कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

रवा बटाटा पराठा

 रवा बटाटा पराठा: 


साहित्य: अर्धा कप बारीक रवा, दोन बटाटे, एक कप कणिक, आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, ओवा 1 टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, मीठ, कोथिंबीर मूठभर, पाणी, तेल

कृती: अर्धा कप रव्यात एक कप गरम पाणी घालून दहा मिनिटं झाकून ठेवा.  बटाटे शिजवून सोलून किसून घ्या. दहा मिनिटांनी रव्यात किसलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, तिखट, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट घाला. सर्व मिश्रण एकत्र करून हळूहळू कणिक घालत पोळीसारखी कणिक तयार करा.  बहुतेक पाणी लागत नाही भिजवताना, लागलं तर थोडं वापरा. एक टीस्पून तेल घेऊन कणिक नीट मळून ठेवा.

दहा मिनिटं कणिक मुरू द्या. आता नेहमीप्रमाणे पराठा लाटून दोन्ही बाजूने तेल सोडून भाजा. मस्त खुसखुशीत पराठा तयार आहे. लोणी, सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा.



शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

आलू मेथी पराठा

 


एखादा सतत उत्साहाने खळाळता झरा पाहिला की मन कसं प्रसन्न होऊन जातं... अशी माणसं जेव्हा आपली जिवलग असतील तेव्हा राजहंसाच्या डौलदार चालीकडे पहात रहावंसं वाटतं.. खूप काही शिकत! 

माझी आत्या सुनीता गोरे खेडेगावात बालपण जाऊनही मुंबईच्या वातावरणात छान रुळली.  आधी महानगरपालिकेत नोकरी करून त्यानंतर आपला अभिनयाचा छंद जोपासला, तरीही घरातल्या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने करत असते. नाटक, सिनेमा, मालिका, जाहिराती सगळ्याच ठिकाणी काम करत असताना पहाटे उठून घरी जेवण करून जायची सवय आज 77 व्या वर्षीही कायम आहे. स्वभावातील परखडपणा, सतत नवीन शिकण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा आजही वाखाणण्यासारखी आहे!  घरी कोणीही येणार असेल तर अक्षरशः विविध पदार्थांची रेलचेल असते. आजही ती वनिता समाज, चतुरंग प्रतिष्ठान, दिलासा, संवाद, ब्राह्मण सेवा मंडळ, कलाकार संघ या सगळ्या संस्थांमध्ये सक्रिय आहे. तरीही आम्ही येणार म्हटल्यावर बासुंदी, कोथिंबीर वडी, आमटी, भात, पोळ्या, मुलांना खायला डिंक लाडू, शंकरपाळे सगळं स्वतः करून ठेवलंय!

तिची खूप दिवस इच्छा होती की मी तिची स्पेशल रेसीपी लिहावी!

आज घेऊन आलेय आत्याची स्पेशल रेसीपी

आलू मेथी पराठे! 

साहित्य: एक जुडी मेथी, चार बटाटे, एक चमचा मिरची पेस्ट, एक चमचा आलं लसूण पेस्ट, चार वाट्या कणिक, मीठ, तेल, फोडणीचं साहित्य

कृती: मेथी निवडून स्वच्छ धुवा. बारीक चिरून घ्या. दोन चमचे तेलाची मोहोरी हळद घालून फोडणी करा. त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान परता. त्यावर मंद गॅसवर मेथी घालून परतत रहा.


बटाटे शिजवून घ्या. मेथी खूप वेळ त्यातील पाणी जाईपर्यंत परतायची आहे, घाईघाईने नाही....इति आत्या! आता शिजलेला बटाटा कुस्करून या मेथीत मिक्स करा, मीठ घाला. मिश्रण कोरडे होईपर्यंत मंद गॅसवर परतत ठेवा.

पोळ्यांना भिजवतो तशी मीठ, तेल घालून कणिक भिजवून झाकून ठेवा. 

भाजी नीट कोरडी झाली की गार होऊ द्या. छान मळून त्याचे सारखे गोळे करून घ्या.


सारणा एवढाच कणकेचा गोळा घ्या. मोदकाची करतो तशी कणकेची वाटी करून त्यात सारण भरून बंद करा.

तांदळाच्या पाठीवर पराठा लाटा. तव्यावर तेल सोडून छान भाजून घ्या. चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

आधीपासून सगळे गोळे भरून ठेवू नका. खायला बसल्यावर गरमागरम पुरणपोळी सारखे मऊसूत पराठे वाढा. 


या वयात पहाटे तीन वाजता उठून हे सगळं करून त्याच उत्साहात आम्हाला आयतं करून देणारी मिळणं हे आमचं भाग्य! आमच्या या सुगरणीला हा फक्त मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻...एक मैत्रीण मला म्हणाली तसं राजहंस कितीही डौलदार चालत असला म्हणून बाकीच्यांनी चालूच नये असं थोडंच आहे😊 

 त्यामुळे शक्य तेवढं शिकत राहून आपणही चालायचा प्रयत्न करायचाच... रुबाबदारपणे!!!

✍🏻 मिनल सरदेशपांडे

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

मसुरडाळ ढोकळा

 मसुरडाळ ढोकळा: 


 साहित्य: मसुरडाळ एक कप, तांदूळ अर्धा कप, मेथी पाव चमचा, आलं लसूण पेस्ट 1 टीस्पून, मिरची पेस्ट अर्धा टीस्पून, मीठ, तेल एक टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, धने पाव टीस्पून, तीळ अर्धा टीस्पून, कोथिंबीर, खोबरं, एक लिंबू, अर्धा टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून तेल, पाणी

 कृती: सकाळी मसुरडाळ, तांदूळ आणि मेथी एकत्र भिजवा. रात्री वाटून  आबवत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी पिठात आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट मीठ घाला आणि लिंबू पिळा. इडली इतपत पीठ असू द्या. कूकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवा. ज्यात ढोकळा वाफवायचा त्या डब्याला तेल लावा. कुकरमधील पाणी उकळायला लागलं की पिठात एक टीस्पून तेल आणि खायचा सोडा घालून भराभर ढवळा. कुकरच्या तेल लावलेल्या डब्यात ओता, कुकरमध्ये डबा ठेवा, शिट्टी काढून 20 मिनिटं वाफवा. तेलाची मोहोरी, धने तीळ घालून फोडणी करा. फोडणीत पाव कप पाणी आणि एक टीस्पून साखर घाला.  तयार ढोकळ्यावर ही फोडणी घाला.कोथिंबीर धुवून बारीक चिरा. खोबरं कोथिंबीर घालून सजवा


येडमी पुरी

 कुरकुरीत पुरी:


ही पुरी कुरकुरीत होते आणि दहा पंधरा दिवस सहज टिकते, उरली तर☺️ 

साहित्य: 

पारी साठी: पाऊण कप मैदा, पाव कप बारीक रवा, मीठ, हळद पाव टीस्पून, ओवा अर्धा टीस्पून, 2 टेबलस्पून तूप, पाणी

स्टफिंग साठी: बेसन एक कप, दोन टेबलस्पून तेल, एक टीस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून मिरची पेस्ट, तीळ 1 टीस्पून, जीरं पावडर अर्धा टीस्पून, हळद, कोथिंबीर मूठभर, मीठ, पाणी लागलं तर 

तेल तळणीसाठी

कृती:  रवा मैदा, हळद, मीठ, ओवा आणि तूप एकत्र करावे. लागेल तसं पाणी घेऊन घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. बेसनात आलं लसूण मिरची पेस्ट, तीळ, जीरं पावडर , मीठ सगळं एकत्र करावं. कढल्यात तेल गरम करून ते बेसनात घालावं.  नीट मिक्स करून चव बघावी. बेसनाचे मिश्रण थोडं सणसणीत तिखट हवं. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट भिजवावं. 


मैद्याच्या आणि बेसनाच्या सारख्या गोळ्या करून घ्याव्या. मैद्याची वाटी करून त्यात बेसनाची गोळी भरावी,


बंद करून पातळ पुरी लाटावी.


पुरीला काट्याने टोचे मारावेत. कढईत तेल तापत ठेवावे. मध्यम गॅसवर पुऱ्या तळाव्यात. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात. 

छान कुरकुरीत होतात. 


टीप: तुम्हाला कुरकुरीत न करता लगेच खायला हव्या असतील तर टोचे न मारता तळा मस्त कचोरी सारख्या फुगतात.


सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१

आंबे हळदीचं लोणचं

 आंबे हळदीचं लोणचं: 


साहित्य: पाव किलो आंबेहळद, दोन लिंबं, लोणचं मसाला 50 ग्रॅम, तेल पाव कप, मोहोरी अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, मीठ दोन टीस्पून

कृती: आंबे हळदीचे कांदे आतून पांढरे असतात आणि त्याला आंब्याचा वास येतो. तेल कढल्यात गरम करावे. मोहोरी घालावी, ती तडतडली की  गॅस बंद करून हिंग, हळद आणि सर्वात शेवटी लाल तिखट घालावे. गार होऊ द्यावी. स्वच्छ धुवून, पुसून हळद सोलून घ्यावी. किसून घ्यावी.  किसलेल्या हळदीत लिंबू  रस घालावा. मीठ, लोणचं मसाला आणि गार झालेली फोडणी मिक्स करावी. मस्त चविष्ट लोणचं तयार!!

✍🏻 मीनल सरदेशपांडे

सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

चिंच खजूर गुळाची चटणी

 चिंच  खजूर गुळाची चटणी: 


साहित्य: अर्धा कप चिंच बिया काढलेली, दीड कप गूळ, पाव कप बेदाणे, खजुर 8, जीरं पावडर 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, सैंधव 1 टीस्पून, साधं मीठ पाव टीस्पून, पाणी 3 कप, सुंठ पावडर अर्धा टीस्पून

कृती: चिंच, बेदाणे, खजुर बिया काढून तुकडे हे सर्व एका पातेल्यात घ्या. गूळ चिरून तो घाला. आता त्यात 3 कप पाणी घालून उकळायला ठेवा. उकळत असताना, काळं मीठ, सैंधव, साधं मीठ, धने जीरे पावडर, सुंठ पावडर, लाल तिखट सगळं एकेक करून घालावे. मंद गॅसवर अर्धा तास उकळत ठेवावे.  गार करत ठेवावे. गार झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यावे.   एक टीस्पून तेल कढल्यात गरम करावे. त्यात चिमूटभर जीरं, धने आणि बडीशेप घालावे.  तडतडल्यावर गॅस बंद करावा. ही फोडणी तयार चटणीला द्यावी. 

टीप: ही चटणी सहा महिने सुध्दा फ्रीजमध्ये चांगली राहते.


चिंचेच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे.