कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली

काजू मोदक


गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी!
साहित्य:
एक वाटी काजूगर,
अर्धी वाटी साखर,
पाव वाटी पाणी,
वेलची पावडर,
अर्धा चमचा तूप,
मोदक साचा
कृती:
काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही.
कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी.
गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे. घट्ट गोळा झाला की साच्याला तूप लावून त्यात छोटे गोळे भरून मोदक करावेत.
.

.
.

.
.

.
.
तेव्हढाही वेळ नसेल तर ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण थापावे. काजूकतली तयार आहे.
.
.

गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर

माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
साहित्य:
एक वाटी तांदूळ पिठी,
एक वाटी पाणी,
एक चमचा लोणी,
मीठ.
पारीसाठी:
नेहमी पोळ्याना भिजवतो तशी कणिक
.

.
कृती:
पाणी उकळत ठेवा. त्यात चवीला मीठ आणि लोणी घाला. उकळी येऊ द्या.
उकळी आली की तांदूळ पिठी मिसळा. मोदकासारखी उकड काढून घ्या.
थोडी गार झाली की छान मळून घ्या.
तेल, मीठ घालून नेहमीप्रमाणे दीड वाटी कणिक मळून ठेवा.
उकड गार झाली की कणकेच्या गोळीएव्हढीच उकडीचीही गोळी घ्या.

पुरणपोळीसारखी कणकेत भरून घ्या.
तयार उंडा कणकेवर लाटा.
आणि नेहमीच्या पोळीसारखीच भाजा.
.

.
मऊ लुसलुशीत पोळी तयार आहे. ही पोळी शेवयांच्या खिरीबरोबर खा.
फार काही वेगळी रेसिपी नाहीय पण एक पारंपरिक प्रकार म्हणून मुद्दाम देतेय.
.

स्ट्रॉबेरी कलाकंद

.
.


1

साहित्य:
स्ट्रॉबेरी क्रश १०० ग्रॅम,
पनीर १०० ग्रॅम,
साखर १०० ग्रॅम,
खवा १०० ग्रॅम,
वेलची पावडर,
बदाम काप
कृती:
मी तयार मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश वापरला पण ताज्या असतील तर जास्त चांगल्या!
खवा, साखर, पनीर आणि स्ट्रॉबेरी क्रश सर्व एका कढईत एकत्र करावे.
मंद गॅसवर ढवळत राहावे.
ताटाला तुपाचा हात लावून घ्यावा.
बदामाचे काप करावे.
मिश्रण घट्ट होऊ द्यावे. गोळा होऊ लागला की खाली उतरून वेलची पावडर घालावी, छान घोटावे.
गोळा झाला की ताटात थापावा.
बदामाच्या कापानी सजवून वड्या पाडाव्या. झटपट कलाकंद तयार आहे!
.
1
.
.

कोळाचे पोहे:

साहित्य: 

 दोन वाटया जाडे पोहे, अर्ध्या नारळाचा चव, एक चमचा चिंचेचा घट्ट कोळ, दोन चमचे गूळ, दोन ओल्या मिरच्या, मीठ, एक चमचा तूप, हिंग, जीरे, कोथिंबीर

कृती:
 नारळ खवून घ्यावा. त्यात अंदाजे पाणी घालून फिरवावे. गाळून घ्यावे. साधारण चार वाट्या दूध निघेल, दोनदा फिरवून घेतले की! या दुधात, गूळ किसून, चिंचेचे कोळ, मीठ घालावे. एक चमचा तूपाची हिंग जीरं घालून फोडणी करावी. ही फोडणी तयार दुधाला द्यावी. कोथिंबीर धुवावी, बारीक चिरून दुधात घालावी. मिरची बारीक वाटून घ्यावी. पोहे धुवावेत. चाळणीत निथळत ठेवावेत. पोह्यांना थोडे मीठ आणि मिरची लावावी. बाऊलमध्ये तयार पोहे घ्यावेत. वरून तयार कोळ घ्यावा. याचे प्रमाण असे नाही, पण चव मात्र अप्रतिम!!!
मी जरी गूळ, चिंच याचे प्रमाण दिले असले तरी चव बघून कमी जास्त करावे.
मिनल सरदेशपांडे

चीज शंकरपाळे:


साहित्य: 200 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम चीज, दोन चमचे ओवा, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे तेल, मीठ, तळणीसाठी तेल

कृती: ओवा मिक्सरला भरड करून घ्यावा. मैद्यात ओवा पावडर, मीठ, तिखट मिक्स करावे. तेल गरम करून ते मैद्यात घालून सगळीकडे नीट चोळावे. चीज किसून घ्यावे. तयार मैद्यात चीज नीट मिसळावे. लागेल तसे पाणी घेऊन घट्ट पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. छोटी लाटी घेऊन लाटावी, शंकरपाळे कातून घ्यावे.

 तेल तापत ठेवावे. चांगले तापले की गॅस मंद ठेवून शंकरपाळे तळून घ्यावे. गार झाले की छान कुरकुरीत होतात.

रताळ्याचा कीस

साहित्य:
 अर्धा की रताळी, एक वाटी किंवा आवडीनुसार शेंगदाण्याचे कूट, दोन चमचे साखर, पाव वाटी तूप, चार ओल्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा जीरे, पाव वाटी ओलं खोबरं ऐच्छिक

कृती:
 रताळी स्वच्छ धुऊन घ्यावीत. सालं काढून घ्यावीत. स्वच्छ असेल तर सालं ठेवली तरी चालतील. पातेल्यात अर्धी पातेली पाणी घ्यावे.रताळी किसून कीस पाण्यात टाकावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावे. कीस पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्यावा. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ घालून नीट मिक्स करावे. कीस परतल्यावर आळतो, त्या अंदाजाने मीठ घालावे. कढईत तूप तापत ठेवावे. तापलं की जीरं, जीरं तडतडलं की मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या परतल्या की तयार मिश्रण घालून ढवळावे. झाकण ठेवून छान वाफ काढावी. दहा पंधरा मिनिटात कीस तयार होतो, त्याचा रंग बदलतो. ओलं खोबरं वरून घालू शकता किंवा आधीच मिक्स करू शकता. चव बघून लागल्यास मीठ घालावे.

भेंडी मसाला

साहित्य:
 भेंडी पाव की, दोन छोटे कांदे, दोन छोटे टॉमेटो, सात आठ लसूण पाकळ्या, सात आठ काजू, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ, दोन चमचे मलई, तेल, एक चमचा साखर.

कृती:
 भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यावी. एक इंचाचे तुकडे करावे. कांदा चार तुकडे करून घ्यावा. कुकरला पाणी न घालता वाफवून घ्यावा. कढईत तेल तापवून भेंडी नरम होईपर्यंत तळून घ्यावी. पेपरवर काढावी. तळलेल्या भेंडीला थोडं मीठ लावून ठेवावं. लसूण, काजूगर, टोमॅटो, कांदा हे सर्व मिक्सरला फिरवून पेस्ट करावी. कढईत चार चमचे तेल घ्यावं. त्यात केलेली पेस्ट घालून परतावे. लाल तिखट, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. ग्रेव्हीत मीठ, एक चमचा साखर, मलई घालावी. थोडं पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्यावी. आता भेंडी मिक्स करावी . गॅस बंद करावा. गरमागरम रोटी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी.