कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १४ मार्च, २०२१

रव्याची कुरकुरीत भजी

 रव्याची कुरकुरीत भजी:


साहित्य: 1 कप (250 ml)  न भाजलेला रवा, अर्धा कप दही, पाव कप गाजर कीस, पाव कप बारीक चिरलेला कांदा, 1 बटाटा सोलून किसून, 1 टीस्पून आलं, 1 टीस्पून मिरची पेस्ट, पाव कप कोथिंबीर, दोन टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, मीठ, अर्धा टीस्पून खायचा सोडा, पाणी, तळणीसाठी तेल

कृती: रव्यात किसलेलं गाजर,  बटाटा,कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं मिरची पेस्ट , मीठ आणि दही घाला. अर्धा कप पाणी घाला आणि अर्धा तास  मिश्रण झाकून ठेवा.  आता त्यात कॉर्न फ्लोअर आणि खायचा सोडा मिक्स करा. मिश्रण भज्यांच्या पिठाइतपतच सैल हवं. तळणीसाठी कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर मध्यम गॅसवर भजी तळून घ्या.


टॉमेटो सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करा. जेवताना काहीतरी तळण म्हणूनपन करू शकता.

टीप: यात कांदा न घालता तुमच्या आवडीने कोणत्याही भाज्या घालू शकता.  मला ज्यात त्यात लसूण आवडत नाही तुम्हाला हवी तर घाला. 


भजी मस्त कुरकुरीत होतात नक्की करून पहा.


टॉमेटो ऑम्लेट

 टॉमेटो आम्लेट: 


साहित्य: 3 टॉमेटो, 2 कांदे, दहा लसूण पाकळ्या, चार मिरच्या किंवा 1 टीस्पून लाल तिखट, कोथिंबीर पाव कप, मीठ, बेसन दोन कप, तांदूळ पीठ अर्धा कप, हळद अर्धा टीस्पून, पाणी, तेल

कृती: कांदा, टॉमेटो बारीक चिरून घ्या. लसूण, मिरची अगदी बारीक चिरा. कोथिंबीर धुवून बारीक चिरा.  एका पातेल्यात बेसन, तांदूळ पीठ एकत्र करा. त्यात मिरची, कोथिंबीर, कांदा, टॉमेटो, लसूण, मिरच्या किंवा लाल तिखट, मीठ, हळद सर्व एकत्र करा. हळूहळू पाणी मिक्स करा. खूप जास्त पातळ नको. चव बघून तिखट मीठ वाढवा. तवा तापत ठेवा. तापल्यावर गॅस मंद करून तव्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रण धिरड्या सारखं पसरा.


झाकण ठेवा. दोन मिनिटांनी झाकण काढून बाजू पलटा. आता गॅस मोठा करून बाजूने तेल सोडून ती पण बाजू भाजून घ्या. गरमागरम टॉमेटो आम्लेट लोण्यासोबत सर्व्ह करा.

पडवळ मसाला भाजी

 पडवळ मसाला भाजी: 


साहित्य: अर्धा किलो पडवळ, 1 टेबलस्पून साऊथ इंडियन मसाला, दोन टेबलस्पून ओलं खोबरं, एक टीस्पून साखर, मीठ, दोन टीस्पून तेल, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट, कढीलिंब पाने

कृती: पडवळ धुवुन बिया काढून काचऱ्या करून घ्या. बिया कोवळ्या असतील तर चटका करायला ठेवून द्या. मसाला मी आधी करून ठेवला. कढईत तेल तापत ठेवा. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करा. आता पडवळ, कढीलिंबाची पाने घालून परता. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्या. पडवळ शिजल्यावर त्यात मीठ, साखर, ओलं खोबरं आणि मसाला घालून परतत रहा. बाजूने तेल सुटलं की गॅस बंद करा. 

पोळीबरोबर सर्व्ह करा. 

साऊथ इंडियन भाजीचा मसाला:

 साहित्य: एक कप खोबऱ्याचा किस, दोन टेबलस्पून धने, दोन टेबलस्पून चण्याची डाळ, दोन टेबलस्पून उडीद डाळ, दोन टेबलस्पून तीळ, एक टेबलस्पून जीरं, अर्धा टीस्पून मेथी दाणे, एक टीस्पून मिरी, सात आठ सुक्या मिरच्या, दहा बारा कढीलिंबाची पाने, मीठ 1 टीस्पून

 कृती: सर्व घटक वेगवेगळे भाजून घ्या.  मिक्सर जारमध्ये घालून  बारीक वाटून घ्या.  तयार मसाला बरणीत भरून ठेवा.

मीनल सरदेशपांडे

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

घेवड्याची भाजी

 घेवड्याची भाजी: 


 साहित्य: घेवडा अर्धा किलो, एक टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून ओवा, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून लाल तिखट,  हळद पाव टीस्पून, दीड टीस्पून सांडगी मिरची म्हणजे चार मिरच्या तळून बारीक केलेल्या, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ 1 ते दीड टीस्पून, मीठ

कृती: शेंगा दोर काढून सोलून, धुवून वाफवून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात सांडगी मिरची तळून बाजूला ठेवा.  आता मोहोरी, ओवा, हिंग, हळद, लाल तिखट अशी फोडणी करा. त्यात शेंगा घालून परता. सांडगी मिरची चुरून किंवा मिक्सर जारमध्ये घालून पावडर करा. भाजीत मीठ, गूळ, सांडगी मिरची , ओलं खोबरं घालून नीट परता. गूळ विरघळला की चव बघा काही लागलं तर वाढवा. 

मी परतून करते त्यामुळे पाणी नाही ठेवलं.  दाणे जून असतील तर फोडणीत नीट शिजत नाहीत म्हणून मी वाफवून घेतली. ओलं खोबरं भरपूर छान लागतं. सांडगी मिरचीचा फ्लेवर छान वाटतो भाजीला! 


तुम्ही तुमची पध्द्त शेअर करा☺️ अजून नवीन काही सापडेल!

बुधवार, १० मार्च, २०२१

शेंगदाण्याची आमटी

 शेंगदाण्याची आमटी:


साहित्य: अर्धा कप  दाण्याचं कूट, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, दोन ओल्या मिरच्या, 4 लवंगा, चार आमसुलं, एक टीस्पून गूळ, एक टीस्पून तूप, पाव टीस्पून जीरं, अर्धा इंच आलं, मीठ, पाणी

कृती: दाण्याचं कूट, खोबरं, मिरच्या, लवंग, आलं सगळं एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून मिक्सर जारमध्ये घालून बारीक पेस्ट करा. ही तयार पेस्ट एका पातेल्यात घ्या. त्यात तुम्हाला दाट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला. मीठ, गूळ, आमसुलं घाला. तूप जिऱ्याची फोडणी घालून आमटी उकळा. चव बघून लागेल ते वाढवा.


टीप: वरील साहित्यातील जे पदार्थ तुम्ही उपासाला खात नाही ते आपापल्या श्रद्धेनुसार वगळा.

वरीच्या भगरी सोबत ही आमटी मस्त लागते.

मीनल सरदेशपांडे

बीट केक

 बीट केक:


साहित्य: 1 मध्यम बीट, अर्धा कप दूध, अर्धा कप दही, 1 कप पिठी साखर,, अर्धा कप तेल,  दीड कप मैदा, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून खायचा सोडा, 1 टीस्पून व्हीनिगर, चिमूटभर मीठ

कृती: बीट सोलून किसून घ्या. किसात थोडं दूध घालून बारीक पेस्ट करून घ्या.  कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्या. कुकरमध्ये एक वाटी मीठ पसरा. आता मध्यम गॅसवर कुकर  दहा मिनिटं प्रिहिट करायला ठेवा.

एका भांड्यात बीट पेस्ट, तेल पिठीसाखर, दही, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळणीने चाळून फेटलेल्या मिश्रणात मिक्स करा. एक दिशेने ढवळत रहा, हळूहळू त्यात उरलेलं दूध मिक्स करा. केकच्या भांड्याला तेल लावून घ्या. आता तयार मिश्रणात व्हीनिगर घालून मिश्रण पटापट फेटा आणि केकच्या भांड्यात ओता.  मिठावर स्टीलचा स्टॅण्ड ठेवून त्यावर केकचं भांडं ठेवा.


कुकरचं झाकण लावून दहा मिनिटं मध्यम गॅसवर आणि 35 मिनिटं बारीक गॅसवर केक भाजा. 45 मिनिटांनी झाकण उघडून बघा, सूरी घालून त्याला केक चिकटला नाही की केक तयार!

1 कप = 250ml

✍🏻

मीनल सरदेशपांडे

सोमवार, ८ मार्च, २०२१

मेथी दुधी मसाला

 मेथी दुधी मसाला: 


ही भाजी मी 2010 साली एका गृपवर पोस्ट केली त्यानंतर माझ्याच भाजीच्या फोटोसह ती अनेकांनी ढापली आणि स्वतःची म्हणून एकही शब्द न बदलता तशीच पोस्ट केली. आजही गुगल सर्च केलं तर माझ्या नावाशिवाय ही कृती मिळते. असो☺️ आनंद आहे  आपले प्रयोग इतके यशस्वी झालेत की इतरांना ते चोरावेसे वाटले! तर अशी ही प्रसिद्ध झालेली माझी रेसिपी☺️

साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टॉमेटो,दहा -बारा लसूण पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.

कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चिरून घ्यावेत. टॉमेटो बारीक चिरावेत. लसूण सोलावी. आले साले काढून घ्यावे. पातेल्यात दोन चमचे तेल तापवावे. तेलात कांदा टाकावा.तो परतल्यावर त्यात लसूण, आले चिरून टाकावे. टॉमेटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चांगली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसूण,आले, टॉमेटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे. वाफवलेला दुधी भोपळा मिसळावा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. पोळीबरोबर गरमागरम वाढावी.


टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.