतावे. चव बघून लागेल ते वाढवावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.


टीप: या पध्द्ती ऐवजी तुम्ही कणीस सोलून, किसून घेऊन परतता येते पण खूप वेळ परतावे लागते. मला ह्यापेक्षा माझी पध्द्त सोपी वाटली.

✍🏻मीनल सरदेशपांडे

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

सोप्पे झटपट बिनपाकाचे तीळगूळ लाडू

 सोप्पे झटपट बिनापाकाचे तिळगुळ लाडू:


 माझ्या सासऱ्यांना कडक लाडू चावत नाहीत पण संक्रांतीला तिळगुळ तर हवाच! म्हणून केलेत हे झटपट लाडू!

साहित्य: पाऊण वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी साधा नेहमीचा गूळ, एक टीस्पून तूप, चिमूटभर वेलची पावडर

साहित्य: तीळ मंद गॅसवर भाजून घ्या. शेंगदाणे भाजून सालं काढून घ्या.  गार झाल्यावर  आधी दाण्याचं कूट करून घ्या त्यातच तीळ घालून दोन मिनिटं थांबून थांबून मिक्सर चालवा. आता त्यात गूळ, वेलची पावडर आणि तूप घालून परत  एकदा फिरवा. मिक्स झालं की ताटात काढून घ्या. आवडीप्रमाणे लाडू वळा. 

झटपट लाडू तयार!

✍🏻 मीनल सरदेशपांडे

बाजरीची भाकरी

 साहित्य: बाजरीचे पीठ एक वाटी, पाणी अर्धी वाटी, मीठ


कृती: बाजरीच्या पिठात मीठ घालून घ्या. पाणी उकळून या पिठात घाला. चमच्याने मिक्स करा. गार होऊ द्या. लागेल तसं पाणी घेऊन पीठ छान मऊसूत मळून घ्या.  छोटा गोळा घेऊन तांदूळ पिठीवर हाताने अलगद गोल थापत जा.


तवा तापवून त्यावर थापलेली वरची बाजू तव्यावर खाली जाईल अशी भाकरी टाका. भाकरी जरा गरम झाली की त्याला पाणी लावा. भाकरी उलटून दुसरी बाजू भाजून घ्या. आता पहिली बाजू तवा उचलून डायरेक्ट गॅसवर फिरवत फिरवत शेकवा यामुळे भाकरी छान फुगते. तयार भाकरी पिठलं, लोणी, लसूण चटणी सोबत सर्व्ह करा.

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

साधी पुरी

 पुऱ्या:


कुठल्याही कार्यात नेहमी पुऱ्या केल्या जातात. गोड आणि तिखट दोन्ही पदार्थ पुरीसोबत छान जमवून घेतात. अशी ही पुरी मऊ पण फुगलेली हवी. कडकडीत व्हायला नको. यासाठी हे प्रमाण देतेय.

साहित्य: पाच कप कणिक, अर्धा कप तांदूळ पीठ, अर्धा कप बेसन, मीठ,  अर्धा कप तेल, साखर चार टीस्पून, पाणी, तेल तळणीसाठी

कृती: कणिक, तांदूळ पीठ,  बेसन,साखर, चवीनुसार मीठ घालावे. तेल घालून मिक्स करावे. थोडं थोडं पाणी घेत घट्ट पीठ भिजवावे.  अर्धा तास झाकून ठेवावे.


आवडीप्रमाणे गोळ्या करून घ्याव्या. गोल लाटून घ्याव्या.

कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर मध्यम आचेवर सोनेरी रंगावर पुऱ्या तळाव्यात. 

टीप: साखरेमुळे पुरीला छान रंग येतो.


रव्यामैद्यापेक्षा या पुऱ्या गार झाल्या तरी मऊ राहतात. 

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कारळ्याची चटणी

 कारळ्याची चटणी:


 याला आमच्याकडे तीळकुट म्हणतात. अगदी कमी साहित्यात होणारी आणि या सिझनला हवीच अशी चटणी! कारळे तीळ हे थोडे लांबट असतात. रत्नागिरीत माम्या वाटे घेऊन बसतात या तिळाचे, छान असतात त्यांच्याकडे...काकानू घेतांव काय दोन वाटं.. वयनी तीलकुट करील..असं गोड आवाजात सांगितलं की बाबा आणायचेच!

साहित्य: 

कारळे तीळ अर्धा कप, अर्धा कप सुकं खोबरं, पाच सहा सुक्या मिरच्या, 1 टीस्पून गूळ, एक चिंचेचं बोटुक म्हणजे 1 इंचाचा तुकडा, मीठ 1 टीस्पून, लसूण पाकळ्या दहा बारा, पाव टीस्पून तेल, लाल तिखट 1 टीस्पून


कृती: तीळ नीट चाळून निवडून घ्या. खोबरं भाजून घ्या. तेलावर सुक्या मिरच्या आणि चिंच किंचित परतून घ्या. निवडलेले तीळ भाजून घ्या, पण खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत फक्त  मंद गॅसवर गरम करायचे आहेत नाहीतर चटणी कडवट लागेल. आधी मिरच्या, लसूण आणि चिंच मिक्सर जारमध्ये बारीक करा, मग हळूहळू तीळ, खोबरं बारीक करा. सगळ्या मिश्रणात मीठ, तिखट, गूळ मिक्स करून परत सगळं बारीक करून घ्या. चव बघून लागेल ते वाढवा.

 मस्त टेस्टी चटणी तयार आहे!


टीप: लसूण ऐच्छिक आहे. चिंच गुळाने मस्त येते चव पण तुम्हाला नको असेल तर साखर आणि आमचूर पावडर पण घालू शकता.

तिखट मिठाचं प्रमाण चव बघून कमी जास्त करा.

माहितीसाठी तिळाचा फोटो देतेय.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

कचरा कंद: आरारूट कंद: माहिती

 #कचराकंद: सत्व करण्याची पध्द्त:

कचरा कंद हा आरारूट च्या वर्गातील कंद आहे. 


कचरा कंदाचे सत्व काढतात ते उष्णतेच्या विकारांत अत्यंत लाभदायी आहे. याची ताकातली किंवा दुधातली लापशी करून घेतल्याने फायदा होतो. ही लापशी किंवा खीर उपासाला चालते. 

कचरा कंद हे दिसायला आलं, हळद या सारखे पण पांढऱ्या रंगाचे असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे कंद लावतात. भुसभुशीत जमीन करून त्यात हळदीसारखे वाफे करून हे कंद लावावेत.  याची पानं पण हळदी सारखी दिसतात.


चार पाच महिन्यात हे पूर्ण तयार होतात.

मुळं मोकळी करून माती स्वच्छ धुवून घेतात.

यातील लागवडी योग्य कंद बाजूला करून उरलेल्या कंदाच्या काचऱ्या करतो तसे कापून घेतात.

मिक्सर जारमध्ये पाणी घालून या काचऱ्या गुळगुळीत वाटतात.

मोठ्या पातेल्यावर पंचा किंवा कोणतेही पातळ कापड ठेवून  पंचाच्या सहाय्याने हे वाटलेलं मिश्रण गाळून घेतात.

परत एकदा दोनदा हा चोथा पाणी घालून वाटून परत गाळून घेतात. आता पातेल्यात जमा झालेल्या मिश्रणात भरपूर पाणी घालून ते पातेलं 24 तास न हलवता ठेवतात.

24 तासांनी वर आलेलं नितळ पाणी काढून टाकतात. खाली पातेल्याच्या तळाशी सत्व जमा होते. हे सत्व मोठ्या थाळ्यात ठेवून उन्हात मोकळी पावडर होईपर्यंत वाळवतात.

अशा प्रकारे तयार सत्व बरणीत भरून ठेवतात. हे सत्व वर्षानुवर्षे टिकते. 

पूर्वी जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा हे कंद धुवून झाल्यावर  मोठ्या जात्याच्या दगडावर (घिरटावर) घासत असत. मग तयार झालेलं मिश्रण याच पध्द्तीने गाळून सत्व केलं जात असे.

टीप: मी चार कंद लावले होते त्यापासून अडीच किलो कंद तयार झाले. कंद जेवढे जून म्हणजे तयार असतील तेवढं सत्व चांगलं पडतं.


सत्वाची लापशी किंवा खीर: 

साहित्य: एक कप दूध, एक टीस्पून कचरा सत्व, दोन टीस्पुन साखर, चिमूटभर वेलची पावडर

कृती:गार दुधात सत्व नीट मिक्स करून घ्यावे. त्यात साखर, वेलची पावडर घालून गॅसवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. दूध दाट झालं की खीर तयार! गरम किंवा गार कशीही प्या. 


याच पध्दतीने फक्त ताकात मिक्स करून त्यात जिरे पूड, मीठ घालून ताकातली पण करता येते.

माहिती सोबत सर्व प्रक्रिया फोटोसह देत आहे.

याच पद्धतीने आरारूट सत्व केलं जातं.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

मटार रवा आप्पे

 मटार रवा आप्पे:




सध्या मटार भरपूर येतायत त्यामुळे प्रत्येक पदार्थात घालायचा मोह आवरत नाही!

साहित्य: 1 कप मटार, 2 कप रवा, अर्धा कप तांदूळ पीठ किंवा आंबोळी पीठ( याची कृती मी गृपवर आधी दिलीय.), आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून, मिरच्या 4,  कोथिंबीर मूठभर, कढीलिंब पाने 10, दही 1 कप, पाणी , मीठ, खायचा सोडा अर्धा टीस्पून



कृती: मटार, कोथिंबीर, मिरच्या, आलं लसूण आणि कढीलिंब पाने सर्व एकत्र करून थोडं पाणी घालून मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यावे. त्यात रवा, तांदूळ पीठ, मीठ, दही घालून मिक्स करावे. पाणी घालून इडली पिठा इतपत करावे. चव बघून काही हवं असेल तर वाढवावे. शेवटी सोडा घालून नीट मिक्स करावे.


आप्पेपात्रात दोन्ही बाजू तेल घालून भाजून घ्यावे.


चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावे.


#मटार

#आप्पे

#शाकाहारी

#स्नॅक्स


✍🏻 मीनल सरदेशपांडे