कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, ११ जुलै, २०१८

मिक्स डाळींची बीट घालून आमटी:



मला रोजची तीच तीच आमटी करायचा कंटाळा येतो. त्यात काहीतरी म्हणजे मुळा, कांदा, टॉमेटो, पालक, लाल माठ, मेथी, शेवगा, वांगं असं घालून आमटी मस्त लागते. आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत सतत नवीन प्रयोग करत रहावे लागतात. आजचा प्रयोग बिटाची आमटी

साहित्य:
 तूरडाळ, मसुरडाळ आणि मुगडाळ एकत्र करून एक वाटी, एक मध्यम बीट, एक मध्यम कांदा, एक ओली मिरची, चार लसूण पाकळ्या, तीन चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा जीरं, दोन लिंबं, चार पाच पानं कढीलिंब, एक टीस्पून गूळ, मीठ, लालतिखट एक चमचा, हळद, हिंग, ओलं खोबरं 

कृती: 
एक वाटी मिक्स डाळ धुवून तिप्पट पाणी आणि हिंग, हळद घालून शिजवून घ्यावी. बीट सोलून काचऱ्या कराव्या किंवा किसावे. कांदा सोलून चिरावा. लसूण सोलून बारीक काप करावे. मिरचीचे तुकडे करावे.
कढईत तेल तापत ठेवावे. जीरं, मोहोरी घालावी. ते तडतडल्यावर बीट, कांदा, मिरची आणि लसूण घालावी. झाकण ठेवून एक वाफ काढावी. आता हळद, लाल तिखट घालून परतावे. बीट शिजले नसेल तर थोडे पाणी घालून परत वाफ काढावी. घोटून डाळ मिक्स करावी. पातळ हवी असेल तसं पाणी मीठ, गूळ आणि लिंबाचा रस घालावा. कढिलिंबाची पानं चुरून घालावी. ओलं खोबरं घालावं. ढवळुन छान उकळी काढावी. गरमागरम आमटी भाताबरोबर मस्त लागते!

आमटीला बीटचा मस्त रंग येतो आणि चव... तुम्हीच करून पहा आणि सांगा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा