कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, २४ जुलै, २०१९

दोडक्याच्या सालींची चटणी

दोडक्याच्या सालींची चटणी:





साहित्य: 
दोडक्याच्या साली एक कप, अर्धा कप ओलं खोबरं, अर्धं लिंबू, एक टीस्पून साखर, एक टीस्पून मीठ, ओल्या मिरच्या पाच, जिरं पावडर किंवा जिरं अर्धा टीस्पून, लसूण चार पाकळ्या(ऐच्छिक), तेल एक टीस्पून
कृती: 
भाजीसाठी आणलेले दोडके सोलून साली एकत्र करा. बारीक तुकडे करा. तेलावर सालींचे तुकडे परतत ठेवा, पाच मिनिटं परतून गॅस बंद करा.  दोडक्याच्या सालीत ओलं खोबरं, मीठ, साखर , जिरं पावडर, मिरच्यांचे तुकडे एकत्र करा, लिंबू पिळा. आता थोडे थोडे मिक्सरला लागेल तेवढेच पाणी घालून वाटा. चवीनुसार लागेल ते वाढवा.
मस्त पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे!
टीप: लसूण घालणार असाल तर चटणी वाटताना घाला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

रविवार, २१ जुलै, २०१९

कुळीथ पिठाचे लाडू: 2

कुळीथ पिठाचे लाडू: 2



आपल्या कोकणात होणारे अतिशय पौष्टिक असे हे कुळीथ! मला असं वाटतं ज्या हवेत जे पिकतं ते खावं...तेच आपल्या हवामानाला आणि प्रकृतीला चांगलं असतं.
माझी आजी हे कुळथाचे लाडू तूप कढवलं की हमखास करायची. आत्ता पावसाळी हवेत किंवा हिवाळ्यात कुळीथ खावेत..कारण ते पित्तकर आणि उष्ण आहेत.
साहित्य: कुळीथ पीठ दोन वाट्या, गूळ पावणे दोन वाट्या, तूप पाऊण वाटी, एक वाटी सुकं खोबरं, वेलची पावडर पाव टीस्पून, सुंठ पावडर दोन टीस्पून
कृती: कुळीथ भाजून भरडून घ्यावेत. पाखडून साल काढून घ्यावी. थोडे सरसरीत दळून आणावेत.
आपल्याकडे घरात कुळीथ पीठ पिठल्यासाठी असतं तेही वापरायला हरकत नाही. गूळ किसून घ्या. सुकं खोबरं किसून खमंग भाजून घ्या. गार झालं की खोबरं चुरून घ्या. खोबरं, गूळ, तूप, कुळीथ पीठ, सुंठ पावडर आणि वेलची पावडर एकत्र करून नीट मिक्स करा. चव बघून लाडू वळा!
टीप: तूप एकदम न घालता लागेल तसं हळूहळू घाला.
तुम्हाला अजून पौष्टीक करायचे असतील तर खारीक पावडर, बदाम तुकडे घालू शकता.
या पिठाची गव्हाच्या पिठासारखी गूळ पापडी पण छान होईल.
गुळाला पर्याय म्हणून उगाच पिठीसाखर घालून चव बिघडवू नका.
माझी आजी यात तुपाची बेरी पण घालत असे त्यामुळे आणखी खमंग लागायचे लाडू!
✍🏻मीनल सरदेशपांडे

गुरुवार, १८ जुलै, २०१९

काप्या फणसाचे सांदण

काप्या फणसाचे सांदण:
 आज पहिल्यांदा आमच्या घरचा फणस पिकला..पण तोही कापा! पावसात आल्यामुळे गरे फारसे गोड नव्हते पण घरचा फणस पिकलाय तर उपयोग तर करायला हवा. बागेत दिवसरात्र मेहनत करणारे आमचे बाबा म्हणजे माझे सासरे...त्याना कापे गरे काही चावत नाहीत. त्यात आज त्यांच्या अर्धांगिनीचा वाढदिवस! म्हटलं या पेक्षा चांगला योग कुठला असणार? एक वाटी गऱ्यात अर्धी वाटी पाणी घालून मस्त रस करून घेतला आणि नेहमीप्रमाणे सांदण केलं! बाबा पण घरचे गरे खाऊ शकले आणि त्यानी मेहनत केलेल्या बागेतल्या फणसाची सांदण आईंना वाढदिवसाला करता आली...आता यापुढे केकची ती काय गोडी!

साहित्य: 15/20 काप्या फणसाचे गरे,(म्हणजे एक वाटी तयार रस) एक वाटी गूळ, सव्वा वाटी तांदळाचा रवा( इडली रवा वापरू शकता) , चिमुटभर हळद, एक वाटी पाणी, पाव वाटी ओले खोबरे, दोन चमचे साजूक तूप, 1/2 चमचा खायचा सोडा
कृती: कापे गरे सोलून घ्यावेत, एक वाटी रसाला अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला अगदी गुळगुळीत होईपर्यंत फिरवावे. पूर्वी तांदूळ धुवून वाळवून जात्यावर रवा काढला जाई. आता तयार इडली रवा मिळतो. एक चमचा तुपावर रवा भाजून घ्यावा. एक वाटी रस घेऊन त्यात एक वाटी गूळ चवीला मीठ, ओले खोबरे घालावे. चिमुटभर हळद घालावी. आता भाजलेला रवा, एक वाटी पाणी मिसळून दोन तास ठेवावे. एखाद्या पसरट डब्याला तुपाचा हात लावावा. तयार मिश्रणात एक चमचा तूप घालावे. तूप लावलेल्या डब्यात किंवा इडलीसारखे लावून 20 मिनिटे वाफवावे. तूप आणि नारळाचे दूध हवेच, सांदण खायला!
✍🏻मीनल सरदेशपांडे

तोंडली भात:

तोंडली भात:

झटपट होणारा एकदम चविष्ट असा हा तोंडली भात:
साहित्य:
एक कप तांदूळ, एक कप तोंडली उभी चिरून, अर्धा टीस्पून गोडा मसाला, पाव टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून जीरे पावडर, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून मोहोरी, कढीलिंबाची पानं चार पाच, लाल तिखट अर्धा टीस्पून, मीठ
कृती:
 तांदूळ धुवून निथळत ठेवावे.
तोंडली धुवून देठ आणि टोक काढून उभी चिरावीत,
चिरल्यावर ती  पाण्यात ठेवावीत.
चिरलेली तोंडली वाफवून घेतली तरी चालतील किंवा फोडणीत परतावी.
कढईत तेल तापत ठेवावे. त्यात मोहोरी घालावी.
ती तडतडली की हिंग, हळद, लाल तिखट घालावे.
तोंडली घालून परतावे.
शिजायला पाच मिनिटं झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफ काढावी.
  तोपर्यंत अडीच कप पाणी गरम करावे.
तोंडली शिजली की त्यात तांदूळ घालून परतावे.
गरम पाणी घालावे.
 मीठ, गोडा मसाला, धने जिरं पावडर आणि कढीलिंबाची पानं घालून नीट परतून घ्यावे.
 पाण्याची चव बघून मीठ, तिखट वाढवावे. आता झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजू द्यावा. अधूनमधून ढवळावे. भात छान शिजेपर्यंत झाकण ठेवावे.
दहा मिनिटांत भात तयार होतो.गरमागरम भात आणि त्यासोबत साबुदाणा फेण्या..अहाहा!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

काप्या फणसाचा मुरांबा: मुरफणस

काप्या फणसाचा मुरांबा:


      काय मंडळी संपले का आंबे गरे? कुठेतरी राहिला असेल एखादा फणस...पण पावसात गरे चविष्ट नसतात त्यामुळे खाल्ले जात नाहीत! आता त्यावर उपाय सांगते ज्यामुळे तुम्ही अगदी उशिरापर्यंत फणसाचा आस्वाद घेऊ शकता!
साहित्य: 
एक वाटी कापे गरे, पाऊण वाटी साखर, दोन लवंगा, पाणी अर्ध्या वाटीला थोडं कमी
कृती:
 कापे गरे साफ करून लांब किंवा आवडीप्रमाणे तुकडे करा.
 एका डब्यात झाकण लावून गरे कुकरमध्ये दहा मिनिटं वाफवून घ्या.
गऱ्यात पाणी घालू नका.
 साखरेत पाणी आणि लवंगा घालून एकतारी पाक करा.
वाफवलेले गरे घालून पाक परत उकळत ठेवा.
 डिशमध्ये थेंब टाकून पसरला नाही की मुरांबा/मुरफणस तयार झाला.
 गरे बऱ्यापैकी पारदर्शक होतात. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवा.
आता हवा तेव्हा फणसाचा आस्वाद घेता येईल!
✍🏻मीनल सरदेशपांडे

पनीर पराठा:

पनीर पराठा:
साहित्य:
 पाच वाट्या कणिक, एक वाटी पनीर, अर्धी वाटी बेसन,  दीड टीस्पून लाल तिखट,  एक टीस्पून मीठ ,अर्धा टीस्पून हळद, दोन टेबलस्पून तेल,  पाव चमचा लसूण पेस्ट (ऐच्छिक)
कृती:
  कणिक, पनीर, बेसन एकत्र करावं. त्यात तिखट, मीठ, हळद घालावी. तेल घालावे.
लसूण पेस्ट मिक्स करून , चव बघून पीठ  मळावे.
 या पिठाचे पोळी सारखे लाटून पराठे भाजताना मध्यम आचेवर भाजा.
 चटणी, सॉस, लोणी कशाही बरोबर मस्तच लागतात.
टीप: मला ज्यात त्यात लसूण आवडत नाही पण यात चांगली लागते.
मुलांना पावभाजी मसाला वगैरे घालून पण आवडेल.
यात तुम्ही पालक, कोथिंबीर, मेथी ही पाने पण बारीक चिरून घालू शकता.
पनिरमध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे घरीच एखादा लीटर दूध फाडून घरी पनीर करू शकता.
✍🏻मीनल सरदेशपांडे