कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० जून, २०२०

अळीव लाडू:

अळीव लाडू:
साहित्य: अळीव एक वाटी(150 ग्रॅम), दोन मध्यम नारळ, गूळ, तूप दोन चमचे
कृती: अळीव नारळाच्या पाण्यात दोन तास भिजत ठेवावेत, नारळाचे पाणी कमी असेल तर थोडे साधे पाणी वापरावे. नारळ खवून घ्यावे. खोबऱ्यात भिजलेला अळीव मिसळावा. हे मिश्रण जेवढं होईल त्याच्या निम्मा  बारीक चिरलेला गूळ  घ्यावा. खोबरं आणि गूळ एकत्र करावं. कढईत दोन चमचे तूप घालून त्यात मिश्रण घेऊन मध्यम गॅसवर परतत रहावे. गूळ विरघळून मिश्रण सुकत आलं की गार होऊ द्यावे.
गार झाल्यावर आवडीप्रमाणे लाडू वळावे. या मिश्रणात 25 ते 27 लाडू होतात.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, २७ जून, २०२०

दावणगिरी लोणी स्पंज डोसा:

दावणगिरी लोणी स्पंज डोसा:
साहित्य: 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी उडीद डाळ, एक टीस्पून मेथी दाणे, मीठ, अर्धा टीस्पून सोडा
कृती: सकाळी साबुदाणा, तांदूळ, उडीद डाळ, मेथी एकत्र भिजत घालावे. रात्री बारीक वाटून त्यात चवीनुसार मीठ आणि सोडा घालून उबदार जागी ठेवावे.  सकाळी पीठ फुगून येईल. https://photos.app.goo.gl/vCSMfBTEXVhMduKv5 मध्यम आचेवर तवा ठेवून त्याला तेल लावावे. त्यावर डोसा पीठ घालावे परंतु ते पळीने पसरायला लागणार नाही इतपत असावे.https://photos.app.goo.gl/MVjwKGnf32SLwRJJ8 मस्त जाळी पडते.
आता दुसरी बाजू भाजून घ्यावी. त्यावर लोणी घालून तयार डोसा चटणी  सोबत सर्व्ह करावा.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, २६ जून, २०२०

मूगडाळ लाडू

मूगडाळ लाडू:
साहित्य: सालाशिवाय ची मूगडाळ एक की, पिठीसाखर 1 की, तूप अर्धा की, वेलची पावडर एक टीस्पून, बेदाणे
कृती: मूगडाळ कोरडी खमंग भाजून घ्या. भाजलेली डाळ रवाळ दळून आणा. दळलेलं पीठ तुपावर खमंग भाजून घ्या.
गार करीत ठेवा. गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पावडर मिसळा. पीठ नीट मिक्स करा, लागलं तर तूप घाला. बेदाणे लावून लाडू वळा. एवढया प्रमाणात 40 ते 50 लाडू होतात.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, २३ जून, २०२०

तिखट मिठाच्या खाऱ्या पुऱ्या:

तिखट मिठाच्या खाऱ्या पुऱ्या:
साहित्य: सव्वा कप पाणी, पाऊण कप पातळ साजूक तूप किंवा तेल, दोन टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार, हळद अर्धा टीस्पून,ओवा दोन टीस्पून, तळायला तेल., मैदा.
कृती: सव्वा कप  पाणी आणि पाऊण कप तूप एकत्र करा. त्यात तिखट, मीठ, हळद आणि थोडा बारीक करून ओवा घाला. हे मिश्रण उकळा आणि गार करत ठेवा. पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा घालून शंकरपाळ्यासाठी भिजवतो तेवढे घट्ट पीठ भिजवा. छोटे पुरीसाठी गोळे करा. पातळ लाटा त्याला टोच्याने किंवा काट्याने भोकं पाडा म्हणजे ती पुरी फुगणार नाही.
आता तयार पुऱ्या तळून घ्या. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. या पुरीवर सॉस लावून त्यावर कांदा, शेव घालून खाल्लं की मस्त लागतं. या पुऱ्या उरल्या तर पंधरा दिवस पण छान राहतात.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

सोमवार, ८ जून, २०२०

गोडा मसाला

गोडा मसाला: ही रेसिपी माझी आई आणि माझी मैत्रीण योजना यांच्या रेसिपीचं कॉम्बिनेशन आहे.
धने 250 ग्रॅम, जिरं 100 ग्रॅम, सुकं खोबरं 125 ग्रॅम, काळे तीळ 125 ग्रॅम, काळी मिरी  दीड टीस्पून, लवंग दीड टीस्पून, दालचिनी  दीड टीस्पून, हिंग 1 टीस्पून, हळद 1 टीस्पून, सहा सुक्या मिरच्या किंवा 1 टीस्पून लाल तिखट, मीठ दोन टीस्पून, तेल 2 टेबलस्पून
१)ह्यातील तीळ व किसलेलं खोबरं बारीक गॅसवर स्वतंत्र खमंग भाजून घ्या.२) नंतर थोडं थोडं तेल घालून धने व जिरे स्वतंत्र भाजा.३) थोड्या तेलावर लवंग, दालचिनी व मिरी एकत्र भाजा. ४) ते तडतडायला लागल्यावर त्यातच हिंग, मीठ, हळद व तिखट किंवा सुक्या मिरच्या घालून थोडंसं भाजून झालं की गॅस बंद  करा. ५)सगळे भाजलेले जिन्नस एकत्र करून ठेवा. ६)गार झाल्यावर मिक्सरला बारीक करा. ब्राम्हणी गोडा मसाला तयार आहे! हा मसाला रोजची आमटी, चिंच गुळाच्या भाज्या, भरलं वांगं, कटाची आमटी, पंचामृत यात मस्त लागतो. तसेच यावर कच्चं तेल घातलं की भाकरी जवळ दुसरं काही नको!