कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३१ मे, २०१९

कोकणी मेजवानी: मऊ भात किंवा गुरगुट्या भात:

कोकणी मेजवानी: मऊ भात किंवा गुरगुट्या भात: 
           आमच्याकडे दरवर्षी कमीअधिक प्रमाणात मुंबईकर नातेवाईक मे महिन्यात एकत्र स्नेहभेट ठरवून दोन दिवस येतात. अशाच भेटीच्या वेळी या मंडळींची सुप्रभात होते ती मऊ भाताने!
              पाहुणे येणार म्हटलं की ठेवणीतली माळ्यावरची पितळी पातेली खाली उतरून राखेने चकचकीत केली जातात. माती आणि राख एकत्र करून ओलं करून त्याचा थर बाहेरून पातेल्याला दिला जातो, याला लेवण घेणे म्हणतात,यामुळे पातेलं जळत नाही आणि पदार्थ लागत नाही. चुलीवर आधण ठेवून घरातली बाई आपल्या इतर कामांकडे वळते.  चुलीवरच्या आधणात घरचे धुवून धोतराच्या कापडावर पसरलेले तांदूळ वैरले जातात.  जशी माणसं वाढतील तसं मोठं पातेलं चुलीवर चढतं.
हळूहळू पातेल्यातला भात रटरटायला सुरुवात होते. चुलीत कांदे भाजले जातात. घरात धुराचा वास पसरायला लागतो आणि पाहुणे मंडळी मऊ भाताच्या ओढीने लवकरच अंथरूण सोडतात.
             भात शिजेपर्यंत आंबे, फणस स्वागतासाठी तत्परतेने पुढे सरसावतात. किती गरे संपतात किती आंबे चोखले जातात याची गणती करायची नसतेच! या हवेला किती खाल्लं तरी पचतं म्हणत मंडळी भात शिजल्याचा कानोसा घेत माजघरात घुटमळतात. इकडे भात शिजून  मीठ घातलं की लाकडं बाहेर ओढून निखाऱ्यावर झाकून ठेवला जातो. आता भाताचे एक एक सहकारी हजेरी लावू लागतात. लोणकढं तूप हळूच फडताळातून बाहेर येतं! पाहुण्यांसाठी केलेलं ताजं मेतकूट खमंग सुवासाने भूक चाळवू लागतं. ताज्या कैरीच्या लोणच्याचा दादरा सोडून रसरशीत  लोणचं पंगतीत येतं. एखाद्या सौम्य स्वभावाच्या आजीसारखं  लिंबाचं गोड लोणचं आपली जागा घेत बसकण मारतं. या दोघांचा तोरा कितीही असला तरी फोडणीची मिरची त्यांना बाजूला सारत हक्काची जागा घेते. भाजलेल्या कांद्याची सालं काढून तयार ठेवले जातात. कोणी एखादी आत्या चुलीतल्या निखाऱ्यावर चार उडदाचे पापड शेकवून घेते.  आता मुख्य शिलेदार माजघरात प्रवेश करतो! भाताचं पातेलं मध्यभागी अध्यक्षस्थानी येऊन बसतंआणि आजूबाजूला घुटमळणाऱ्या, झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या मंडळींना हाकारे केले जातात. भाताच्या पातेल्याभोवती एकच झुंबड उडते. आपापल्या आवडीप्रमाणे तूप मेतकूट भात हातानेच पटापट मटकावून, परत ताटल्या सरसावत मंडळी पातेल्याकडे आपला मोर्चा वळवतात.
                दुपारच्या जेवणासाठी आंबे आणताना डोळ्यांच्या कोपऱ्यातुन घरीण हे चित्र आनंदाने बघत या सगळ्या सोहळ्यात सामील होते. तृप्तीचा ढेकर देत पाहुणे मंडळी अंगणाकडे वळतात आणि एखादी आजी पातेलं निपटून त्याची गोडी पुढच्या पिढीला सांगत राहते!
             
                मऊभातासारखी नात्यांची वीण सहज पचनी पडत जाते... आभासी जगातली कोवळी पावलं आनंदाने कोकणातल्या घरट्याकडे वळतात..मऊ भाताच्या...प्रेमाच्या... मातीच्या ओढीने! त्यासाठी इथली पाळंमुळं जपून त्यावर प्रेमाचं शिंपण घालणारी पिढी फक्त कोकणात तग धरून रहायला हवी... खरं कौतुक त्या आधारस्तंभाचं!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

नवलकोल मुगडाळ भाजी:

 नवलकोल मुगडाळ भाजी:



  • साहित्य: 
  • पाच नवलकोल कांदे, 
  • अर्धी वाटी मुगडाळ, 
  •  तीन ओल्या मिरच्या, 
  • कढीलिंब पाने, 
  • मीठ, 
  • साखर, 
  • तेल दोन टेबलस्पून,
  •  मोहोरी पाव चमचा, 
  • जीरं पाव चमचा, 
  • हिंग पाव चमचा,
  •  हळद पाव चमचा, 
  • खोबरं अर्धी वाटी, 
  • कोथिंबीर अर्धी वाटी

  • कृती: मुगडाळ रात्री भिजत घालून ठेवा.
  • अलकोलची पाने काढून बाजूला ठेवा. (याची परतून, पीठ पेरून भाजी, पराठे करून शकता किंवा आमटीत घालू शकता.) 
  • अलकोल धुवून घ्या.
  •  नारळाचे करतो तसे दोन भाग करून खवून घ्या किंवा साल काढून किसून घ्या.
  •  (सकाळी गडबडीने भाजी नको असेल तर डाळ धुवून या किसलेल्या अलकोलमध्ये पण भिजवून ठेवू शकता.)
  • कढईत तेल तापवा. मोहोरी, जीरं, मिरच्यांचे तुकडे, हळद घालून फोडणी करा. 
  • आता किसलेला अलकोल आणि भिजलेली मुगडाळ मिक्स करून फोडणीत घाला. 
  • कढीलिंब पाने घालून नीट परता.
  •  मंद गॅसवर झाकण ठेवून  शिजू द्या. 
  • अधेमधे परतत रहा.
  •  डाळ शिजली की मीठ, साखर घाला. 
  • परतत रहा.
  •  भाजीला सुटलेला रस आटला की खोबरं कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  •  मला तर अशी भाजी खोबरं, कोथिंबीर घालून नुसतीच खायला आवडते.
  • ✍🏻 मिनल सरदेशपांडे

झटपट मसाला पाव

साहित्य: पाच कांदे, पाच टॉमेटो, दोन चमचे तेल, एक चमचा पावभाजी मसाला, एक चमचा लाल तिखट, मीठ, लादी पण 2 डझन
कृती: पाच कांदे, पाच टॉमेटो    बारीक चिरून घ्या. कढईत दोन चमचे तेल तापवा, त्यात आधी कांदा, तो मऊ झाला की टॉमेटो घालून परतत रहा. दोन्ही मऊ होऊन तेल सुटू लागलं की एक चमचा पावभाजी मसाला, एक चमचा लाल तिखट आणि मीठ घालून परतत रहा. मऊ झालं की गॅस बंद करा. लादी पाव मधे कापून दोन्ही बाजू भाजा, हा मसाला,
त्यावर शेव, कोथिंबीर घालून दुसरा तुकडा वर ठेवा. मस्त लागतो, फक्त मसाला सणसणीत हवा!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

झटपट टिकाऊ आवळा लिंबू सरबत:




  • उन्हाळा फारच जाणवू लागलाय..थंड पेय सतत तयार लागतंय. चार दिवसांपूर्वी केलेलं लिंबू सरबत संपलं सुद्धा! आता रोज ताजी लिंबं एकतर पिळत बसायला हवीत आणि दुसरं त्याचे दर काय कडाडलेत!

  • आता परत काहीतरी वेगळा पर्याय शोधायला हवाच होता तेवढ्यात मला आठवलं... आपल्या योगी बाबांनी काढलेल्या कंपनीचा जानेवारीत आणलेला आवळा स्वरस घरात तसाच पडून होता. चला औषधी पित्तशामक आवळा स्वरस सगळ्यांना थोडा थोडा देऊन सम्पवूया. असाच कोण घेणार म्हणून काय केलं, आवळा रस तीन कप आणि एक कप ताजा लिंबू रस यासाठी दहा कप म्हणजे अडीच पट साखर घेऊन त्यात थोडं पाणी घालून गोळीबंद पाक केला. पाच टीस्पून मीठ, दोन टीस्पून वेलची पावडर आणि आवळा लिंबू रस पाकात घातला. गार झाल्यावर ठेवलाय बरणीत भरून... आता झटपट आवळा सरबत तयार होईल!

बुधवार, १५ मे, २०१९

कैरी फणस पुलाव:

फणस हा आंब्याचा जुळा भाऊच पण  आंबा भाव खाऊन जातो आणि त्यामुळे गुणी फणस थोडा मागे पडतो. आज आपण त्या फणसाला पाचारण केलंय मुख्य मेजवानीत!
 कैरी फणस पुलाव:



  • साहित्य: 
  • एक कप(250ml) तांदूळ तुमच्या आवडीने कोणतेही, 
  • एक कप कच्च्या फणसाच्या फोडी,
  •  पाव कप कैरी किसून,
  •  कांदे 3, 
  • मसाला 
  • वेलची 2 नग, 
  • लवंगा 6 नग, 
  • मिरी 10 नग, 
  • दालचिनी एक इंचाचे दोन तुकडे, 
  • तमालपत्र( माझ्याकडे झाड आहे त्यामुळे ताजे वापरलेय),
  •  तूप 2 टेबलस्पून, 
  • गरम मसाला 1 टीस्पून, 
  • हळद 1 टीस्पून, 
  • मीठ, 
  • जीरं 1 टीस्पून, 
  • आलं 1 टीस्पून, 
  • ओल्या मिरच्या 4


कृती:
1) तांदूळ धुवून निथळत ठेवा.

2) फणसाचा मधला कडक दांडा आणि साल काढून फोडी करा, कुकरला मीठ आणि पाणी घालून वाफवून घ्या. फणस शिजला पाहिजे पण गोळा व्हायला नको, राईस कुकरला छान होतो.

3)कांदे सोलून अर्धे लांब चिरा.

4) मिरच्या धुवून लांब तुकडे करा, तिखटपणा बघून कमी जास्त करा.

5)कैरी धुवून सोलून किसून घ्या. आलं पेस्ट करा.

6) कढईत अर्धा टेबलस्पून तूप तापत ठेवा.

7) निथळत ठेवलेले तांदूळ तुपावर परता.

8)तांदुळाच्या दुप्पट पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्या.

9) भात शिजला की परातीत मोकळा करून ठेवा.

10) कढईत तूप तापत ठेवा.


11) जीरं, मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, तुकडे करून तमालपत्र, मिरचीचे तुकडे एक एक करून तुपावर घाला आणि परता.

12) त्यावर कांदा घालून परता.

13) कांद्यावर कैरी घाला.

14)मऊ होईपर्यंत परतत रहा.

15)या कांदा कैरीवर अगदी थोडं मीठ घाला, लक्षात ठेवा आपण भात आणि फणस दोन्हीत मीठ घातलंय.
16) कांद्यावर हळद, गरम मसाला आणि आलं पेस्ट घालून परता.

17)आता फणसाच्या फोडी घालून परता.

18) या स्टेपला मी थोडं म्हणजे पाव कप पाणी घालून उकळलं, तुम्ही नको असेल तर घालू नका.

19) तयार भात सगळ्या मिश्रणात मिक्स करा.

20) मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ येऊ द्या.

21) यात काजूगर घालणार असलात तर तुपावर परतून सर्व्ह करताना वर पसरा.
22) कोथिंबीरीने सजवून एखादया सारासोबत किंवा रायत्या सोबत आस्वाद घ्या.

टीप: 1)कैरी च्या ऐवजी पाव कप दही वापरू शकता.

2)हा भात सहा माणसांना पोटभर होतो.

3)आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर तसं वापरायला हरकत नाही.

4)तांदूळ मी कोलम वापरला, तुम्ही कोणताही घेऊ शकता.

5)मी कैरीचं सार केलंय आंबट गोड, फणस पुलावा सोबत!
✍🏻मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ७ मे, २०१९

कैरी शहाळ्याची चटणी:

कैरी शहाळ्याची चटणी: 




साहित्य:
एक कप(250ml) जाडसर शहाळ्याचे तुकडे, चार सुक्या मिरच्या, कैरी किसून 2 टेबलस्पून, मीठ 1/2 टीस्पून, साखर 1/2 टीस्पून, लसूण पाकळ्या 6

कृती: शहाळ्याचे तुकडे करून घ्या. सुक्या मिरच्या गरम पाण्यात दहा मिनिटं भिजवा. लसूण सोलून घ्या. शहाळ्याचे तुकडे, भिजवलेल्या मिरच्या, लसूण, कैरी कीस, मीठ साखर सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्या. फिरवताना लागलेच तर थोडे पाणी घाला.
भाकरी बरोबर चटणी मस्त लागते.
सुक्या मिरचीचा तिखटपणा आला नाही तर लाल तिखट घाला.
चवीनुसार मीठ घाला. साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल.       
                                        
✍🏻मिनल सरदेशपांडे

भेंडी रस भाजी



साहित्य:अर्धा की भेंडी,
दोन टेबलस्पून तेल,
पाव टीस्पून मोहोरी,
पाव टीस्पून जीरं,
हिंग पाव टीस्पून,
हळद अर्धा टीस्पून,
एक टीस्पून गोडा मसाला,
एक टीस्पून कांदा लसूण मसाला,
एक टेबलस्पून गूळ,
एक टेबलस्पून चिंचेचा कोळ,
लाल तिखट एक टीस्पून,
ओलं खोबरं दोन टेबलस्पून,
शेंगदाणे कूट दोन टेबलस्पून,
मीठ,
कोथिंबीर,
पाणी तीन वाट्या
कृती:
1)भेंडी स्वच्छ धुवा.
2)पुसून कोरडी करा.
3) देठ आणि टोक काढून पाव इंचाचे तुकडे करा
4) लिंबाएवढी चिंच भिजत घाला.
5) कढईत तेल तापत ठेवा.
6)) तेल तापलं की मोहोरी, जीरं, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा.
7) फोडणीत भेंडी टाकून दहा मिनिटं परता.
8) आता त्यात चिंचेचा कोळ आणि थोडं पाणी घाला.
9) पाच मिनिटं छान उकळी येऊ द्या.
10) भेंडी शिजली ना ते पहा.
11) आता त्यात मीठ, गूळ, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला घाला.
12) दाण्याचं कूट आणि खोबरं घालून रस हवा असेल तसं पाणी घाला आणि उकळवा.
13) चव बघून जे हवं असेल ते वाढवा.
14) बारीक चिरून कोथिंबीर घालून पोळीबरोबर वाढा.
✍🏻मिनल सरदेशपांडे