कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १८ जुलै, २०१९

काप्या फणसाचे सांदण

काप्या फणसाचे सांदण:
 आज पहिल्यांदा आमच्या घरचा फणस पिकला..पण तोही कापा! पावसात आल्यामुळे गरे फारसे गोड नव्हते पण घरचा फणस पिकलाय तर उपयोग तर करायला हवा. बागेत दिवसरात्र मेहनत करणारे आमचे बाबा म्हणजे माझे सासरे...त्याना कापे गरे काही चावत नाहीत. त्यात आज त्यांच्या अर्धांगिनीचा वाढदिवस! म्हटलं या पेक्षा चांगला योग कुठला असणार? एक वाटी गऱ्यात अर्धी वाटी पाणी घालून मस्त रस करून घेतला आणि नेहमीप्रमाणे सांदण केलं! बाबा पण घरचे गरे खाऊ शकले आणि त्यानी मेहनत केलेल्या बागेतल्या फणसाची सांदण आईंना वाढदिवसाला करता आली...आता यापुढे केकची ती काय गोडी!

साहित्य: 15/20 काप्या फणसाचे गरे,(म्हणजे एक वाटी तयार रस) एक वाटी गूळ, सव्वा वाटी तांदळाचा रवा( इडली रवा वापरू शकता) , चिमुटभर हळद, एक वाटी पाणी, पाव वाटी ओले खोबरे, दोन चमचे साजूक तूप, 1/2 चमचा खायचा सोडा
कृती: कापे गरे सोलून घ्यावेत, एक वाटी रसाला अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला अगदी गुळगुळीत होईपर्यंत फिरवावे. पूर्वी तांदूळ धुवून वाळवून जात्यावर रवा काढला जाई. आता तयार इडली रवा मिळतो. एक चमचा तुपावर रवा भाजून घ्यावा. एक वाटी रस घेऊन त्यात एक वाटी गूळ चवीला मीठ, ओले खोबरे घालावे. चिमुटभर हळद घालावी. आता भाजलेला रवा, एक वाटी पाणी मिसळून दोन तास ठेवावे. एखाद्या पसरट डब्याला तुपाचा हात लावावा. तयार मिश्रणात एक चमचा तूप घालावे. तूप लावलेल्या डब्यात किंवा इडलीसारखे लावून 20 मिनिटे वाफवावे. तूप आणि नारळाचे दूध हवेच, सांदण खायला!
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा