कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

कटवडा

 कट वडा: 


साहित्य:

कटासाठी: सुकं खोबरं किस 1 कप, कांदे तीन मध्यम, 10 लसूण पाकळ्या, 6 लवंगा, 10मिरी, अर्धा  इंच दालचिनी, आलं एक इंच, पाव कप तेल, काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून, नेहमीचं लाल तिखट अर्धा टीस्पून, सुक्या मिरच्या चार, मीठ, पाणी

वड्यासाठी: अर्धा की बटाटे, अर्धा टीस्पून मिरची वाटून, पाव टीस्पून आलं पेस्ट, पाव टीस्पून लसूण पेस्ट, मीठ, फोडणी साठी तेल दोन टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट पाव टीस्पून, कोथिंबीर पाव कप चिरलेली, तळायला तेल

पारीसाठी: बेसन 1 कप, 1 टीस्पून रवा, 1 टीस्पून लाल तिखट, मीठ, ओवा एक टीस्पून, हळद पाव टीस्पून, चिमूटभर खायचा सोडा, पाणी

कटवडा सर्व्ह करताना: दोन लिंबं, कोथिंबीर अर्धा कप, बारीक चिरलेला कांदा  1 कप, पिवळी शेव पाव की

कृती: बटाटे धुवून उकडत लावा.

खोबरं किसून भाजून घ्या. बाजूला ठेवा.

कांदा उभा लांब चिरून घ्या. लसूण सोलून घ्या. 

कढईत दोन टेबलस्पून तेल घ्या. त्यात मिरी, दालचिनी लवंग परतून घ्या, बाजूला ठेवा.

आता त्यात आलं सोलून त्याच्या चकत्या, लसूण, सुकी मिरची आणि कांदा परता. तांबूस होऊ द्या.


आधी लवंग, दालचिनी, मिरी बारीक करून घ्या.  आता तयार गरम मसाला,  खोबरं, कांदा मिश्रण थोडं लागेल तसं पाणी घालून वाटून घ्या.


पातेल्यात एक ली पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की गॅस बारीक करून त्यात काश्मिरी आणि साधं दोन्ही तिखट घाला

लगेच त्यात गरम पाणी घाला. आता तयार वाटप त्यात मिसळा. मीठ घाला. गरजेनुसार लागल्यास पाणी घाला, उकळी काढा. तिखटपणा बघून लागलं तर तिखट वाढवा.

कट तयार आहे!


शिजलेले बटाटे सोलून  बारीक फोडी करा. आलं, लसूण मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ त्या फोडीना नीट लावून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा,  मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. तिखट घाला. गॅस बारीक करून त्यात तयार फोडी घालून परता. पाच मिनिटं मंद गॅसवर ठेवा. चव बघून तिखट मीठ वाढवा. 

भाजी गार होऊ द्या. 


तोपर्यंत पारीसाठी बेसन, रवा, मीठ, ओवा, हळद, तिखट एकत्र करा, थोडं थोडं पाणी घालून वड्याला कव्हर होईल इतपत भिजवा.  अर्धा तास झाकून ठेवा. 


भाजीचे आपल्या आवडीनुसार वड्याचे आकार करून घ्या.


कढईत तेल तापत ठेवा.  पिठात सोडा घाला. तयार वडा पिठात बुडवून अलगद तेलात सोडून दोन्ही बाजूने छान तळून घ्या


.

कटवडा सर्व्ह करताना   प्रथम डिशमध्ये वडा त्यावर गरम कट  त्यानंतर कांदा, कोथिंबीर, शेव घालून सोबत लिंबाची फोड देऊन सर्व्ह करा!


टीप: कोणी यासोबत पाव पण घेतात.

साधारणपणे अर्धा किलोत बारा तेरा वडे होतात. 

तीन माणसांना पोटभरीचा कटवडा या प्रमाणात होईल.

माझ्याकडे 15 माणसांच्या प्रमाणात करते त्यातून कमी करून हे प्रमाण लिहायचा प्रयत्न केलाय, तुम्ही तुमच्या प्रमाणात यात बदल करू शकता.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा