#कुळीथपिठाचीगुळपापडी
आपल्या कोकणात होणारे अतिशय पौष्टिक असे हे कुळीथ! मला असं वाटतं ज्या हवेत जे पिकतं ते खावं...तेच आपल्या हवामानाला आणि प्रकृतीला चांगलं असतं.
माझी आजी हे कुळथाचे लाडू तूप कढवलं की हमखास करायची. आत्ता हिवाळ्यात कुळीथ खावेत..कारण ते पित्तकर आणि उष्ण आहेत. आज त्याची गूळ पापडी केलीय.
साहित्य: कुळीथ पीठ दोन वाट्या, गूळ पावणे दोन वाट्या, तूप एक वाटी, एक वाटी सुकं खोबरं, जायफळ पावडर पाव टीस्पून, सुंठ पावडर दोन टीस्पून, पाव वाटी खसखस, खारीक पावडर पाव वाटी,
कृती: कुळीथ भाजून भरडून घ्यावेत. पाखडून साल काढून घ्यावी. थोडे सरसरीत दळून आणावेत.
आपल्याकडे घरात कुळीथ पीठ पिठल्यासाठी असतं तेही वापरायला हरकत नाही. गूळ किसून घ्या. सुकं खोबरं किसून खमंग भाजून घ्या. खसखस भाजून घ्या. गार झालं की खोबरं चुरून घ्या. तूप आणि पीठ एकत्र करून भाजायला ठेवा. मुळात कुळीथ भाजलेले असल्याने फार वेळ लागत नाही. हे मिश्रण थोडं
सैल दिसलं पाहिजे. सुकं वाटत असेल तर थोडं तूप वाढवा. आता या पिठात सुंठ पावडर खारीक पावडर जायफळ पावडर खोबरं खसखस सगळं मिक्स करा. थाळ्याला तुपाचा हात लावून घ्या. गॅस बंद करून मिश्रणात गूळ घालून पटापट मिक्स करा. गूळ विरघळला की मिश्रण ताटात थापून वड्या पाडा. मी वरती तीळ लावलेत.
टीप:
गुळाला पर्याय म्हणून उगाच पिठीसाखर घालून चव बिघडवू नका.
यात तुपाची बेरी पण घालतात त्यामुळे आणखी खमंग लागते!
✍🏻मीनल सरदेशपांडे