कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ मार्च, २०२५

पौष्टिक चटणी पुडी

 पौष्टिक चटणी पुडी:

तर झालं काय मध्यंतरी मी अशा भोपळ्याच्या बिया, चणे,  शेंगदाणे, सूर्यफूल बिया एकत्र करून खाण्यासाठी ठेवल्याची पोस्ट लिहिली.



तेव्हा माझी मैत्रीण Rupali Sohoni 

म्हणाली की तिच्याकडे त्यातले दाणे तेवढे वेचून खातील आणि बाकी तिलाच खावं लागेल...अरेच्चा हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. सगळ्यांच्या पोटात सगळं जावं हा उद्देश कसा सफल होणार?😄😄


आज दुसरी युक्ती.. हे सगळं एकत्र भाजून कुरकुरीत करून घेतलं. 

साधारण बाकी सगळं एकेक वाटी आणि चणे दोन वाटी असे 

एकत्र करून... त्यात तिखट, मीठ, साखर आणि आमचूर पावडर घालून भरडसर चटणी केली कोरडी!

आता त्यात वरून तेल घालून खा किंवा तूप... डोसा, आंबोळी बरोबर खा किंवा परतून भाजीत वरून पीठ पेरतो अशी घाला. बघा करून, आमच्याकडे तर आवडली.. आता वेचून बाजूला करायचा चान्स नाही😝😄😄😄


✍️ मीनल सरदेशपांडे

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

मुगाचे थालिपीठ

 मुगाचे थालिपीठ:

#पौष्टिक 

#नाश्ता 

नमस्कार मंडळी, 

लहानपणी डाळिंब्या आमटी किंवा उसळ असेल तर मुद्दाम दुसऱ्या दिवशी त्यात भाजणी घालून थालिपीठ करायची आजी ते पण पातेल्यात, इतकं छान खमंग लागायचं ते... मधेच येणारी डाळिंबी, त्या उसळीने वेगळीच हवीहवीशी चव यायची त्याला. काल अशीच मुगाची उसळ उरली आणि या थालीपीठाची आठवण झाली. 

काल प्रत्येक जण खाताना म्हणत होतं आज थालिपीठ मस्तच झालय खुसखुशीत अगदी😄 तुम्हाला शिळी उसळ नसेल तर म्हणून शिजवून मूग रेसिपी दिलीय. त्याच्या पाण्यातच पीठ भिजवायचे.

 


साहित्य: दोन वाट्या शिजलेले मूग, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, तिखट, मीठ, हळद, कांदे दोन बारीक चिरून, पाणी गरजेनुसार


कृती: मूग भिजवून शिजवून घ्या. त्यात चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि कांदा घाला. सगळं नीट मिक्स करून मावेल तेवढी भाजणी घाला. 

मला यात पाणी लागले नाही अजिबात.

आता थालिपीठ थापून दोन्ही बाजूंना तेल सोडून खमंग भाजून घ्या.


लोणी, दही याबरोबर सर्व्ह करा.

केळीचे पान जसे होते तसे थापल्याने 

त्याच आकारात झालेय थालिपीठ!

✍️ मीनल सरदेशपांडे

मुगडाळ पीठ गुळपापडी:

 मुगडाळ पीठ गुळपापडी:



#पारंपरिक 

#पौष्टिक

साहित्य: एक वाटी  पातळ तूप, एक वाटी बारीक चिरून गूळ, दोन वाट्या मुगडाळ पीठ, अर्धी वाटी सुकं खोबरं, चार चमचे पोहे, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, दोन टीस्पून सुंठ पावडर, काजू  किंवा बदाम काप, 


कृती: मी मुगडाळ छान तांबूस भाजून रवाळ दळून घेतली होती. खोबरं  भाजून बाजूला ठेवा. कढईत एक वाटी तूप घ्या. व्यवस्थित गरम झालं की त्यात पोहे तळून घ्या. ते बाजूला ठेवा( इथे तुम्ही dryfruits तुकडे पण घेऊ शकता किंवा डिंक पण चालेल, मला कुरकुरीत पोहे आवडतात.)

आता त्याच तुपात मुगडाळ पीठ घालून पाच मिनिटं भाजून घ्या.

मुळात भाजलेलं असल्याने फार वेळ लागत नाही. हे भाजत असताना ताटाला तूप लावून घ्या. भाजलेल्या पिठात जायफळ पावडर, सुंठ पावडर मिक्स करा. खोबरं आणि तळलेले पोहे घाला. गॅस बंद करा. बारीक चिरलेला गूळ मिश्रणात घालून पटापट ढवळत नीट मिक्स करा. गूळ बारीक चिरला

की खडे तसेच राहत नाहीत. 

मिश्रण तूप लावलेल्या ताटात काढून वाटीच्या तळाला तूप लावून सारखं करा. काजू किंवा बदाम काप किंवा खोबरं किसाने सजवा.(ऐच्छिक)


टीप: याच प्रमाणात कुळीथ पीठ पापडी पण छान होते. कुळीथ पिठी मिळते त्याची पण होते आणि झटपट... 

मुगडाळ किंवा कुळीथ दोन्हीही उग्र असल्याने त्याला गूळ यापेक्षा कमी चालत नाही. 

✍️ मीनल सरदेशपांडे

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

छोले

 #भाजीकांदालसूणविरहीत 



छोले: खरं तर कांदा लसूण न घालता कसे लागतील हा प्रश्नच होता. पण काल श्रावण सोमवार असल्याने ते शक्य नव्हतं घालणं, मुलांच्या आवडीची भाजी पण व्हायला हवी होती. आवडली सगळ्यांना म्हणून शेअर करतेय.


साहित्य: पाव किलो काबुली चणे, दोन टॉमेटो, दहा पाकळ्या काजू, आलं एक टीस्पून, दोन मिरच्या, एक टीस्पून पुदिना पेस्ट, एक टीस्पून आमचूर, पाव टीस्पून काळे मीठ, एक तुकडा दालचिनी, एक छोटं तमालपत्र, एक टीस्पून छोले मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट, मीठ, साखर १ टीस्पून ( ऐच्छिक). पाणी, तेल, जिरं अर्धा टीस्पून


कृती: काबुली चणे  रात्री भिजत घाला. 

सकाळी थोडं मीठ, दालचिनी आणि तमालपत्र घालून शिजवून घ्या. 

टॉमेटो, मिरच्या, पुदिना, काजू, आलं असं सगळं एकत्र वाटून घ्या. कढईत तेल तापत ठेवा त्यात जिरं घाला. ते तडतडल्यावर त्यात वाटप घाला. मी यात वाटपात परतताना थोडं काश्मिरी लाल तिखट घालते. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. दालचिनी आणि तमालपत्र काढून किंचित एकजीव करून छोले त्यात घाला. आता चव बघून त्याप्रमाणे काळे मीठ घाला. आमचूर, छोले मसाला किंवा गरम मसाला घाला. लागेल तसं पाणी घाला. छान उकळी काढा. चव बघून लागलं तर लाल तिखट घाला. हवी असेल तर अगदी किंचित साखर घाला. तयार झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 


टीप: पुदिना नको असेल तर वगळा पण स्वाद छान येतो आणि पुदिना, काळे मीठ पचनाला मदत करते. 

कांदा लसूण नाहीये हे कळत पण नाही असं नाही म्हणणार पण चव चांगली येते. इथे जो कांद्याचा गोडवा येतो तो balance करायला काजू घेतलेत.


✍️ मीनल सरदेशपांडे

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

आंबा करंजी

 आंबा करंजी:


नमस्कार मंडळी अलीकडे बऱ्याच दिवसात काहीच नवीन पदार्थ लिहिला नव्हता. आज ओल्या नारळाची आमरस घालून केलेली करंजी!


साहित्य: 

पारीसाठी: दोन कप मैदा, चार टेबलस्पून बारीक रवा, चार टेबलस्पून तेल मोहनासाठी, मीठ, पाणी


सारणासाठी: दोन कप ओलं खोबरं, दोन कप टिन मधला किंवा ताजा आमरस, अर्धा कप साखर


कृती: ओलं खोबरं, आमरस, साखर एकत्र करून मोदका प्रमाणे सारण करून घ्या. तुम्हाला हवी तर वेलची घाला.. मला आंब्याचाच स्वाद आवडतो. सारण गार होईपर्यंत पारीची तयारी करा. रवा, मैदा  आणि चवीपुरतं मीठ एकत्र करा. तेल कडकडीत गरम करून पिठात घाला. आमरस ताजा असेल तरच थोडा अगदी अर्धी वाटी पिठात घाला. नाहीतर किंचित कलर हवा तर... आता पाणी घेऊन पीठ मळून अर्धा तास तरी झाकून ठेवा.



नेहमीप्रमाणे पारी लाटून सारण भरून कातून मध्यम आचेवर तळून घ्या.



टीप: आमरस टिन मधला असेल तर त्यात साखर असते त्यामुळे अर्धा कप पुरते. ताजा असेल तर थोडी जास्त लागू शकते.


आटवलेला रस घालून पण करता येते पण त्याचा सारण करताना अंदाज यायला हवा नाहीतर कडक होऊ शकतं. आटवलेला आमरस घ्यायचा असेल तर दोन कप खोबरं असेल तर पाव किलो घ्या... रस, खोबरं, साखर सगळं एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा मग सारण करा. थोडं सैल असताना गॅस बंद करा, गार झाल्यावर होईल मोकळं.



✍️मीनल सरदेशपांडे

रविवार, ७ जुलै, २०२४

नासकवणी

 नासकवणी:

आज बऱ्याच दिवसांनी  गिर गायीचं दूध मिळालं आणि हे आठवलं.



माझ्या लहानपणी गायी गुरं होती गोठ्यात म्हणजे वैभव होतं म्हणा ना... आणि आत्तासारखी ती काम झाल्यावर उन्हापावसात रात्रभर बाहेर सोडून निवांत झोपणारे मालक नसल्याने एक दिवस जरी आपलं वासरू किंवा कोणीही आलं नाही तर कंदील घेऊन शोधायला बाहेर पडायचो आम्ही. आता रस्त्यावर रात्र रात्र निवारा शोधणारी गायी, वासरांचे कळप बघितले की पाणी येतं डोळ्यात😥


घरचं दूध असल्याने असेल आम्ही 

भावंडं चहा पीत नव्हतो. जेव्हा दूध असेल तेव्हा फेसाळलेलं निरसं दूध, नसेल तेव्हा काही नाही. मी लग्नानंतर पहिल्यांदा चहाची चव बघितली.

गायीचेच दूध मुलांना द्यायचे असा दंडक होता बाबांचा म्हणजे बुध्दी तल्लख होते!


घरात खरवसासाठी चिकाचे दूध आले की आधी वासराला देवून मग उरलेल्या दुधाचा खरवस! घट्ट खरवस करताना कधी कधी घरचं साधं दूध नसेल तर दुप्पट नारळाचं दूध आणि जायफळ घालून गुळातला खरवस व्हायचा. सुरवातीला वासराला एकदम चीक पचणार नाही म्हणून तीन वेळा थोडं थोडं दिलं जायचं.एखादं चुकार वासरू पिऊ शकत नसेल तर दोन पायात तोंड धरून बाटलीने पाजायचं. तशी माणसासारखी आळशी जमात नसल्याने एक दोन दिवसात ते वासरू शिकायचंच. 


गावात घरटी भरपूर गुरे असल्याने खरवसाचे नावीन्य नव्हते. मला तर पातळ खरवस म्हणजेच हे नासकवणी फार आवडायचे. दूध नासायचे बंद झाले तरी कोवळ्या दुधाचा भरवसा नसायचा. जरा उकळताना फुटतय असं वाटलं की गूळ,  उगाळून जायफळ घातलं की काय मस्त लागायचं ते😊


त्यातही भरपूर दूध असेल तर हे कोवळे 

दूध आटवून आई त्याचा साखर घालून गोळा करायची...मस्त तांबूस कलाकंद( हे आत्ता कळलेलं नाव) काय  भारी लागायचा म्हणून सांगू😋😋

या आटवलेल्या गोळ्याच्या कधी कधी पोळ्या पण करायची आई! 

आई आमची गोड पोळ्या करण्यात एक्स्पर्ट होती अगदी! माझ्या लेकाला पण असं निरसं दूध मिळायचं आजीकडे गेल्यावर... तो घरी आला की म्हणायचा आजीकडे दूध असतं त्यात साय नसते...मस्त फेस पण असतो त्याला 😄😄 तसं आपल्याकडे येत नाही!


आज हे दुधाचं नासकवणी केलं नि प्रत्येक चमचा एकेक आठवण जागवत तृप्त करत आनंदाचे एकेक कप्पे उलगडत गेला... परत एकदा लहान व्हावं असं वाटू लागलं😊


✍️ मीनल सरदेशपांडे

कोकम रस्सम

 काय मंडळी पाऊस जोरदार पडतोय ना? अशावेळी गरमागरम काहीतरी प्यायला मजा येते... म्हणजे ते सूप, रस्सम असं म्हणतेय😄

आज केलय कोकम रस्सम!


#कोकमरस्सम:


साहित्य: एक वाटी आगळ, पाच टेबलस्पून तूरडाळ, चार टेबलस्पून रस्सम पावडर, मीठ, लाल तिखट एक टीस्पून, गूळ एक टीस्पून(ऐच्छिक), फोडणीसाठी तेल, जिरं अर्धा टीस्पून मेथी दाणे अर्धा टीस्पून, सुक्या मिरच्या चार पाच तुकडे, कढीलिंब पाने पाच सहा, हिंग पाव टीस्पून, पाणी साधारण एक वाटी आगळ असेल तर दहा वाट्या तरी हवं.

कृती: तूरडाळ शिजवून घ्या. एका पातेल्यात आगळ, पाणी, रस्सम पावडर, मीठ, गूळ, तिखट हे सगळं एकत्र करा. त्यात शिजलेली तूरडाळ घोटून घाला. तेलाची जिरं, मेथी, मिरची, कढीलिंब आणि हिंग घालून फोडणी करा. तयार मिश्रणाला द्या. आता रस्समला उकळी काढा. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चव बघून काय हवं तर वाढवा. गरमागरम रस्सम नुसतं प्यायला पण छान लागतं.


रस्सम पावडर:

साहित्य: पाच टेबलस्पून तूर डाळ, पाच टेबलस्पून चणाडाळ, पाच टीस्पून धने, दोन टीस्पून जीरं, दोन टीस्पून मिरी, सुक्या मिरच्या दहा बारा, काश्मिरी लाल तिखट 1 टीस्पून

कृती: डाळी, धने, जीरं, मिरी, मिरच्या सगळं वेगवेगळं भाजून घ्या. गार करून पावडर करा, शेवटी लाल तिखट घालून परत एकदा फिरवा.

डब्यात भरून ठेवा.

टीप: गूळ तुमच्या आवडीवर कमी जास्त किंवा नाही घातला तरी चालेल. 

आगळ नसेल तर आमच्याकडे 

ऑर्डर करा 😝🫣 किंवा आमसुलं दहा बारा पाण्यात भिजवून ती कुस्करून पण घेता येईल.

आगळ प्रमाण अंदाजे दिलंय, आंबटपणा चव बघून थोडं थोडं पण घालता येईल. 

आगळात मीठ असतं त्यामुळे चव बघून मीठ घाला.


✍️मीनल सरदेशपांडे