कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, २३ जुलै, २०१८

उपासाचे लिंबू लोणचे

साहित्य: सहा लिंबं, साखर तीन वाट्या, लाल तिखट तीन टीस्पून, मीठ तीन टीस्पून
कृती: लिंबं स्वच्छ धुवावीत. कोरडी करावीत. प्रत्येक लिंबाच्या आठ याप्रमाणे फोडी कराव्यात. बिया काढून टाकाव्यात.  फोडी एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून कुकरमध्ये 20 मिनिटं फोडीत  पाणी न घालता शिजवाव्या.फोडींच्या दीडपट साखर घ्यावी. दोन वाट्या फोडी झाल्या.  तर त्यात तीन वाट्या साखर, तिखट, मीठ  गरम असताना एकत्र करून ठेवा. दहा दिवस मुरू द्या. अधे मधे ढवळा.

बुधवार, ११ जुलै, २०१८

मिक्स डाळींची बीट घालून आमटी:



मला रोजची तीच तीच आमटी करायचा कंटाळा येतो. त्यात काहीतरी म्हणजे मुळा, कांदा, टॉमेटो, पालक, लाल माठ, मेथी, शेवगा, वांगं असं घालून आमटी मस्त लागते. आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत सतत नवीन प्रयोग करत रहावे लागतात. आजचा प्रयोग बिटाची आमटी

साहित्य:
 तूरडाळ, मसुरडाळ आणि मुगडाळ एकत्र करून एक वाटी, एक मध्यम बीट, एक मध्यम कांदा, एक ओली मिरची, चार लसूण पाकळ्या, तीन चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा जीरं, दोन लिंबं, चार पाच पानं कढीलिंब, एक टीस्पून गूळ, मीठ, लालतिखट एक चमचा, हळद, हिंग, ओलं खोबरं 

कृती: 
एक वाटी मिक्स डाळ धुवून तिप्पट पाणी आणि हिंग, हळद घालून शिजवून घ्यावी. बीट सोलून काचऱ्या कराव्या किंवा किसावे. कांदा सोलून चिरावा. लसूण सोलून बारीक काप करावे. मिरचीचे तुकडे करावे.
कढईत तेल तापत ठेवावे. जीरं, मोहोरी घालावी. ते तडतडल्यावर बीट, कांदा, मिरची आणि लसूण घालावी. झाकण ठेवून एक वाफ काढावी. आता हळद, लाल तिखट घालून परतावे. बीट शिजले नसेल तर थोडे पाणी घालून परत वाफ काढावी. घोटून डाळ मिक्स करावी. पातळ हवी असेल तसं पाणी मीठ, गूळ आणि लिंबाचा रस घालावा. कढिलिंबाची पानं चुरून घालावी. ओलं खोबरं घालावं. ढवळुन छान उकळी काढावी. गरमागरम आमटी भाताबरोबर मस्त लागते!

आमटीला बीटचा मस्त रंग येतो आणि चव... तुम्हीच करून पहा आणि सांगा.

गूळ पापडी: मिक्स पिठाची


साहित्य:
 तीन वाट्या गहू अर्धी वाटी डाळं, अर्धी वाटी मूग किंवा मुगडाळ, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या गूळ, चार टीस्पून सुंठ पावडर, अर्धी वाटी सुकं खोबरं कीस, अर्धी वाटी खारीक पावडर, अर्धी वाटी खसखस, वेलची पावडर एक टीस्पून, बदाम 20/ 25


कृती:
   3 वाट्या गहू लाह्या फुटेपर्यंत भाजावेत.
 अर्धी वाटी मूग किंवा मुगडाळ भाजावी. 
अर्धी वाटी डाळं , अर्धी वाटी मूग, 3 वाट्या गहू हे सर्व एकत्र रवाळ दळून घ्या.
कढईत खसखस आणि किसलेलं सुकं खोबरं खमंग भाजून वेगवेगळे ठेवा. 
आता कढईत एक वाटी तूप घेऊन त्यात तयार पीठ मोजून चार वाट्या घ्या.
 हे फक्त तुपावर पाच मिनिटं गरम करा. 
आपण आधीच सगळं भाजल्यामुळे फार भाजावे लागत नाही. 
गॅस बंद करा. 
भाजलेलं सुकं खोबरं चुरून पिठात मिसळा. 
खसखस मिक्सरला थोडी फिरवावी आणि पिठात मिक्स करावे.
 खारीक पावडर, वेलची पावडर आणि सुंठ पावडर पिठात घालावी. 
बदाम काप करावेत. 
थोडे सजावटीसाठी ठेवून बाकी पिठात मिसळावे. 
दुसऱ्या कढईत तीन वाट्या गूळ घ्यावा.
 त्यात एक वाटी पाणी आणि एक टीस्पून तूप घालून पाक करायला ठेवावा.
दोन तारी पाक करून त्यात तयार मिश्रण मिसळावे.
 एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर वड्या थापाव्यात. बदाम कापांनी सजवावे.

टीप: गहू भाजून केलेली गूळ पापडी अधिक खमंग लागते. आमच्याकडे खूप गोड आवडत नाही पण तुम्हाला हवा असेल तर थोडा गूळ वाढवा.

मंगळवार, १० जुलै, २०१८

मोहनथाळ



दिवाळी स्पेशल!!
साहित्यः जाडसर दळलेले बेसन पाव किलो, साजूक तूप पावणे दोन वाट्या, साखर अडीच वाट्या, थोडेसे दुध, अर्धा चमचा वेलची पावडर, बदाम काप सजावटीसाठी, चिमुट्भर केशर अगर केशरी रंग.
क्रुती: प्रथम बेसन एका परातीत घ्यावे. दोन चमचे तूप गरम करून त्यात घालावे. थोडया दुधाचा हबका मारावा. पाच मिनिटे पीठ झाकून ठेवावे. त्यानंतर पाच मिनिटानी रव्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे. कढईत बाकीचे तूप घेवून, त्यात बेसन घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे. दुसय्रा पातेल्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करावा. पाक एकतारी पेक्षा थोडा जास्त असावा पण दोन तारी नको.पाक तयार होत आल्यावर त्यात वेलची पावडर, केशर मिसळावे. तयार पाक भाजुन ठेवलेल्या बेसनात मिसळून मिश्रण गैसवर ठेवावे. मिश्रण आळत आले की थाळ्याला तूपाचा हात लावून त्यात ओतावे. थाळा हलवून मिश्रण सेट करावे. बदामाच्या कापानी सजवावे. तासाभराने आवडीप्रमाणे वड्या पाडाव्या.
दिवाळी असल्यामुळे तूपाच्या प्रमाणाचा विचार न करता मनसोक्त खावे.

खोबरे+खसखस पोळी

साहित्यः सारणासाठी: ओल्या नारळाचा चव दोन वाट्या, खसखस अर्धी वाटी, गूळ दीड वाटी, अर्धा चमचा वेलची पावडर.
पारीसाठी: कणिक तीन वाट्या, रवा एक वाटी, तेल पाव वाटी,मीठ.
क्रुती: खसखस भाजून पावडर करून घ्यावी. खोबरे व गूळ एकत्र करुन मोदकाप्रमाणे सारण करावे. सारण तयार झाल्यावर त्यात खसखस पावडर आणि वेलची पावडर मिसळावी.
सारण तयार करण्यापूर्वी कणिक, रवा एकत्र करून त्यात तेल आणि चवीला मीठ घालून घट्टसर कणिक मळावी. सारण तयार होईपर्यंत कणिक भिजत राहू द्यावी. सारण गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यावे. कणिक फूड्प्रोसेसरला मऊ करून घ्यावी. सारणाच्या गोळीच्या दीड्पट (अंदाजे) पिठाची गोळी घ्यावी. पिठाच्या गोळीला वाटीचा आकार देऊन सारणाची गोळी त्यात ठेवून वाटीचे तोंड बंद करावे. मध्यम आचेवर पोळी भाजावी. ही पोळी अजिबात फुटत नाही. मी कोणत्याही पोळीसाठी दोन पाय्रा करत नाही. पोळ्या पटापट होतात्, आणि गुळाच्या पोळीसारख्या टिकतात. खोबरे आणि खसखशीमुळे खमंग होतात.

कांदा कैरीची चटणी

ह्ळूहळू सुट्टया सुरू झाल्या आणि पाहुणेमंडळी येऊ लागली. त्यानिमित्ताने कोकणातील वेगवेगळे पदार्थ घरी होऊ लागले. त्यातील काही निवडक पदार्थ आपल्यासाठी देत आहे. या आधीचा फणस पुलाव जसा हटके तशीच ही चटणीही!!

साहित्यः
 चार मोठे कांदे, एक मध्यम कैरी, सुक्या मिरच्या दहा-बारा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य.

क्रुती:
 सुक्या मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कांदा, कैरीची साले काढून किसून घ्या. ओले खोबरे, सुक्या मिरच्या मिक्सरला बारिक करून किसलेल्या कांदा कैरीत मिसळा. गुळात खडे असल्यास तेही मिक्सरला बारिक करून गूळ वरील मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घाला. पाव वाटी तेल तापत ठेवा. मोहोरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा. तयार फोडणी चटणीला द्या. मिरच्या भिजवून घातल्यामुळे चटणीला सुंदर रंग येतो. मिरच्यांचा तिखटपणा पुरेसा न वाटल्यास लाल तिखट घालावे. गूळाचे प्रमाणही आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे.
तांदुळाची गरमागरम भाकरी आणि कांदा कैरीची चटणी... अहाहा!!!!!!!!!!!!
chatni

फणस पुलाव





साहित्यः
 बासमती तांदुळ अर्धा कि., एक मध्यम फणसाची कुयरी, एक वाटी ओले खोबरे, दहा-बारा लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक वाटी दही, चार कांदे, एक तमालपत्र, दोन काड्या दालचिनी, ७-८ काळी मिरी, दोन चमचे जिरे, चार ओल्या मिरच्या, दोन मसाला वेलची, ओले काजूगर एक वाटी, दोन चमचे गरम मसाला, तूप, मीठ.

क्रुती: 
तांदुळ धुवून निथळत ठेवावे. फणस चिरून वाफवून घ्यावा. कांदा उभा चिरावा. तांदुळ निथळले की तुपावर परतून दुप्पट पाणी व मीठ घालून दोन शिट्या करून घ्याव्यात. वाफ जिरली की भात ताटात पसरून गार करत ठेवावा. आले, लसूण, खोबरे थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
कढईत तूप तापत ठेवावे. त्यात ओल्या मिरच्यांचे तुकडे, जिरे, काळी मिरी, तमालपत्र, वेलची, दालचिनी टाकावे.एक मिनीट परतावे. कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत परतावा. वाट्लेले आले, लसूण, खोबरे घालून परतावे. दही घालून परतावे. गरम मसाला घालावा. चिरून वाफवलेला फणस आणि ग्रेव्हीच्या प्रमाणात मीठ घालावे. ग्रेव्ही पातळ वाटत असल्यास थोडा वेळ गॅसवर ठेवून दाट करून घ्यावी. काजूगर मिसळावे. आता मोकळा केलेला भात ग्रेव्हीत नीट मिसळून घ्यावा. कडेने तूप सोडून झाकण ठेवावे. दहा मिनीटे छान वाफ येऊ द्यावी. गरमागरम फणस पुलाव दही रायते किंवा सूप बरोबर वाढावा.Fanas Pulav

सोमवार, ९ जुलै, २०१८

रवा डोसा/ उत्तप्पा

साहित्य: रवा एक वाटी, तांदूळ पीठ दीड वाटी, बेसन अर्धी वाटी, अर्धा चमचा मिरची पेस्ट, अर्धा चमचा आलं पेस्ट, कढीलिंब, एक टेबलस्पून तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, दोन मध्यम कांदे बारीक चिरून, मीठ, दोन वाट्या ताक, पाणी
कृती: छोट्या कढईत तेल तापवून मोहोरी, हिंग आणि हळदीची फोडणी करून गार करायला ठेवावी. रवा, तांदूळ पीठ आणि बेसन एकत्र करून त्यात ताक घालावे. मिरची पेस्ट, आलं पेस्ट, मीठ आणि बारीक चिरून कढीलिंबाची दहाबारा पाने घालावीत. कांदा अगदी बारीक चिरून घालावा(ऐच्छिक). लागेल तसे पाणी घालून धिरड्या इतपत सैल करावे. गार झालेली फोडणी मिश्रणात मिक्स करावी. बीडाचा तवा तापत ठेवावा. तव्यावर तेल लावून मिश्रण पसरावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
बाजू उलटून भाजून घ्यावी. लोणी, चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावा.
टीप: रव्यामुळे प्रत्येक वेळी डोसा घालताना मिश्रण खालपासून ढवळावे. अधेमधे थोडे पाणी घालायला लागू शकते.

रविवार, १ जुलै, २०१८

चिंचगुळातली तोंडल्याची रसभाजी

साहित्य:अर्धा की तोंडली, दोन टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून जीरं, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून कांदा लसूण मसाला, एक टेबलस्पून गूळ, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, लाल तिखट एक टीस्पून, ओलं खोबरं दोन टेबलस्पून, शेंगदाणे कूट दोन टेबलस्पून, मीठ, कोथिंबीर, पाणी तीन वाट्या
कृती: 1)तोंडली स्वच्छ धुवा.
2) लांब तोंडली असतील तर देठ आणि टोक काढूनमधे दोन भाग करून चार चिरा द्या, लहान असतील तर देठ आणि टोक काढून फक्त चार चिरा द्या.
3) अर्ध पातेलं पाणी घेऊन त्यात चिरलेली तोंडली टाका.
4) लिंबाएवढी चिंच भिजत घाला.
5) कढईत तेल तापत ठेवा.
6) तेल तापलं की मोहोरी, जीरं, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा.
7) फोडणीत तोंडली टाकून दोन मिनिटं परता.
8)दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवा.
9) पाच मिनिटं छान वाफ येऊ द्या.
10) झाकण काढून तोंडली शिजलीत ना ते पहा.
11) आता त्यात मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला घाला.
12) दाण्याचं कूट आणि खोबरं घालून रस हवा असेल तसं पाणी घाला आणि उकळवा.
13) चव बघून जे हवं असेल ते वाढवा.
14) बारीक चिरून कोथिंबीर घालून पोळीबरोबर वाढा.
टीप: कांदा लसूण मसाला नसेल किंवा नको असेल तर लाल तिखट घालू शकता.