कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ मार्च, २०१९

चटपटीत शंकरपाळे:

चटपटीत शंकरपाळे:

एखादया माणसाची आपल्याला इतकी सवय होऊन जाते ना की कोणत्याही त्याच्या आवडीच्या गोष्टी करताना आठवण येतेच. आपली माणसं कितीही वर्ष असली तरी ती हवीशी असतात. तसं असलं तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात थोड्याच असतात?
23 फेब्रुवारीला माझी आई आम्हाला पोरकं करून निघून गेली. तिच्या प्रत्येक फोनवर ती कुठेतरी वाचलेली नवीन रेसीपी मला सांगायची. किती छान झालेलं हे वर्णन भरभरून करायची. मुख्यतः ज्या गोष्टी फुकट जातील त्यापासून खूप काही बनवायची ती! फेण्या, पापड, कुरडई हे तिच्या अत्यन्त आवडीचे विषय! फणसाचे पापड, रताळ्याच्या, सुरणाच्या, पोह्यांच्या फेण्या मला तर प्रकार पण माहीत नाहीत. नियमितपणे रोज एक छोटा गोळा भिजवायचाच. आत्ताही लेबल लावून नाव लिहून पॅक केलेल्या फेण्या आहेत तिच्या, शेवटपर्यंत ती स्वावलंबी होती.

तिच्या इतकं नाही तरी करीत राहीन काहीतरी असं सांगितलंय मी तिला!

आज मटार करंजी केली त्याचा रवा मैदा भिजवलेला उरला थोडा, मग त्याची पोळी लाटली. त्यावर जीरावन मसाला पसरला, घडीच्या पोळी सारखी घडी करून पोळी लाटली आणि केले शंकरपाळे! मस्त चटपटीत, कुरकुरीत झालेत! चहा आणि सोबत शंकरपाळे.. अहाहा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा