पाणीपुरी
पाणीपुरी मसाला:
साहित्य: 1 कप धने, 1 कप जीरं, 2 तुकडे दालचिनी, 8 लवंगा, 15 मिरी, 1 टीस्पून ओवा, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून शेंदेलोण, 2 टीस्पून पादेलोण, 1 टीस्पून हिंग, 2 टीस्पून आमचूर पावडर, पाव टीस्पून लिंबूफुल
कृती: सगळे मसाले गरम करून घ्या. मीठ पण गरम करा. सगळं मिक्सरवर बारीक करा. चाळणीने चाळा. मसाला हवाबंद बरणीत भरून ठेवा.
लिंबू फुल नसेल तर 2 टीस्पून आमचूर पावडर वाढवा.
पाणीपुरीचे पाणी:
एक लीटर पाण्याला दोन टेबलस्पून चिंच, अर्धा कप चिरलेला गूळ, चार ओल्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना पानं, 1 टीस्पून आलं पेस्ट, दहा बारा बिया काढलेले खजूर हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, पाणीपुरी मसाला 4 टीस्पून घाला. चव बघून काही हवं तर वाढवा.
पुऱ्या हल्ली तळायच्या पण मिळतात किंवा तयार पण मिळतात. मस्त चटकदार पाणीपुरीचा आनंद घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा