कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

कुळीथः विविध पाककृती

कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात. असे हे कुळीथ जन्मापासून आवडीचे असल्याने विविध प्रकारांनी आहारात वापरले जातात.
कुळथाचे पिठले सर्वांनाच माहित आहे,  हे पिठले तर आठवड्यातून एकदा होतेच. शेजार पाजारचा कोणी माणूस गेल्यावर घरच्यांना पिठलं भात दिला जातो. म्हणून शक्यतो कुळथाचे पिठले दिवसा करत नाहीत. ज्यानी कुळीथ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो:

कुळथाचे लाडू:
साहित्यः कुळीथ पीठ दोन वाट्या, किसलेला गूळ पावणे दोन वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, वेलची पावडर.
कृती: कुळीथ खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावीत. ही डाळ दळून आणावी. कुळीथ पीठ कोकणात प्रत्येकाकडे असतेच. हे तयार पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करावा, नीट मिसळून तूप घालावे. थोडी वेलची पावडर घालावी. खरंतर कुळथाचा वासच इतका खमंग असतो की वेलचीची गरजच नाही. तूप घालून मिश्रण एकत्र करून आवडीनुसार लाडू वळावेत. थंडीच्या दिवसात हे लाडू उत्तम!
माझी आजी जेव्हा ताजे तूप कढवले असेल तेव्हाच हे लाडू करायची, आणि तुपाची बेरी त्यातच घालायची.

कुळथाची उसळः
साहित्यः दोन वाट्या कुळीथ, तीन चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, दोन चिमुट हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबिर.
कृती: कुळीथ सकाळी भिजत घालावेत. रात्री उसपून चाळणीवर काढावेत. घट्ट झाकण ठेवावे. सकाळी छान बारीक मोड येतील. निवडून घेऊन कुळीथ कुकरला शिजवून घ्यावेत. शिजताना पाणी थोडे जास्त घालावे. कुळीथ शिजले की हे जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सगळे पाणी गाळू नये. ह्या पाण्याचे कळण करणार आहोत. आधी उसळ करून घेऊ. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. शिजलेले कुळीथ घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. कोथिंबिर घालून पोळीबरोबर खावी. मला ही उसळ नुसतीच खायला आवडते.

कळणः
साहित्यः कुळीथ शिजल्यावर गाळलेले पाणी ३ वाट्या, नारळाचे दूध ४ वाट्या, ताक ४ वाट्या, ७/८ लसूण पाकळ्यांची पेस्ट, एक चमचा मिरचीचे वाटप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जीरे, हळद.,कोथिंबिर, मीठ, साखर.
कृती: गाळलेले पाणी जेवढे असेल त्याच्या अडीच पट नारळाचे दूध आणि ताक मिळून घ्यावे लागते. हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात नारळाचे दूध आणि ताक मिसळावे. लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार घालावी. मिरची पेस्ट चवीनुसार मिसळावी. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी, हिंग व्यवस्थित असावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. कळण जेवण्यापूर्वी अगदी थोडे गरं करावे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते.
कळणाची चव अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान वाटते.

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

बीट सार





साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.



कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा.
यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

पपईची भाजी

कोकणात पूर्वी खेडेगावात फारशा भाज्या मिळत नसत. आणि विकत आणण्याएवढी परिस्थितीही नसे. मग परसात मिळणाय्रा विविध वस्तूंचा उपयोग करून तोंडीलावणे भागवले जायचे. पावसाळ्यात येणाय्रा विविध रानभाज्या, फणसाचा आठिळा, वाळवलेले गरे,  भोपळ्याची कोवळी पाने असे सर्व भाजीसाठी उपयोगी येत असे. अशाच एका नविन भाजीची रेसिपी पाहूया.
साहित्यः एक कच्चा पपई, तेल, फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, गूळ, कढीलिंबाची पाने, खोबरं, कोथिंबिर.
कृती: पपईची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्यात. केलेल्या फोडी दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात (चीक जाण्यासाठी) कढईत तेल तापत ठेवावे, नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग्,हळद घालून फोडणी करावी, लालतिखट घालावे. चिरलेल्या फोडी फोडणीत घालून परताव्या. कढिलिंबाची पाने घालावी.थोडे पाणी घालून झा़कण ठेवावे. फोडी शिजल्या की मीठ, गूळ, ओले खोबरे घालावे. कोथिंबिर घालून सर्व्ह करावी.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

जाड पोह्यांचा चिवडा

साहित्यः जाड पोहे, तेल, तिखट, मीठ, पिठीसाखर, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे.
कृती: जाडे पोहे चाळून पोह्यांना तेल चोळून घ्यावे. साधारणपणे पाव वाटी तेल अर्धा किलो पोह्यांना लागेल. तेल लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यावेत. अर्धी वाटी तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत. आवडत असल्यास सुक्या खोबर्‍याचे काप तळून घ्यावेत. उरलेल्या तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात भाजलेले पोहे, शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, पिठीसाखर मिसळावी. मंद गॅसवर चिवडा नीट मिक्स करावा. हा चिवडा मस्त लागतो.
.

भडंग

साहित्यः अर्धा कि. चुरमुरे, तीन चमचे मेतकुट, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, दोन तीन चमचे पिठी साखर, शेंगदाणे, कढिलिंब, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती: चुरमुरे चाळून घ्यावे. त्यात मेतकुट, तिखट, पिठीसाखर, मीठ घालावे. पाव वाटी तेल घालून हे सर्व चुरमुर्‍यांना लावून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढावे. साधारण अर्धी वाटी तेल लागेल. याच तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. कढिलिंबाची पाने घालावी. ती चुरचुरीत झाली की तयार चुरमुरे घालावेत. तळलेले शेंगदाणे घालावेत. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पिठीसाखर, तिखट याचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे.

शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू

साहित्यः एक वाटी दाण्याचे कुट, अर्धी वाटी गूळ, चिमुटभर वेलची अगर जायफळ पावडर, खाण्याचा चमचाभर साजूक तूप.
कृती: शेंगदाणे भाजून सालं काढून कुट करून घ्यावे. कुटाच्या निम्मा गूळ, एक चमचा तूप, वेलची किंवा जायफळ पावडर सर्व मिक्सर मधून थोडे फिरवून एकजीव करून घ्यावे. तूप लाडू वळता यावे यासाठी असते. त्याचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे. लाडू वळून मुलांना द्यावे.

नाचणीचे पौष्टिक लाडू

साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी (अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार.
कृती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजूला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही.
हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात.
.

एगलेस चॉकलेट केक

साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्, मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+ साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती: पाऊण ली. दूध + पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटांनी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.
काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यांनी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते.
केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर शोधून त्याची कृती मिळाली.
.

मुगडाळीचे डोसे


साहित्यः मुगडाळ तीन वाट्या, उडीदडाळ एक वाटी, १०-१२ लसूण
 पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मीठ, ७-८ ओल्या मिरच्या.

कृती: मुगडाळ आणि उडीदडाळ स्वच्छ धुऊन ४/५ तास भिजवावी.
 मिक्सरला बारीक वाटून रात्रभर पीठ झाकून ठेवावे.
 स़काळी त्यात आले लसूण मिरची वाटून घालावी. 
चवीनुसार मीठ घालावे.
 आवडीप्रमाणे डोसे घालून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
 हे डोसे अतिशय हलके होतात.

जायफळाच्या सालींचे लोणचे आणि मुरांबा

पाककृती देण्यापूर्वी जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो.
jayfal
ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग. साली अशा दिसतात.
jayfal
जायफळाचे लोणचे
साहित्यः जायफळाच्या साली अर्धा कि., १०० ग्रॅ. तयार लोणचे मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद.
कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. मीठ लावून अर्धा तास ठेवाव्यात. अर्धी वाटी तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करण्यास ठेवावी. अर्ध्या तासाने फोडीमध्ये तयार लोणचे मसाला, गार झालेली फोडणी मिसळावी. एक दोन दिवसांनी लोणचे मुरते. याच्या फोडी चावून खाल्ल्यास अगदी कैरीसारख्या लागतात. खरं तर या सालींना जायफळाचा वास येतो. पण लोणच्यात तो जराही जाणवत नाही.
jayfal
जायफळाचा मुरंबा:
साहित्य: जायफळाच्या साली, सालींच्या वजनाएवढी साखर. जायपत्री एक दोन तुकडे.
कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. तयार फोडी थोडे पाणी घालून कुकरला दोन शिट्या करून वाफवून घ्याव्या. या फोडी शिजल्यावर चाळणीवर ओतून घ्याव्या. त्याचे पाणी आपल्याला पाकासाठी वापरायचे आहे. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात घ्यावी. त्यात फोडींचे आलेले पाणी मिसळावे. पाणी साखर बुडेपर्यंत नाही झाले तर थोडे साधे पाणी साखरेत घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डिशमध्ये घातल्यावर पसरला नाही की त्यात शिजवलेल्या फोडी घालाव्यात. जायपत्रीच्या एक दोन पाकळ्या घालाव्या (ऐच्छिक. फोडी घातल्यावर पाक परत थोडा सैल होतो. पुन्हा डिशमध्ये घातल्यावर पसरणार नाही एवढा वेळ शिजवावे. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. या फोडींना आंबट चव असल्याने मुरंबा मस्त लागतो. आणि जायफळाचा वासही येतो. जायपत्रीही वासासाठीच असते, म्हणून ती घातली पाहिजे असे नाही. या मुरंब्याला सुंदर गुलाबी रंग येतो.
jayfal

कोकम माहिती

कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्‍या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्‍या झाडांवरच अवलंबून होता. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या या फळ्झाडांची लागवड करून त्यापासून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी कोकम या फळाची माहिती देताना कोकण कृषी विद्यापिठाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या माहितीचे संकलन केले आहे.
हे कोकमचे झाड.
kokam
कोकमाची फुले
kokam
लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्‍या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार
kokam
कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते.
लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत.
फोटो आंतरजालावरून साभार.
kokam
कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.
kokam
कोकम तेलः विविध पदार्थ तयार करण्यासाठी गर वापरून झाल्यावर कोकमच्या बिया स्वच्छ केल्या जातात. कडक उन्हात वाळवल्या जातात. वाळवल्यानंतर त्यावरचे जाड आवरण काढून टाकतात. त्यानंतर या बिया दळणीयंत्रातून बारीक करून आणतात. उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवतात. पाणी चांगले उकळून गार झाले की तेल वर येऊन घट्ट होते. यातेलाचे गोळे बनवतात, वाळवतात. कोकम तेल सौंदर्य प्रसाधने, औषधे, साबण यासाठी वापरतात. थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे यावर कोकम तेल रामबाण उपाय आहे. कोकम तेल खाण्यासाठीही वापरतात.
kokam
कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे.
kokam
कोकम आगळः कोकम आगळ तयार करण्यासाठीही पक्व टणक फळे झाडावरून उतरवून काढली जातात. फळे स्वच्छ धुवून गर, बिया वेगळ्या कराव्या लागतात. सालींचे तुकडे करावेत, साली आणि गर यांचे एकत्रीत वजन करून एक किलोसाठी १५० ते २०० ग्रॅम मीठ घ्यावे. साली आणि गराच्या मिश्रणात मीठ मिसळून चार दिवस झाकून ठेवावे. चार दिवसांनी मिश्रणातील रस गाळून बाटल्यामध्ये भरावा. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते.
kokam
अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असे हे गुणी फळ मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास नक्कीच फायदेशीर आहे. आपणही आपल्या घरासमोर अशोकाची झाडे लावून शोभा वाढवतो, त्याऐवजी कोकमची झाडे लावल्यास तीही सरळ वाढतात, आकर्षक दिसतात आणि उत्पन्नही देतात, बघा विचार करून!

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

ताकाचा मसाला


सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.




कृती: धने, जीरे, ओवा वेगवेगळे खमंग भाजून घ्या. गार करायला ठेवा. गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्या. तीनही गोष्टी एकत्र करा, त्यात हिंग, सुंठ्पावडर, शेंदेलोण, पादेलोण मिक्स करा. परत एकदा सगळे मिश्रण मिक्सरला फिरवून नीट मिक्स करा. मसाला थोडा खारट लागला पाहिजे म्हणजे ताकात घातल्यावर चव बरोबर लागते. चवीनुसार दोन्ही मीठांचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. पाचक म्हणूनही ताकात घालून घेता येईल.


गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

ट्रायफल पुडींग



साहित्यः अर्धा कि. मिक्स्फ्रुट एगलेस केक, ( आपल्या आवडीनुसार कोणताही, चॉकलेट सोडून), दोन चमचे फ्रुट ज्युस, इन्स्टंट ऑरेंज जेली पाकिट ५० ग्रॅ., व्हॅनिला कस्टर्ड पावडर दोन टे. स्पून, साखर चार टे. स्पून कस्टर्डसाठी, एक सफरचंद+ दोन टी स्पून साखर, अर्धा ली. दूध, एक केळं, एक वाटी जास्तीचे दूध, बदाम काप, चेरी सजावटीसाठी.

कृती: पाकिटावरील कृतीप्रमाणे जेली सेट करावी. सफरचंदाच्या साली काढून लहान लहान फोडी कराव्या. त्यात दोन टीस्पून साखर घालून पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. फोडी जरा मऊ होतील. गॅस बंद करून फोडी गार कराव्या. अर्धा ली. दूध गरम करण्यास ठेवावे. त्यात चार टे.स्पून किंवा आपल्या चवीनुसार साखर घालावी. एक वाटी गार दुधात कस्टर्ड पावडर नीट मिसळावी. हे दूध गरम करायला ठेवलेल्या दुधात मिसळावे. पाच मिनिटे सतत ढवळत ठेवावे. गुठळी होऊ देऊ नये. कस्टर्ड खाली उतरून गार करण्यास ठेवावे. केळ्याचे काप करावे.
केकचे चौकोनी तुकडे करावे. काचेचा बाऊल घेऊन तळाला केकचा थर द्यावा. त्यावर दोन चमचे फ्रुट ज्युस शिंपडावे. त्यावर पाकवलेल्या सफरचंदाच्या फोडी, केळ्याचे काप पसरावे. त्यावर सेट केलेल्या जेलीचे चौकोनी तुकडे करून त्याचा थर द्यावा. सर्वात शेवटी कस्टर्डचा थर द्यावा. सजावटीसाठी बदाम काप आणि चेरीचे काप वापरावे. चार- पाच तास फ्रिजरला सेट करून गार झाल्यावर सर्व्ह करावे.
हा तयार पुडींगचा फोटो

चट्पटीत शंकरपाळे (दिवाळी स्पेशल)

साहित्यः अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट, ओवा, हळद, मैदा, तळण्यासाठी तेल.
कॄती: प्रथम अर्धी वाटी तेल/ तूप, दीड वाटी पाणी, मीठ, तिखट (चवीनुसार), थोडीशी हळद हे सर्व एकत्र करून उकळावे. आणि गार करण्यास ठेवावे. ओवा थोडा बारीक करून घ्यावा. आणि तयार पाण्यात मिसळावा. पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात मावेल एवढा मैदा मिसळावा. गोळी करून त्याची पोळी लाटावी. शंकरपाळे कापावेत. तेलात तळून घ्यावेत. मस्त कुरकुरीत होतात.

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

कच्च्या पपईचे लोणचे



असे लगडलेले झाड पाहून लोणचे करायचा मोह आवरेना!
साहित्य: कच्च्या पपईच्या फोडी चार वाट्या, पाऊण वाटी लाल मोहोरी, दोन चमचे लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल, मेथी दाणे अर्धा चमचा, एक लिंबू.



कृती: पपईचे दोन भाग करून चीक धुवून घ्या. आता त्याची साले काढून आवडीप्रमाणे फोडी करून घ्या. फोडींना मीठ, हळद लावून ठेवा. अर्धी वाटी तेल तापत ठेवा. मेथी दाणे तळून घ्या. उरलेल्या तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करायला ठेवा.
लाल मोहोरी मिक्सरच्या भाड्यात बारीक करा. थोडे पाणी घालून मोहोरी छान फेसून घ्या. तयार फोडींमध्ये लाल तिखट, फेसलेली मोहोरी मिसळा. गार झालेली फोडणी मिसळा. एक लिंबू पिळा. सर्व मिश्रण चमच्याने ढवळा. दुसय्रा दिवशी लोणचे खाण्यास तयार होईल.
लोणचे खाताना मात्र जरा जपून, मोहोरी नाकात झणझणते. हे लोणचे लगेच खायचे असेल तर पपई किसून घ्यावा. दह्यात कालवून खाल्यास सौम्य होते.
काळी मोहोरी घातल्यास लोणचे कडू होते, म्हणून लाल मोहोरी...असे आईचे मत आहे. आपल्या जबाबदारीवर काळी मोहोरी वापरण्यास हरकत नाही!

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

काजूची फुले


साहित्यः
काजूगर एक वाटी
साखर अर्धी वाटी
पाणी अर्धी वाटी
खाण्याचे रंग.
कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे. एका वाटीत २५ फुले होतात.
ही फुले कोणाच्या वाढदिवसाला देता येतील किंवा दिवाळी / भाऊबिजेला भेट देता येतील.

चाकवतची ताकातली पातळ भाजी

रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही चाकवतची ताकातली पातळ भाजी!! चाकवत ऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते.
साहित्यः एक जुडी चाकवत, अर्धा लीटर दह्याचे ताक, दोन-तीन चमचे बेसन, आठ-दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा.
क्रुती: प्रथम चाकवत निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा. दही मिक्सरला घुसळून घ्यावे. चाकवत आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे. घुसळलेले दही, फिरवलेला चाकवत एकत्र करावे. पाणी घालून कढी इतपत किंवा आपल्या आवडीप्रमाणे पातळ करावे. त्यात मीठ, साखर, तिखट किंवा मिरचीचे वाटप चवीनुसार मिसळावे. या सिझनला आमच्याकडे ओले काजूगर मिळतात त्यामुळे ते बय्राच पदार्थात वापरले जातात. त्या ऐवजी सुके काजूगर गरम पाण्यात भिजवून घातले तरी चालतील. याने चवीत काहीच फरक पडत नाही. जिभेचे चोचले फक्त!!
तूपाची मेथी दाणे, जीरे, लसूण आणि सुक्या मिरच्या घालून खमंग फोडणी करावी आणि तयार मिश्रणाला द्यावी. एक उकळी काढावी. सुक्या मिरचीने तिखट्पणा येत नाही म्हणून लाल तिखट किंवा ओल्या मिरचीचे वाटप वापरले आहे.
chakvat bhaji

अननसाचा मुरांबा

चार दिवसापूर्वीच माहेरी जाणं झालं, आणि तिकडे सुंदर अननस मिळाले. अननस पाहिल्यावर आठवलं, खूप दिवसात मुरांबा केलाच नाही! Ananas
साहित्य: थोडा कमी तयार अननस, साखर, लवंग, वेलची दाणे.
कॄती: अननसाचे साल आणि मधला कडक भाग काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्या. अननसाच्या फोडी कुकरला एक शिटी करून वाफवून घ्याव्या. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर घ्यावी. साखर बुडेल इतके पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. वाफवलेल्या फोडीना सुट्लेले पाणी पाक करताना त्यात घालावे. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकून पहावा. ओघळ आला नाही, म्हणजे त्यात वाफवलेल्या अननसाच्या फोडी , लवंग, वेलची दाणे घालून परत मिश्रण आट्वावे.
आता आधीप्रमाणेच डीशमध्ये थेंब टाकून पहावा. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
काचेच्या बरणीत ठेवल्यामुळे मुरांबा चांगला टिकतो, आणि रोज समोर दिसतो सुध्दा!Ananas

द्राक्षांचा मुरांबा (मुर द्राक्षं)

साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी.

कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत.

पाक परत शिजत ठेवावा.
द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो. तो पुन्हा डीशमध्ये पसरणार नाही, इतपत घट्ट करावा. पुरेसा घट्ट झाल्यावर गॅस बंद करून दोन लिंबांचा रस त्यात मिसळावा.

गार झाल्यावर तयार मुरांबा काचेच्या बरणीत भरावा.

बीट पुलाव

साहित्यः पाव कि. तांदूळ, एक टोमॅटो, दोन कांदे, १०-१२ फरसबी शेंगा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी काजूगर, एक गाजर, ५-६ लसूण पाकळ्या, आलं एक छोटा तुकडा, लाल तिखट १ चमचा, एक चमचा गरम मसाला, दोन मध्यम बीट, तूप, जिरे, ५-६ काळी मिरी, मीठ.

कृती: तांदूळ धूऊन निथळत ठेवावेत. बीट शिजवून घ्यावीत. साले काढून बीट मिक्सरला फिरवून पेस्ट करून घ्यावी. काजूगर पाण्यात भिजत घालावेत. तांदूळ थोड्या तूपावर परतून मीठ, थोडे वाटलेले बीट घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. कांदे चिरून घ्यावे. गाजराचे पेरभर लांबीचे पातळ चपटे तुकडे करावे. फरसबीच्या शेंगांचे पेरभर लांबीचे तिरके तुकडे करावे. गाजर, मटार, फरसबी, काजूगर थोडे वाफवून घ्यावे. टोंमॅटोचा रस काढावा. आलं लसूण वाटून घ्यावी.
कढईत तूप तापवून त्यात जिरे, काळी मिरी घालावी. त्यावर कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा. कांद्यावर आलं-लसूण पेस्ट घालावी. थोडी परतून त्यावर गरम मसाला, लाल तिखट घालावे. वाफवलेल्या भाज्या घालून त्यावर भाज्यांपुरते मीठ घालावे. परतून घ्यावे. तयार भात मिसळावा. टोमॅटोचा रस घालावा. सर्व भात नीट एकत्र करून छान वाफ काढावी. एक वाफ आल्यावर वाटलेल्यापैकी उरलेला बीट रस भातात मिसळावा. ५-७ मिनिटे वाफवून गॅस बंद करावा. बीट्चा रस घातल्यावर जास्त वेळ वाफ काढली तर भाताचा रंग फिका होतो, म्हणून नंतर ५-७ मिनिटेच वाफवावा.

आंबोशीचे (सुखांबाचे) लोणचे





साहित्यः एक वाटी सुकवलेल्या कैरीच्या फोडी, एक वाटी गूळ, पाव वाटी मोहरी, एक चमचा मेथी, मीठ चवीनुसार, तिखट दोन चमचे, पाणी, तेल पाव वाटी, हिंग, मोहरी, हळद फोडणीसाठी.
कृती: प्रथम दोन-तीन वाट्या पाणी उकळावे. गॅस बंद करून या पाण्यात कैरीच्या फोडी घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे.दहा मिनिटांनी फोडी पाण्यातून काढून चाळणीवर टाकाव्या. गूळ एका पातेल्यात घेऊन पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा. गूळ विरघळला की गॅस बंद करावा. मोहरी पाणी घालून मिक्सरवर फेसून घ्यावी. मेथी तळून पावडर करावी. पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी. फोडणीत अर्धा चमचा तिखट घालावे, त्यामुळे छान रंग येतो. गुळाच्या पा़कात फेसलेली मोहरी, मेथी पावडर, तिखट, मीठ आणि तयार फोडणी मिसळावी. आता तयार मिश्रणात कैरीच्या फोडी मिसळाव्यात.
दोन दिवसात लोणचे मस्त मुरते. चवीला एकदम तोंपासु!

जायफळः माहिती

आमच्या बागेत तीन जायफळाच्या झाडांची लागवड केली असून आता ती झाडे ५००ते ६०० जायफळे देऊ लागली आहेत.
जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात.जायफळ ही फळातील वाळलेली बी तर जायफळाच्या बी बाहेरील जाड कवचावर लाल रंगाची जायपत्री असते. जायफळाची लागवड करताना नर झाड आणि मादी झाड लावावे लागते. बी पासून होणाय्रा झाडांमध्ये ५० टक्के नरझाडे येतात. त्यामुळे कलम लागवड हाच योग्य पर्याय ठरतो. नरझाडाची फुले आखुड, फुगीर असतात तर मादी झाडाची फुले लांबट असतात. काही झाडे द्विलिंगी असतात.
मादी झाडाला सहाव्या वर्षापासून फळे लागतात. दरवर्षी सुमारे २०० ते ३०० अशी जायफळे लागतात. फळ पूर्ण परिपक्व होण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्वात जास्त जायफळे तयार होतात.पूर्ण वाढ झालेल्या झाडाला १००० पर्यंत फळे लागतात. जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो.
jayfal
वर्षभर फळधारणा होत राहते. फळ परिपक्व झाले की फळाच्या खालच्या बाजूने तडकते आणि झाडावरून गळून पडते. अशी गळून पडलेली फळे गोळा करावीत. जून ते ऑगस्ट या महिन्यात तयार फळे वाळवता येत नाहीत ती फ्रीजमध्ये ठेवून पाऊस संपल्यावर ऊन्हात वाळवावी लागतात. जायफळाच्या मुख्य फळाला थोडी आंबटसर चव असते.
जायफळ तयारjayfal
jayfal
जायफळ पक्व, बी जायपत्री सहीत, कवचjayfal
यापैकी बरीचशी माहिती माझ्या सासय्रांकडून मिळालीय, तर थोडी मी आंतरजालावरून मिळवली आहे.
वार्षिक पाऊसमान १५० सें.मी. पेक्षा अधिक असलेल्या उष्ण व दमट प्रदेशात जायफळाची झाडे चांगली वाढतात. ती समुद्रसपाटीपासून १३०० मीटर उंचीच्या जमिनीत वाढू शकतात. जायफळाच्या लागवडीसाठी चिकण पोयटा, वाळू पोयटा व जांभ्या खडकाची तांबडी जमिन योग्य असते. नारळ सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड केली जाते. कारण जायफळाच्या झाडाला लहान असताना सावलीची आवश्यकता असते. तसेच बाराही महिने पाणी द्यावे लागते.
बाजारपेठेचे म्हणाल, तर अजून मी मोठ्या प्रमाणात विकली नसल्याने तो अंदाज नाही.
माझे सासरे अ‍ॅग्रीकल्चर बी एस सी असल्याने त्यांना या सर्व गोष्टींची आवड आहे आणि माहिती आहे. घराभोवती असलेल्या जागेत त्यांनी आंबा, चिकू, सोन केळी, नारळ, सुपारी, जायफळ, दालचिनी, मिरी अशी प्रत्येकी १/२ झाडे लावली .
जायपत्री लाल रंगाची जायफळाच्या बीच्या जाड कवचावर असते. ती काढून उन्हात वाळवली की वापरासाठी तयार होते. जायपत्रीला दर चांगला येतो.