कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १५ मे, २०१९

कैरी फणस पुलाव:

फणस हा आंब्याचा जुळा भाऊच पण  आंबा भाव खाऊन जातो आणि त्यामुळे गुणी फणस थोडा मागे पडतो. आज आपण त्या फणसाला पाचारण केलंय मुख्य मेजवानीत!
 कैरी फणस पुलाव:



  • साहित्य: 
  • एक कप(250ml) तांदूळ तुमच्या आवडीने कोणतेही, 
  • एक कप कच्च्या फणसाच्या फोडी,
  •  पाव कप कैरी किसून,
  •  कांदे 3, 
  • मसाला 
  • वेलची 2 नग, 
  • लवंगा 6 नग, 
  • मिरी 10 नग, 
  • दालचिनी एक इंचाचे दोन तुकडे, 
  • तमालपत्र( माझ्याकडे झाड आहे त्यामुळे ताजे वापरलेय),
  •  तूप 2 टेबलस्पून, 
  • गरम मसाला 1 टीस्पून, 
  • हळद 1 टीस्पून, 
  • मीठ, 
  • जीरं 1 टीस्पून, 
  • आलं 1 टीस्पून, 
  • ओल्या मिरच्या 4


कृती:
1) तांदूळ धुवून निथळत ठेवा.

2) फणसाचा मधला कडक दांडा आणि साल काढून फोडी करा, कुकरला मीठ आणि पाणी घालून वाफवून घ्या. फणस शिजला पाहिजे पण गोळा व्हायला नको, राईस कुकरला छान होतो.

3)कांदे सोलून अर्धे लांब चिरा.

4) मिरच्या धुवून लांब तुकडे करा, तिखटपणा बघून कमी जास्त करा.

5)कैरी धुवून सोलून किसून घ्या. आलं पेस्ट करा.

6) कढईत अर्धा टेबलस्पून तूप तापत ठेवा.

7) निथळत ठेवलेले तांदूळ तुपावर परता.

8)तांदुळाच्या दुप्पट पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्या.

9) भात शिजला की परातीत मोकळा करून ठेवा.

10) कढईत तूप तापत ठेवा.


11) जीरं, मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, तुकडे करून तमालपत्र, मिरचीचे तुकडे एक एक करून तुपावर घाला आणि परता.

12) त्यावर कांदा घालून परता.

13) कांद्यावर कैरी घाला.

14)मऊ होईपर्यंत परतत रहा.

15)या कांदा कैरीवर अगदी थोडं मीठ घाला, लक्षात ठेवा आपण भात आणि फणस दोन्हीत मीठ घातलंय.
16) कांद्यावर हळद, गरम मसाला आणि आलं पेस्ट घालून परता.

17)आता फणसाच्या फोडी घालून परता.

18) या स्टेपला मी थोडं म्हणजे पाव कप पाणी घालून उकळलं, तुम्ही नको असेल तर घालू नका.

19) तयार भात सगळ्या मिश्रणात मिक्स करा.

20) मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ येऊ द्या.

21) यात काजूगर घालणार असलात तर तुपावर परतून सर्व्ह करताना वर पसरा.
22) कोथिंबीरीने सजवून एखादया सारासोबत किंवा रायत्या सोबत आस्वाद घ्या.

टीप: 1)कैरी च्या ऐवजी पाव कप दही वापरू शकता.

2)हा भात सहा माणसांना पोटभर होतो.

3)आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर तसं वापरायला हरकत नाही.

4)तांदूळ मी कोलम वापरला, तुम्ही कोणताही घेऊ शकता.

5)मी कैरीचं सार केलंय आंबट गोड, फणस पुलावा सोबत!
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा