कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मिलेट मसाला बॉल्स

 मिलेट मसाला बॉल्स:


 नमस्कार मंडळी:  उपास पारणे झाले का? आज काय गोडधोड करता का? 

 मी आज थोडासा चटपटीत प्रकार घेऊन आलेय.


साहित्य: शिजलेले वरी तांदूळ एक वाटी, अर्धी वाटी तांदूळ पिठी, एक गाजर, एक कांदा, कोथिंबीर, सात आठ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, हळद


कृती: शिजलेले वरी तांदूळ घ्या. त्यात एक कांदा बारीक चिरून, गाजर किसून, लसूण पेस्ट करून मिक्स करा. कोथिंबीर बारीक चिरून घाला.

तिखट,मीठ आणि तांदूळ पिठी मिक्स करा. गरज लागली तर किंचित पाणी घाला. सगळे छान मळून घ्या. छोटे छोटे बॉल्स करा. चाळणीला तेलाचा हात लावून त्यात ठेवून वाफवून घ्या. 


लगेच उचलायची घाई करू नका थोडे गार होऊ द्या.


आता कढईत थोडे तेल घ्या, त्यात मोहोरी घाला की तडतडली की तीळ,  कढीलिंब, हिंग, हळद घालून परता तयार बॉल फोडणीत घालून टॉस करा. थोडी पुडी चटणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिक्स करून सर्व्ह करा. 

 टीप: चाणाक्ष मंडळींनी ओळखलं असेलच कालचे वरी तांदूळ(भगर)

 उरले होते. असं वेगळं नाव दिलं आणि चव चटपटीत की संपतात पटापट 😄😄


यावरून एक लक्षात आलं की असे उपासाचे मुद्दाम पण करता येतील. ते आता परत कधीतरी.

✍️ मीनल सरदेशपांडे


#barnyardmillet

साबुदाणा रताळी वडे

 नमस्कार मंडळी😊

साबुदाणा रताळी वडे:


तुम्ही करतच असाल तरीही  शेअर करतेय जे आहे ते तसंच न करता चव बिघडणार नाही असे बदल मी करत असते

साबुदाणा वडा आमच्याकडे असा पातळ थापून करतात, मिनी थालिपीठ म्हणू शकता. नेहमीच्या प्रकारे करताना 

बटाटे उकडून घालतात.

सतत बटाटा नको वाटतो म्हणून मी कधी सुरण घालते. मोठे तुकडे करून आमसुलं घालून उकडून घेते. 


आज मी रताळी उकडून घातली. 

आणि थोडी उपास भाजणी घालून वडे केले. आमच्याकडे बरीच मंडळी असल्याने एकदम पीठ n भिजवता

भिजवलेला साबुदाणा, रताळी, मीठ, तिखट भाजणी एकत्र करून ठेवलं. थोड थोडं लागलं तर पाणी घेऊन वडे केले. 

मला वाटत होतं रताळ्याची किंचित गोडसर चव वड्यात चव मारक ठरते की काय पण अजिबात कळत नाही.

छान झाले होते तेलकट पण नव्हते.

शेंगदाणे कूट मला लेकाला दोघांनाही त्रास होतो, घशाशी जळजळ होते म्हणून नाही घालत मी.


टीप: काही जण हल्ली तेल कमी खायचं म्हणून अप्पे पात्रांत 

साबुदाणा गोळे परततात. असतील बरे लागत पण माझं मत जे पदार्थ तळून खायचे ते तसेच छान लागतात भले डाएट असेल तर कमी खा, एक खाल्ला तरी रसना तृप्त व्हायला हवी 😄😄


✍️मीनल सरदेशपांडे

गुलाबजाम

 नमस्कार मंडळी, आज एक छोटासा प्रयोग केलाय. खव्याचे गुलाबजाम करताना खव्यात मैदा किंवा कोणी भिजवून रवा असं घालतात.



बऱ्याच दिवसापासून मनात येत होतं जर मैद्याच्या ऐवजी तयार प्रीमिक्स घातलं तर त्यात मैदा असणारच आणि दूध पावडर असेल... तर बघू करून!


अर्धा किलो खवा घेताना त्यासाठी २०० ग्रॅम गुलाबजाम चितळे प्रीमिक्स घेतलं. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून मळून घेतलं किंचित दुधाचा हात लावून घेतला. आणि गुलाबजाम तळून पाकात घातले.


साखर घेताना त्या पाकिटावर असते तेवढी त्याची म्हणून आणि खवा घेतला तेवढी खव्याची अशी घेतली.


एक नंबर सॉफ्ट झालेत.


- Minal Sardeshpande l मीनल सरदेशपांडे ©®

मूग कैरीची आमटी

 कैरी मुगाची आमटी:


नमस्कार मंडळी😊 आमटी प्रकार मी करायचे झाले की मला एकच प्रकार रोज आवडत नाही. काहीतरी व्यंजन नसेल तर तूरडाळीची आमटी मी करत नाही. त्यामुळे नवीन काहीतरी हवंच. 

आज अख्ख्या मुगाची आमटी केलीय.


साहित्य: एक वाटी भिजवलेले मूग, एक टेबलस्पून कैरी किस, पाच सहा लसूण पाकळ्या, दोन ओल्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, अर्धी वाटी ओलं खोबरं, दहा बारा कढीलिंब पाने, जिरं, तेल फोडणीसाठी, लाल तिखट पाव टिस्पून, चार पाच तुकडे सुकी मिरची, मीठ, गूळ अर्धा टिस्पून ऐच्छिक, पाणी


कृती: मूग रात्री भिजत घालावेत. सकाळी हिंग, हळद घालून व्यवस्थित शिजवून घ्यावेत. कोथिंबीर खोबरं  कढीलिंब पानं ओल्या मिरच्या लसूण पाकळ्या हे सगळं एकत्र करून वाटून घ्यावं. मूग पळीने घोटून घ्यावेत. त्यात किसलेली कैरी, मीठ, हवा तर गूळ आणि हे वाटप एकत्र करून लागेल तसे पाणी घालून सारखे करावे. तयार मिश्रण उकळी काढून घ्यावे. चव बघून काय हवं असेल ते वाढवावे. आता कढल्यात तेल घेऊन त्यात जिरं, सुक्या मिरच्या बारीक गॅसवर तळून घ्याव्या. गॅस बंद करून लाल तिखट घालावे.

ही फोडणी तयार आमटीला देऊन सर्व्ह करावी.


टीप: बऱ्याच जणांना तीन प्रकारे तिखट घातलेय त्यामुळे खूप तिखट होईल असे वाटेल. पण सुक्या मिरच्या तिखट नसतात त्याने खमंग होते. लाल तिखट फक्त हिरव्या रंगावर छान दिसते म्हणून. ओल्या मिरच्या दोनच वाटून आहेत त्या तुम्हाला तिखट आवडत असेल तशा कमी जास्त करा.


मला अशा वाटपाच्या आमटीत गूळ नाही आवडत पण हवाच असेल तर किंचित घालायला हरकत नाही.

हळद मी नाही घालत.

आता सिझन आहे म्हणून कैरी.

✍️ मीनल सरदेशपांडे


#मिनलरेसिपिज 

#रोजचास्वयंपाक 

#आमटी

गुरुवार, २७ मार्च, २०२५

छेना पोडा

 नमस्कार मंडळी😊

झाली का पुरण पोळीची तयारी? 





मी मात्र आज 

Odisha ची स्पेशल रेसिपी केलीय

#छेनापोडा :

काय झालं एका मैत्रिणीने घरच्या दुधाचे पनीर आणि चक्का दिला.

चक्क्याचे तर श्रीखंड करून संपले पण..तशी वड्या करायची सणक आली होती पण समोर कांद्याचा नि ऑर्डरचा ढीग दिसत होता त्यामुळे 

त्या फंदात पडले नाही. पण सुगरण मैत्रिणीने दिलंय तर त्यातून काहीतरी वेगळी डिश व्हायला हवीच.


पनीर आज सकाळी बाहेर काढलं. 

आधी केलेलं असल्याने किंचित कोरडे 

होईल म्हणून थोडे थोडे बारीक करून, मिळून येईल पण मूळ पनीरचे रवाळपण जाणार नाही इतपत करून घेतले. 


तीन वाट्या पनीर होते त्यात तीन टेबलस्पून बारीक रवा, सव्वा वाटी साखर मिक्स केली. पनीर जर घरी केलेलं असेल तर पनीरचे पाणी वापरता येते. मी एक वाटी दूध घेतले. पनीर साखर रवा दूध थोडं थोडं घालत मिक्स केलं. किंचित चवीला मीठ घातलं. आवडेल तो सुकामेवा आणि वेलची पावडर घातली. तीन चमचे तूप घातले. सर्व मिश्रण अर्धा तास झाकून ठेवले. आता फ्रायपॅनला तुपाचा हात लावला. तिकडे कसलीतरी पानं 

वापरतात..मी केळीची घेतली. पान किंचित पोळून घेतलं म्हणजे मऊ पडते.


ते पान फ्रायपॅनमध्ये ठेवून त्याला पण तूप लावलं आणि तयार मिश्रण त्यात ओतलं.  झाकण  ठेवून मंद गॅसवर  अर्धा तास भाजून घ्या. सुरीचे 

टोक घालून चिकटत 

नाही ना बघा. माझं प्रमाण जास्त असल्याने मला पाऊण तास लागला.

चव काय सगळं अफलातून त्यामुळे सुंदरच येते. 



टीप: दिसणारा रंग काळपट वाटत असला तरी खाली पान असल्याने करपत नाही. उलट तोच भाग खमंग लागतो.

साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. रवा मिळून येण्यासाठी असतो फक्त. 

✍️ मीनल सरदेशपांडे

आंबोळ्या सरबत

 नमस्कार मंडळी😊


  मला माहिती आहे की रानमेवा असाच खाण्यात मजा असते.

आमच्या घरात मंडळी भरपूर म्हणून ताम्हिणीत येताना दिसलेल्या या आंबोळ्या( असे नाव विकणाऱ्या बाईने सांगितले) ती भरपूर पाच सहा वाटे घेऊन आले. दोन दिवसात ती छान पिकली. पण यावेळी सगळेच दुर्लक्ष करत होते. 


मग मीठ साखर घालून ती तयार 

फळे हाताने कुस्करून घेतली.

आलेला गर थोडा बारीक करून किंचित वेलची पावडर घालून सरबत केलं. 

( हे सोनार काम आहे पण फुकट घालवणे आपल्या  मनाला पटेना मग केले उद्योग🫣)


चव छानच आलीय.

आपल्या रत्नागिरी पट्ट्यात ही मिळतात का आणि नाव काय आहे? जाणकारांनी प्रकाश टाकावा.

✍️मीनल सरदेशपांडे

पौष्टिक चटणी पुडी

 पौष्टिक चटणी पुडी:

तर झालं काय मध्यंतरी मी अशा भोपळ्याच्या बिया, चणे,  शेंगदाणे, सूर्यफूल बिया एकत्र करून खाण्यासाठी ठेवल्याची पोस्ट लिहिली.



तेव्हा माझी मैत्रीण Rupali Sohoni 

म्हणाली की तिच्याकडे त्यातले दाणे तेवढे वेचून खातील आणि बाकी तिलाच खावं लागेल...अरेच्चा हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. सगळ्यांच्या पोटात सगळं जावं हा उद्देश कसा सफल होणार?😄😄


आज दुसरी युक्ती.. हे सगळं एकत्र भाजून कुरकुरीत करून घेतलं. 

साधारण बाकी सगळं एकेक वाटी आणि चणे दोन वाटी असे 

एकत्र करून... त्यात तिखट, मीठ, साखर आणि आमचूर पावडर घालून भरडसर चटणी केली कोरडी!

आता त्यात वरून तेल घालून खा किंवा तूप... डोसा, आंबोळी बरोबर खा किंवा परतून भाजीत वरून पीठ पेरतो अशी घाला. बघा करून, आमच्याकडे तर आवडली.. आता वेचून बाजूला करायचा चान्स नाही😝😄😄😄


✍️ मीनल सरदेशपांडे