साहित्यः २ वाट्या काकडीचा कीस, २ वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, हळद चिमुटभर, मीठ, वेलची पावडर, रवाळ तांदूळ पीठ २ वाट्या, हळदीची पाने ७/८


कृती:हळदीची पाने स्वच्छ धुवावीत. पुसून घ्यावीत. तवसं म्हणजेच जून काकडी किसून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. जेवढा कीस असेल तेवढा गूळ घ्यावा. तांदुळाचे रवाळ पीठ घ्यावे. रवाळ पीठ नसल्यास त्यात चार चमचे रवा मिसळावा. कीस, खोबरं आणि गूळ कढईत एकत्र करून गॅसवर ठेवावे. त्यात चवीपुरते मीठ. हळद घालावी. गूळ विरघळला की त्यात मावेल तेवढे तांदळाचे पीठ मिसळावे. वाफ काढावी. मिश्रण असे दिसेल. वेलची पावडर घेतलीय पण खरं तर याला हळदीचाच छान स्वाद येतो.


मिश्रण गार करण्यास ठेवावे. हळदीची पाने अर्ध्यावर दुमडून घ्यावीत. त्याच्या पाठच्या बाजूला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर एका बाजूला तयार मिश्रण थापावे. पुढीलप्रमाणे


एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यात एक पसरट डबा ठेवावा. त्यातही पाणी घ्यावे. त्यावर चाळण ठेवावी. चाळणीत एखादी वाटी ठेवावी. वाटी भोवती तयार पाने उभी करावीत.



त्यावर झाकण ठेवावे. पंधरा मिनिटे वाफ काढावी. पातोळे तयार आहेत. साजूक तूपाबरोबर खावे.