कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १७ जून, २०१८

मेथी फ्लॉवर

साहित्य: अर्धा की फ्लॉवर, अर्धी जुडी मेथी, एक मध्यम कांदा, एक टेबलस्पून तेल, एक चमचा साखर, मीठ, लाल तिखट अर्धा टीस्पून, कांदा लसूण मसाला अर्धा टीस्पून, ओलं खोबरं दोन टेबलस्पून(ऐच्छिक), फोडणीचे साहित्य
कृती: 1)फ्लॉवरचे तुरे काढुन आवडीच्या आकारात कापून मिठाच्या पाण्यात घाला.
2) मेथी निवडून धुवून बारीक चिरा.
3) कांदा सोलून अर्धा लांबडा चिरा.
4) कढईत तेल तापत ठेवा.
5) मोहोरी घाला, ती तडतडली की कांदा घाला.
6) दोन मिनिटं परतून त्यात कच्ची बारीक चरलेली मेथी घालून परता.
7) मेथीवर पण चमचा हळद, तिखट घालून परता.
8) आता फ्लॉवर घालून परता आणि एक वाफ येऊ दया.
9) फ्लॉवर शिजला की साखर, मीठ आणि कांदा लसूण मसाला घालून परता.
10) ओलं खोबरं घाला एक वाफ येऊद्या.
मस्त गरमागरम भाजी तयार आहे!


तिखट मिठाची सांज्याची पोळी/ पराठा!

परवा नाश्त्याला उपीठ आणि शिरा दोन्ही केलं. पण सगळ्यांनी शिराच घेतला आणि उपीठ तसंच राहिलं. आता ते संपवायला तर हवं मग केली युक्ती!

पोळ्यांची कणिक शिल्लक होतीच, आलं लसूण पेस्ट केली. तयार उपिठात आलं लसूण मीठ तिखट घातलं आणि छान मळून घेतलं. पुरण पोळीसारखं कणकेच्या वाटीत भरलं आणि तेल सोडून भाजलं. गरमागरम वाढल्यावर उपीठ न खाणारे पण पटापट घेत होते! आता याला तिखट मिठाची सांज्याची पोळी म्हणा किंवा पराठा! नावात काय आहे😊 चव महत्त्वाची

मसूर डाळ खिचडी

मला मसूर डाळीची खिचडी जास्त आवडते. त्यात छोटे कांदे अख्खे घालून मस्त लागते.

साहित्य: पाऊण कप बासमती तुकडा तांदूळ, पाव कप मसूर डाळ, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गोडा मसाला, एक टेबलस्पून तेल, मीठ, अडीच कप पाणी, पाच सहा छोटे कांदे, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून
कृती: खिचडी करण्यापूर्वी अर्धा तास डाळ आणि तांदूळ एकत्र करून धुवावेत आणि चाळणीवर पाणी निथळत ठेवावेत. एका पातेल्यात अडीच कप पाणी घेऊन उकळत ठेवावे. कढईत तेल घेऊन तापत ठेवावे. तेल तापलं की मोहोरी, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. डाळ तांदूळ फोडणीत घालून छान परतावे. उकळलेले पाणी डाळ तांदळात ओतावे. गॅस मंद करावा. कांदे सोलून चार भाग करावे किंवा लहान असतील तर अख्खे ठेवावे. आता पाण्यात मीठ, गोड मसाला आणि कांदा घालून ढवळावे. पाण्याची चव बघावी. तिखट, मीठ व्यवस्थित लागत असेल तर पाच मिनिटं मध्यम आणि नंतर दहा मिनिटं मंद गॅसवर खिचडी ठेवावी. मसुरडाळ पटकन शिजते. नुसता शिजलेला कांदा मस्त वाटतो. जोडीला पापड कढी मग काय अहाहा!

बुधवार, १३ जून, २०१८

आमरसाची पाकातली पुरी

साहित्य: तीन कप बारीक रवा, चार टेबलस्पून तूप किंवा तेल, पाऊण कप आमरस,  पाव कप आंबट दही, तीन कप साखर, तीन टेबलस्पून लिंबू रस, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून वेलची पावडर, एक टीस्पून केशर सिरप, दीड कप पाणी, तळणीसाठी तेल, सजावटीसाठी केशर काड्या आणि बदाम काप

कृती:
1) रवा चाळून घ्यावा.
2) मीठ घालून मिक्स करावे.
3) दोन आंब्यांचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्यावा.
4) चार टेबलस्पून तुपाचे मोहन रव्यात घालावे.
5) काढलेल्या आमरसात आणि दह्यात रवा  घट्ट भिजवून दोन तास झाकून ठेवावे
6)एका पातेल्यात साखर घ्यावी.
7) साखरेत दीड कप पाणी घालावे.
8) दोन तारी पाक करावा.
9) लिंबाचा रस मिसळावा. वेलची पावडर केशर सिरप घालावे.

10)कढईत तेल तापत ठेवावे.
11) एक मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्यांचा आकार पाडावा. किंवा गोळ्या करून एक एक पुरी लाटावी.

12) तळलेल्या पुऱ्या निथळून पाकात घालाव्यात.
13) दुसऱ्या तळेपर्यंत पहिल्या पाकात ठेवाव्या.
14) मग त्या पाकातून काढून ताटात मांडाव्यात.
15) बदामाचे काप आणि केशर काड्यांनी सजवाव्यात.

मंगळवार, १२ जून, २०१८

म्हाद्या: सातारा स्पेशल भाजी

साहित्य: पाच मध्यम कांदे, दोन टीस्पून तेल, दोन टीस्पून कांदा लसूण मसाला, शेंगदाणे कूट दोन टेबलस्पून, मीठ चवीनुसार, हळद पाव टीस्पून, लाल तिखट एक टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून

कृती: 1) कांदा बारीक चिरा.
2) कढईत तेल तापत ठेवा.
3) मोहोरी घाला, ती तडतडली की कांदा घालून परता.
4) कांदा मऊ झाला की हळद, तिखट घालून परता.
5) दाण्याचं कूट आणि कांदा लसूण मसाला घाला, मीठ घाला आणि परता.
6) अगदी दोन टेबलस्पून पाणी घाला.
7) एक वाफ येऊ द्या. तेल सुटू लागलं की गॅस बंद करा.
8) म्हाद्या तिखट झणझणीतच असतो.. कमी तिखट हवा असेल तर लाल तिखट वगळा.

रविवार, १० जून, २०१८

आटवलेला आमरस

आटवलेला आमरस:
       आमच्याकडे माझ्या माहेरी आंब्याचा रस आटवणे हा एक सोहळा असे. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा आंब्याच्या साटांना लागणारे ऊन कमी व्हायला लागते तेव्हा रस आटवायची लगबग सुरू होते. तोपर्यंत सगळ्या नातेवाइकांच्या पेट्या पाठवून झालेल्या असतात. घरात सगळ्यांचे आंबे मनसोक्त खाऊन झालेले असतात. तयार आंबे स्वच्छ धुवायचे आणि डोळस माणसाने रस काढायला बसायचं! हे शेवट शेवटचे आंबे डोळस पणे बघावे लागतात. तोपर्यंत बाबा मागच्या अंगणातल्या थाळी(पाणी तापवायची चूल) लाकडं आणून ठेवायचे. वर्षभर कौलाच्या खाली अडकवलेला लाकडी लांब दांड्याचा उलथा खाली काढून स्वच्छ करायचा. भल्या मोठ्या पराती राखेने चकचकीत करून त्याला खालच्या बाजूने माती आणि राखेचे लेवण घ्यायचे. परातीत घातलेला रस लागू नये आणि परात नीट घासली जावी म्हणून तिच्या तळाला माती आणि राख ओलसर करून लावायची.
आता तयार परातीत रस ओतून ती चुलीवर ठेवायची. लांब दांडा असल्याने ढवळताना रस अंगावर उडत नाही आणि लाकडी असल्याने तापत नाही. 

      आमची जेवणं होईपर्यंत माणसं बदलून बदलून रस आटवत असायची. रस घट्ट व्हायला लागला की त्यात अंदाजे साखर घालायची. परत तो रस आटवायचा. रस घट्ट व्हायला लागला की घरभर मस्त वास पसरतो. मग आम्ही मुलं फणसाची पानं काढून आणायचो आणि तो गरम गरम रस फणसाच्या पानावर घेऊन फुंकर मारत खायचो! अहाहा!! तो असा रस काय भारी लागायचा ... आता इकडे जरी त्या पराती, उलथें नसले तरी मी रस आटवतेच......डोळ्यासमोर ते चित्र आणून... चुलीवर आटवलेल्या रसाची चव नसली येत तरी त्या आठवणीत हा रसाचा गोळा सहज विरघळतो...... जिभेवर परत ती चव रेंगाळते!!😊
साहित्य: 20 हापूस आंबे, 200 ग्रॅम साखर
कृती: आंबे स्वच्छ धुऊन घ्या. सोलून त्याचा रस काढून घ्या. एका मोठया उंच कढईत रस घ्या. मंद आचेवर ठेवा. लांब दांड्याच्या लाकडी उलथ्यानेसतत ढवळत रहा.
गॅस मोठा केलात तर गरम रस अंगावर उडतो म्हणूनच उलथा लांब दांड्याचा हवा. रस आटत आला आणि उडायचा कमी झाला की त्यात साखर मिसळून ढवळत रहा. बाहेर उडत नाहीय याचा अंदाज घेऊन गॅस मोठा करा. दोन अडीच तास तरी लागतात, पूर्ण आटवायला!
हा रस तुम्ही नुसता खाऊ शकता, याच्या मोदक, वड्या, पोळ्या छान होतात.

रविवार, ३ जून, २०१८

कैरीचं टक्कू किंवा तक्कू

साहित्य: दोन वाटया कैरीचा कीस, दोन वाट्या गूळ, दोन टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मेथी दाणे, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद
कृती:
1) कैरी धुवून सोलून किसून घ्या.
2) काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात कीस मोजून घ्या.
3) किसात गूळ, मीठ, तिखट मिक्स करा.
4) कढईत तेल तापत ठेवा.
5) मोहोरी, मेथी, हिंग, हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा. गार होऊ द्या.
6) पूर्ण गार झाल्यावर फोडणी तयार मिश्रणात मिसळा.
7) कैरी आंबट असेल तर गूळ जास्त लागू शकतो.
8) तिखटपणा कमी हवा असेल तर तिखट कमी घ्या.
9) मस्त टेस्टी झटपट लोणचं तयार आहे.