कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

मूगडाळ हलवा

 मुगडाळीचा झटपट हलवा: 


मूगडाळ भिजवून केलेला हलवा फार सुंदर होतो पण मी आत्ता सांगतेय त्या पध्दतीने झटपट होतो आणि लागतोही तसाच चविष्ट!

साहित्य: मूगडाळ 1 कप, साखर सव्वा कप, खवा अर्धा कप, तूप 1 कप, दूध दीड कप, वेलची पावडर, बदाम, काजू तुकडे, मीठ चवीला

कृती: एक कप मूगडाळ मध्यम आचेवर एकसारखी भाजून घ्या. गार झाल्यावर रवाळ दळून घ्या. कढईत  पाऊण कप तूप घाला. त्यात दळलेली मूगडाळ घालून खमंग भाजून घ्या. मूगडाळ भाजत आली की त्यात काजू बदाम तुकडे घालून दोन मिनिटं परता. आता त्यात हळूहळू दूध घालत ढवळत रहा. पाच मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफ काढा. तोपर्यंत साखर मोजून घ्या, खवा गुठळी मोडून घ्या. वाफ आली की त्यात साखर, खवा, वेलची पावडर, चवीला मीठ हे सर्व घालून मिक्स करा. आता उरलेलं तूप घाला आणि परत मंद आचेवर पाच मिनिटं ठेवा. साखर पूर्ण विरघळली आणि बाजूला तूप सुटले की हलवा तयार!

टीप: साखर तुम्हाला हवी तर कमी घालू शकता पण खवा असल्याने तेवढी लागते.

भिजवलेली डाळ भाजायला लागणाऱ्या वेळेपेक्षा यासाठी खूप कमी वेळ लागतो.

तुम्हाला जास्त तूप नको असेल तर पाऊण कप पहिलं घालतो तेवढं घाला परत वरून उरलेलं घालू नका. 


✍🏻 मीनल सरदेशपांडे

कटवडा

 कट वडा: 


साहित्य:

कटासाठी: सुकं खोबरं किस 1 कप, कांदे तीन मध्यम, 10 लसूण पाकळ्या, 6 लवंगा, 10मिरी, अर्धा  इंच दालचिनी, आलं एक इंच, पाव कप तेल, काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून, नेहमीचं लाल तिखट अर्धा टीस्पून, सुक्या मिरच्या चार, मीठ, पाणी

वड्यासाठी: अर्धा की बटाटे, अर्धा टीस्पून मिरची वाटून, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून लसूण पेस्ट, मीठ, फोडणी साठी तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट पाव टीस्पून, कोथिंबीर पाव कप चिरलेली, तळायला तेल

पारीसाठी: बेसन 1 कप, 1 टीस्पून रवा, 1 टीस्पून लाल तिखट, मीठ, ओवा एक टीस्पून, हळद पाव टीस्पून, चिमूटभर खायचा सोडा, पाणी

कटवडा सर्व्ह करताना: दोन लिंबं, कोथिंबीर अर्धा कप, बारीक चिरलेला कांदा  1 कप, पिवळी शेव पाव की

कृती: बटाटे धुवून उकडत लावा.

खोबरं किसून भाजून घ्या. बाजूला ठेवा.

कांदा उभा लांब चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. 

कढईत दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात मिरी, दालचिनी लवंग परतून घ्या, बाजूला ठेवा.

आता त्यात आलं सोलून त्याच्या चकत्या, लसूण, सुकी मिरची आणि कांदा परता. तांबूस होऊ द्या.


आधी लवंग, दालचिनी, मिरी बारीक करून घ्या.  आता तयार गरम मसाला,  खोबरं, कांदा मिश्रण थोडं लागेल तसं पाणी घालून वाटून घ्या.


पातेल्यात एक ली पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की गॅस बारीक करून त्यात काश्मिरी आणि साधं दोन्ही तिखट घाला

लगेच त्यात गरम पाणी घाला. आता तयार वाटप त्यात मिसळा. मीठ घाला. गरजेनुसार लागल्यास पाणी घाला, उकळी काढा. तिखटपणा बघून लागलं तर तिखट वाढवा.

कट तयार आहे!


शिजलेले बटाटे सोलून  बारीक फोडी करा. आलं, लसूण मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ त्या फोडीना नीट लावून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा,  मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. तिखट घाला. गॅस बारीक करून त्यात तयार फोडी घालून परता. पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवा. चव बघून तिखट मीठ वाढवा. 

भाजी गार होऊ द्या. 


तोपर्यंत पारीसाठी बेसन, रवा, मीठ, ओवा, हळद, तिखट एकत्र करा, थोडं थोडं पाणी घालून वड्याला कव्हर होईल इतपत भिजवा.  अर्धा तास झाकून ठेवा. 


भाजीचे आपल्या आवडीनुसार वड्याचे आकार करून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा.  पिठात सोडा घाला. तयार वडा पिठात बुडवून अलगद तेलात सोडून दोन्ही बाजूने छान तळून घ्या


.

कटवडा सर्व्ह करताना   प्रथम डिशमध्ये वडा त्यावर गरम कट  त्यानंतर कांदा, कोथिंबीर, शेव घालून सोबत लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा!


टीप: कोणी यासोबत पाव पण घेतात.

साधारणपणे अर्धा किलोत बारा तेरा वडे होतात. 

तीन माणसांना पोटभरीचा कटवडा या प्रमाणात होईल.

माझ्याकडे 15 माणसांच्या प्रमाणात करते त्यातून कमी करून हे प्रमाण लिहायचा प्रयत्न केलाय, तुम्ही तुमच्या प्रमाणात यात बदल करू शकता.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

दुधी हलवा

 दुधी हलवा


साहित्य: एक की दुधी भोपळा, 350 ग्रॅम खवा, एक ते सव्वा वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, तूप तीन चमचे, सजावटीसाठी बदाम काप, काजूगर, बेदाणे

कृती: दुधी स्वच्छ धुवून किसून घ्यावा. कढईत तूप तापत ठेवावे. दुधीचा किस घालून तुपावर परतावा. दहा पंधरा मिनीटं परतला की त्याचा रंग बदलतो. खव्यातील गुठळी मोडून घ्यावी. परतलेल्या किसात साखर, खवा मिक्स करून पुन्हा मंद गॅसवर परतावे. साखरेमुळे मिश्रण थोडे सैल होईल . घट्टपणा आला की त्यात वेलची पावडर, काजू बदाम काप, बेदाणे मिक्स करावे. चव बघून लागल्यास साखर वाढवावी.तयार हलवा गार व्हॅनिला आईस्स्क्रीमचा गोळा घालून किंवा गरम आपल्या आवडी प्रमाणे सर्व्ह करावा.


✍🏻मिनल सरदेशपांडे

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

कणकेचा हलवा

 कणकेचा हलवा: 


साहित्य: एक कप रवाळ कणिक, एक कप गूळ, पाऊण कप तूप, दोन कप दूध, चवीला मीठ, काजूगर, बदाम, बेदाणे, एक टीस्पून सुंठ पावडर, वेलची पावडर

कृती: गहू थोडे रवाळ दळावेत.


कढईत निम्मे तूप घालावे. त्यात काजूगर, बदाम काप, बेदाणे तळून बाजूला ठेवावेत.  आता त्यात कणिक घालून खमंग तांबूस भाजून घ्यावी.

दूध गरम करावे. गॅस मंद करून हळूहळू दूध घालावे, गूळ घालावा, ढवळत राहावे. उरलेले तूप वेलची पावडर, एक टीस्पून सुंठ पावडर, मीठ,  तळलेले काजू, बेदाणे घालून नीट मिक्स करावे. एक वाफ काढावी. हलवा तयार आहे!

 टीप: यासाठी तुम्ही साखर पण वापरू शकता पण गुळाचा खमंग लागतो.

दुधाऐवजी पाणी पण वापरतात पण दुधातील जास्त छान लागतो. 

तूप एवढं नको असेल तर अर्धा कप घेऊ शकता.

नेहमीची कणिक घेतली तर दुधाचे प्रमाण एकास दीड पुरते. 


✍🏻 मीनल सरदेशपांडे

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मेथी मटर मलई: कांदा लसूण शिवाय

 मेथी मटर मलई:  कांदा लसूण शिवाय



साहित्य: एक जुडी मेथी, एक कप मटार, अर्धा कप साय,  अर्धा कप दही, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, एक टीस्पून लाल तिखट, मीठ, एक टीस्पून गरम मसाला, दहा बारा काजू,  एक  मोठा टॉमेटो, तेल दोन टेबलस्पून, एक टीस्पून साखर, एक कप पाणी, धने पावडर पाव टीस्पून, जिरे पावडर पाव टीस्पून

कृती: मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. मटार थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत.  टॉमेटो थोडे पाणी घालून वाफवून घ्यावा कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात काजू तळून बाजूला ठेवावेत. आता त्यात चिरलेली मेथी घालून मऊ होईपर्यंत परतून घ्यावी. बाजूला काढून ठेवावी. काजूगर आधी बारीक करावेत त्यात आलं टॉमेटो घालून पेस्ट करून घ्यावी. कढईत एक टेबलस्पून तेल तापवावे. टॉमेटो काजू पेस्ट दोन मिनिटं परतून त्यात साय, दही, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, जीरे पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे. आता त्यात परतलेली मेथी,  शिजलेले मटार, एक कप पाणी घालावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. नीट मिक्स करून उकळी आणावी. चव बघून काही लागल्यास वाढवावे. 

✍🏻मीनल सरदेशपांडे

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

शेवग्याच्या पाल्याची भाजी

 शेवग्याच्या पाल्याची भाजी: 


शेवगा ही अतिशय बहुगुणी वनस्पती आहे. पावसात कोकणात बऱ्याच वेळा अशा परसात सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्या केल्या जातात. साहित्य: शेवग्याची पाने चिरून एक कप(250ml), दोन कांदे, चणाडाळ दोन टेबलस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, तेल एक टेबलस्पून, मोहोरी 1/4 टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, ओलं खोबरं दोन टेबलस्पून, मीठ अर्धा टीस्पून, गूळ एक टीस्पून

कृती:  डाळ धुवून रात्री भिजत घालून सकाळी थोडं मीठ घालून शिजवून घ्यावी, डाळ मोडणार नाही इतपत शिजवावी.शेवग्याची पानं, पुढचे कोवळे तुरे काढून  धुवावेत. पाणी  निघून गेल्यावर बारीक चिरावेत.  अर्धा कप पाणी घालून कुकरला शिजवून घ्यावे. कांदा बारीक चिरावा.कढईत तेल तापवावे. मोहोरी घालावी ,ती तडतडली की कांदा घालून परतावा.  कांदा परतला की हिंग, हळद, लाल तिखट घालून परतावे. शिजलेला पाला थोडा पिळून घ्यावा, आणि परतावा. मीठ, गूळ, ओलं खोबरं, शिजलेली डाळ घालून ढवळावे. हवं तर थोडं पाणी घालून एक वाफ काढावी. चवीनुसार लागेल ते वाढवावे.

टीप: पीठ पेरून पण ही भाजी छान होते.

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

मूगडाळ पालक सूप

 मूगडाळ पालक सूप: दोन टीस्पून मूगडाळ, दहा पालकची पानं, दोन लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड, लोणी, आमचूर पावडर पाव टीस्पून



कृती: पालक पानं धुवून चिरून घ्या. मूगडाळ धुवून घ्या. लसूण पाकळ्या सोलून घ्या. तिन्ही गोष्टी एकत्र करून थोडं पाणी घालून शिजवून घ्या.  गार करून मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. गरजेनुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर मिरपूड घाला. आमचूर पावडर घाला.एक उकळी काढा. देताना थोडं लोणी घालून सर्व्ह करा. या साहित्यात एक बाऊल  सूप होईल.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

ज्वारीचा फुलका

 साहित्य: एक वाटी पाणी, चिमूटभर मीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ


कृती:  एका कढईत एक वाटी पाणी घ्या.

त्यात चिमूटभर मीठ घाला, मध्यम गॅसवर उकळी काढा. गॅस बारीक करून त्यात पीठ मिसळा. नीट ढवळून एक वाफ काढा.  गॅस बंद करा. थोडं गार झाल्यावर मळून घ्या.


पोळीप्रमाणे लाटा.  दोन्ही बाजू भाजून घ्या. हवं असेल तर शेवटी गॅसवर भाजा पण तव्यावर पण मस्त फुगतो फुलका! 



 रोज गहू खाणं तब्येतीला चांगलं नाही पण भाकरी येत नाही त्यासाठी हा पर्याय आहे.