कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

झटपट भरली वांगी

साहित्य: वांगी अर्धा की, दोन कांदे, दोन टेबलस्पून तेल, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून कांदा लसूण मसाला, ओलं खोबरे दोन टेबलस्पून, शेंगदाणे कूट दोन टेबलस्पून, मीठ, मोहोरी पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, एक टीस्पून लाल तिखट.
कृती: 1) वांगी धुवून देठ कापून त्याला अधिक चिन्हासारखा कट द्यावा. चिरलेली वांगी पाण्यात ठेवावी.
2) कांदे सोलून बारीक चिरावे.
3)नारळ खवून घ्यावा.
4) चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
5)कढईत तेल तापत ठेवा.
6)तेल तापलं की मोहोरी घाला.
7) मोहोरी तडतडली की कांदा घालून परतावा.
8) कांदा परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट घालून परतावे.
9) आता चिरलेली वांगी घालून परतावे.
10) त्यात तीन वाट्या पाणी घालावे. थोडं मीठ घालून झाकण ठेवावे.
11) पाच मिनिटांत झाकण काढून वांगी शिजली का पहावं.
12) वांगी शिजली की त्यात गूळ, कोळ, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, दाण्याचं कूट, ओलं खोबरं आणि थोडं मीठ घालून ढवळावे.
13) छान उकळी येऊ द्यावी. चव बघून काही हवं असल्यास वाढवावे.
भरली वांगी एकेक वांगं भरण्यासाठी वेळ लागतो त्यापेक्षा अशी केली तर झटपट होतात.

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

फोडणीचा ब्रेड

साहित्य: स्लाइस ब्रेड एक 300 ग्रॅम, दोन ओल्या मिरच्या, पाव वाटी तेल, मोहोरी पाव चमच्यापेक्षा कमी, हळद पाव चमचा, मीठ, साखर, कोथिंबीर, कढीलिंब (ऐच्छिक), लाल तिखट लागल्यास, दोन कांदे
कृती:
१) स्लाइस ब्रेडचे छोटे तुकडे करून घ्या.
2) कांदे चिरून घ्या.
3)कढईत तेल तापवा.
४)मोहोरी घाला.
५)मिरचीचे तुकडे घाला.
६) कांदा घालून परता.
७) कांदा परतला की हळद घाला.
८) परतून  ब्रेड चे तुकडे मिक्स करून मंद गॅसवर परता.
९) चवीनुसार मीठ, थोडी साखर घाला.
१०) बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

मुखशुद्धी

साहित्य: बडीशेप एक वाटी, तीळ पाव वाटी, आळशी किंवा जवस पाव वाटी, धनाडाळ पाव वाटी, मीठ, ओवा दोन चमचे
कृती: एका वाटीत पाव वाटी पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ विरघळवुन घ्या. कढई मध्यम गॅसवर तापत ठेवा. त्यात तीळ, ओवा, आळशी वेगवेगळं गरम करून घ्या. बाजूला ठेवा. बडीशेप कढईत घ्या. मंद गॅसवर तयार केलेलं मिठाचं पाणी शिंपडत भाजून घ्या. सगळं पाणी लागणार नाही. मिठाची चव आली की पुरे. कुरकुरीत झाली की गॅस बंद करा. धनाडाळ, भाजलेल्या सर्व वस्तू एकत्र करून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

श्रीखंड

साहित्य: चक्का 500 ग्रॅम, साखर 500 ग्रॅम, वेलची पावडर अर्धा टीस्पून, जायफळ पावडर अर्धा टीस्पून, मीठ चवीला, केशर काड्या, बदाम काप.


कृती: तयार चक्का मोजून तेवढी साखर घ्यावी. साखरेचे प्रमाण चक्क्याच्या आंबटपणावर कमी जास्त होईल.  चक्का, साखर, मीठ , वेलची पावडर आणि जायफळ पावडर एकत्र करून पुरण यंत्रातून किंवा चाळणी तुन काढावे. आता त्यात थोडया गरम करून केशर काड्या चुरून मिक्स कराव्या. बदाम कापानी सजवावे. यात रंग वापरू नका. पांढऱ्या श्रीखंडात मधेच येणारा केशराचा रंग छान दिसतो.

मेथी पराठे

साहित्य
सा: एक जुडी मेथी, पाच वाट्या कणिक, अर्धी वाटी तांदूळ पीठ, अर्धी वाटी बेसन, सातआठ लसूण पाकळ्या, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ, तेल पाव वाटी, पाणी

कृती: मेथी निवडून धुवून चिरावी. एक चमचा तेलावर कढईत परतावी. सगळी पीठं, तिखट, मीठ, हळद, लसूण पेस्ट करून एकत्र करावं. परतलेली मेथी घालावी. तेल घालून नीट मिक्स करावे. लागेल तसे पाणी घेऊन पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. पोळीप्रमाणे लाटून पराठे करावेत, नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करावेत. या पिठाच्या पुऱ्या सुद्धा करू शकता.

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

मुटके गवार भाजी:

मुटके गवार भाजी:
साहित्य: गवार अर्धा की, एक चमचा कांदा लसूण मसाला, दोन कांदे, ओलं खोबरं अर्धी वाटी, पांढरे तीळ दोन चमचे, दोन टेबल स्पून तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हळद, दोन चमचे साखर, मीठ, लाल तिखट अर्धा चमचा.
मुटके: तीन चमचे कणिक, दोन चमचे रवा, दोन चमचे बेसन, अर्धा चमचा जीरं पावडर, धने पावडर अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ, तीळ एक चमचा, खायचा सोडा पाव चमचा, हळद पाव चमच

कृती:  गवार मोडून तुकडे करून स्वच्छ धुवावी. चाळणीत ठेवून वाफवावी. मुटके करायचं सर्व साहित्य एकत्र करावं. पाणी घेऊन कणिक भिजवतो तसं पीठ भिजवावं. तेलाचा हात घेऊन लांब गोल  मुटके करावेत. चाळणीत ठेवून दहा मिनिटं वाफवून घ्यावेत.
कांदा चिरावा. कढईत तेल तापवावे. मोहोरी घालावी, तडतडली की तीळ घालावे. कांदा घालून छान परतावा. मग हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून परतावं. वाफवलेली गवार घालावी. मीठ, साखर घालून नीट मिक्स करावे. वाफवलेले मुटके गोल कापून तेही यात घालावे. ओलं खोबरं घालून छान वाफ आणावी. ही भाजी परतून छान लागते.

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

आयता किंवा घावन आणि दूध गूळ:

झटपट आयत्यावेळी करायचा आयता किंवा घावन आणि दूध गूळ:
साहित्य: तांदळाचं पीठ, पाणी , मीठ, तेल
एक वाटी दूध , एक चमचा गूळ, वेलची पावडर, केशर काड्या
कृती: घावन हे साधारणपणे घाटल्याबरोबर करतात.
आमच्याकडे मात्र  दूध गूळ आणि आयते (घावन)  नाश्त्याला करतात. फार तयारी न करता झटपट आयत्यावेळी होणारे  म्हणून आयते!
एक भांड्यात तांदळाचे एक वाटी पीठ घ्या, त्यात मीठ घाला. आणि आता पाणी एवढे घालायचे की तव्यावर घातल्यावर आपोआप पसरेल. अति पातळ नको पण धिरड्यापेक्षा  थोडे सरसरीत! दुधात गूळ घालून चव बघा लागला तर वाढवा. बाकी त्यात वेलची पावडर , केशर हे उगाच शाही वाटायला हवं ना!
बिडाचा तवा तापत ठेवा. तापल्यावर तेल लावा. आता त्यावर आयत्याचे पीठ घाला. हे पीठ परत पळीने पसरायचा प्रयत्न करू नका, चिकटून येईल. दोन मिनिटं झाकण ठेवा. झाकण काढून दुसरी बाजू भाजा, आणि दूध गूळ आयता सर्व्ह करा. यासोबत चटणी, सॉस ही घेऊ शकता. आयता अतिशय जाळीदार होतो.
तांदूळ धुवून पीठ करतात यासाठी पण तयार असेल तेही चालेल.