कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २५ एप्रिल, २०२१

पॉट आईस्क्रीम

 पॉट आईस्क्रीम: आमच्या मोठया एकत्र कुटुंबाच्या प्रमाणात आहे.


साहित्य: पाच लीटर दूध, दोन लीटर हापूस आमरस, अर्धा किलो साखर, चवीला मीठ(ऐच्छिक)

कृती: दूध, साखर, आमरस सगळं एकत्र ज्युसर जारमध्ये नीट मिक्स करून घ्या. आईस्क्रीम पॉटमध्ये तयार मिश्रण ओतून त्याचं ब्लेड लावा. झाकण लावून बाजूने  खडेमीठ आणि बर्फ घट्ट थर लावा. अर्धा तास फिरवून घुसळून मग दिवसभर बाजूने सतत मीठ आणि बर्फ घालत रहा! आईस्क्रीम तयार!

आईस्क्रीम पॉट:



मँगो रसमलई

 मँगो रसमलई:


साहित्य: दूध एक लीटर, आंबे चार, साखर तीन टेबलस्पून, बदाम काप, रसगुल्ले

कृती: दूध पसरट कढईत आटवत ठेवा.  बाजूची साय काढून दुधात मिक्स करत रहा पाऊण लीटर झालं की साखर घालून परत आटवत रहा. तुम्हाला हवी तेवढी दाट झाली की गॅस बंद करून गार करत ठेवा. गार झाली की फ्रीजमध्ये ठेवा. आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या. पूर्ण गार झालेल्या बासुंदीत तयार रस मिक्स करा, तयार रसगुल्ले पाक पिळून मग बासुंदीत सोडा.  बदाम कापानी सजवा, गारेगार सर्व्ह करा.


टीप: आटवलेलं दूध पूर्ण गार झाल्याशिवाय आमरस मिक्स करू नका नाहीतर दूध फाटू शकते.

रसगुल्ले कृती माझ्या ब्लॉगवर आहे. अर्धा लीटर दुधाचे 15 ते 16 रसगुल्ले होतात.


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

मिलेट व्हेज चीज बॉल्स

 मिलेट व्हेज चीज बॉल्स:


साहित्य: १)पाऊण कप नाचणी पीठ,२)पाऊण कप ज्वारी पीठ, 

३)अर्धा कप वरीचा रवा, 

४)पाऊण कप बाजरी पीठ, 

५)अर्धा कप पनीर,  

६)अर्धा कप गाजर किस, 

७)अर्धा कप कांदा बारीक चिरून, ८)अर्धा कप कोथिंबीर, 

९)१ टीस्पून आलं पेस्ट , 

१०)१ टीस्पून लसूण पेस्ट, 

११)१ टीस्पून धने पावडर, 

१२)१ टीस्पून जीरं पावडर, 

१३)मीठ,

 १४)दीड टीस्पून लाल तिखट,  

१५)चीज क्युब्स, 

 १६)अर्धा टीस्पून खायचा सोडा,

 १७) तळणीसाठी तेल, 

 १८) एक टेबलस्पून तीळ

 १९) पनीरचे पाणी


 

 

कृती: 

१)सगळी पिठं आणि रवा एकत्र करून घ्या. 

२)अर्धा लीटर दूध तापवा, गॅस बंद करून त्यात एक टेबलस्पून लिंबू रस आणि तेवढंच पाणी  एकत्र करून घाला, दूध नासून पनीर तयार होईल, हे पनीर  पिठात घाला.  पनीरचे पाणी अतिशय पौष्टिक असते तेच आपण पीठ भिजवायला वापरणार आहोत.

३)कांदा  सोलून बारीक चिरून घ्या. ४)गाजर  धुवून किसून घ्या.  कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्या.

५) पिठाच्या मिश्रणात गाजराचा किस घाला. चिरलेला कांदा,  कोथिंबीर घाला.

६) आलं लसूण पेस्ट, धने जीरं पावडर, तीळ, लाल तिखट आणि सोडा घालून नीट एकत्र करा. 


७) चवीनुसार मीठ घाला. 

८) आता थोडं पनीरचे पाणी घालून गोळे होतील इतपत  भिजवा. चव बघून लागेल ते वाढवा.


9) चीजचे छोटे तुकडे करून घ्या. 

10) मिश्रणाचे छोटे बॉल्स करून त्यात मध्ये चीजचा तुकडा ठेवून नीट गोल करा.



14) कढईत तेल तापवा  बॉल्स घालून मध्यम गॅसवर तळा.  तळताना गॅस बारीक ते मध्यम ठेवा म्हणजे नीट आतपर्यंत तळले जातील.

15) तयार बॉल्स चिंच खजुराच्या चटणी सोबत सर्व्ह करा. 


16) हा एक उत्तम  पौष्टिक नाश्ता आहे.

17) यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या, मोड आलेली कडधान्य घालू शकता.

18) तुम्हाला जर वाफवून करायचे असतील तर चीज न घालता वाफवून फोडणीत परतू शकता. चीज घातलं तर वाफावताना फुटून बाहेर येऊ शकते.



सौ. मीनल मंगेश सरदेशपांडे


मंगळवार, २० एप्रिल, २०२१

पोहे बटाटा कटलेट

 पोहे बटाटा कटलेट:


 साहित्य: दोन कप जाड पोहे, दोन मध्यम बटाटे, 1 कप कोबी चिरून, 1 टीस्पून लसूण मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जीरं पावडर, मीठ, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, पाणी, लागलं तर पोहे पीठ, तेल

 कृती: पोहे धुवून चाळणीवर निथळत ठेवा. बटाटे शिजवून घ्या. कोबी बारीक चिरून किंवा किसून घ्या. त्यात बटाटे सोलून किसा. धुतलेले पोहे घाला. धने जीरं पावडर, लसूण मिरची पेस्ट, हळद, तिखट घालून मळा. लागलं तर पाणी वापरा.  मला लागलं नाही.सैल वाटलं तर  थोडे पोहे मिक्सरला फिरवून त्याचं पीठ घालून मळा. चव बघून काही हवं तर वाढवा.

 छान मळून कटलेट चपटे गोल किंवा आवडीचे आकार करा.


कढईत तेल तापत ठेवा. बाहेरून कुरकुरीत आतून मऊ अशी छान कटलेट दही चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा. 

 टीप: यात तुम्ही मेथी, कोथिंबीर, पालक घालू शकता. सध्या लॉक डाऊन मुळे घरात उपलब्ध साहित्यात केले.


  दह्यात मीठ, साखर आणि लाल तिखट घालून मी चटणी करते.

  

रविवार, १८ एप्रिल, २०२१

शेवग्याचं लोणचं

शेवग्याचं लोणचं:

साहित्य: पाच शेवग्याच्या शेंगा, तीन टेबलस्पून लोणचं मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, मीठ 2 टीस्पून, दोन लिंबं, तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून
कृती: शेवग्याच्या शेंगा थोडं साल सोलुन  तुकडे करा. त्याला 1 टीस्पून मीठ आणि लोणचं मसाला लावून अर्धा तास मुरत ठेवा. 
कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, हिंग हळद घालून त्यात मसाल्यासह शेंगा घाला. नीट परतून मंद गॅसवर वाफ येऊ द्या. पंधरा मिनिटं तरी लागतील, मधे मधे परतत रहा. शेंगांचा रंग बदलला की त्यात उरलेलं मीठ, तिखट घालून परता. गॅस बंद करून लिंबाचा रस मिक्स करा.  चव बघून तिखट मीठ लागलं तर वाढवा. एक दिवस मुरू द्या. 
दुसऱ्या दिवशी खायला घ्या. 


शनिवार, १७ एप्रिल, २०२१

पाणीपुरी

  पाणीपुरी 


पाणीपुरी मसाला: 


साहित्य: 1 कप धने, 1 कप जीरं, 2 तुकडे दालचिनी, 8 लवंगा, 15 मिरी, 1 टीस्पून ओवा, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून शेंदेलोण, 2 टीस्पून पादेलोण, 1 टीस्पून हिंग, 2 टीस्पून आमचूर पावडर, पाव टीस्पून लिंबूफुल

कृती: सगळे मसाले गरम करून घ्या. मीठ पण गरम करा. सगळं मिक्सरवर बारीक करा. चाळणीने चाळा. मसाला हवाबंद बरणीत भरून ठेवा.

लिंबू फुल नसेल तर 2 टीस्पून आमचूर पावडर वाढवा.

पाणीपुरीचे पाणी:

एक लीटर पाण्याला दोन टेबलस्पून चिंच,  अर्धा कप चिरलेला गूळ, चार  ओल्या मिरच्या,   अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना पानं, 1 टीस्पून आलं पेस्ट, दहा बारा बिया काढलेले खजूर हे सगळं मिक्सरला बारीक करून  घ्या. त्यात चवीनुसार मीठ, पाणीपुरी मसाला  4 टीस्पून घाला. चव बघून काही हवं तर वाढवा.


पुऱ्या हल्ली तळायच्या पण मिळतात किंवा तयार पण मिळतात. मस्त चटकदार पाणीपुरीचा आनंद घ्या.


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

राय आवळ्याचा मेथावळा

 मेथावळा:


साहित्य: 

1 कप  रायआवळ्याचे काप, अर्धा कप गूळ, 1 टीस्पून लाल तिखट, 1टीस्पून मेथी, मीठ, तेल एक टेबलस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, पाणी पाव कप

कृती: रायआवळे स्वच्छ धुवा. बी च्या बाजूचे काप चिरून घ्या. तयार काप 1 कप घ्या. कढईत तेल तापत ठेवा. मेथी घाला. जरा रंग बदलला की मोहोरी घाला. ती तडतडली की गॅस बारीक करून हिंग, हळद घाला. परतून घ्या आणि त्यात रायआवळा फोडी घाला. परता आणि पाव कप पाणी घालून दोन मिनिटं वाफ काढा.


आवळा पटकन शिजतो.  आता त्यात गूळ, मीठ, तिखट घालून उकळी काढा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या, कारण आवळ्याचे पाणी सुटून  मिश्रण थोडे सैल होईल. 

चव बघून लागेल ते वाढवा. 

टेस्टी मेथावळा तयार आहे!