कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, ८ मार्च, २०२१

मेथी दुधी मसाला

 मेथी दुधी मसाला: 


ही भाजी मी 2010 साली एका गृपवर पोस्ट केली त्यानंतर माझ्याच भाजीच्या फोटोसह ती अनेकांनी ढापली आणि स्वतःची म्हणून एकही शब्द न बदलता तशीच पोस्ट केली. आजही गुगल सर्च केलं तर माझ्या नावाशिवाय ही कृती मिळते. असो☺️ आनंद आहे  आपले प्रयोग इतके यशस्वी झालेत की इतरांना ते चोरावेसे वाटले! तर अशी ही प्रसिद्ध झालेली माझी रेसिपी☺️

साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टॉमेटो,दहा -बारा लसूण पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.

कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चिरून घ्यावेत. टॉमेटो बारीक चिरावेत. लसूण सोलावी. आले साले काढून घ्यावे. पातेल्यात दोन चमचे तेल तापवावे. तेलात कांदा टाकावा.तो परतल्यावर त्यात लसूण, आले चिरून टाकावे. टॉमेटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चांगली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसूण,आले, टॉमेटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे. वाफवलेला दुधी भोपळा मिसळावा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. पोळीबरोबर गरमागरम वाढावी.


टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा