कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ मार्च, २०२५

मूग कैरीची आमटी

 कैरी मुगाची आमटी:


नमस्कार मंडळी😊 आमटी प्रकार मी करायचे झाले की मला एकच प्रकार रोज आवडत नाही. काहीतरी व्यंजन नसेल तर तूरडाळीची आमटी मी करत नाही. त्यामुळे नवीन काहीतरी हवंच. 

आज अख्ख्या मुगाची आमटी केलीय.


साहित्य: एक वाटी भिजवलेले मूग, एक टेबलस्पून कैरी किस, पाच सहा लसूण पाकळ्या, दोन ओल्या मिरच्या, भरपूर कोथिंबीर, अर्धी वाटी ओलं खोबरं, दहा बारा कढीलिंब पाने, जिरं, तेल फोडणीसाठी, लाल तिखट पाव टिस्पून, चार पाच तुकडे सुकी मिरची, मीठ, गूळ अर्धा टिस्पून ऐच्छिक, पाणी


कृती: मूग रात्री भिजत घालावेत. सकाळी हिंग, हळद घालून व्यवस्थित शिजवून घ्यावेत. कोथिंबीर खोबरं  कढीलिंब पानं ओल्या मिरच्या लसूण पाकळ्या हे सगळं एकत्र करून वाटून घ्यावं. मूग पळीने घोटून घ्यावेत. त्यात किसलेली कैरी, मीठ, हवा तर गूळ आणि हे वाटप एकत्र करून लागेल तसे पाणी घालून सारखे करावे. तयार मिश्रण उकळी काढून घ्यावे. चव बघून काय हवं असेल ते वाढवावे. आता कढल्यात तेल घेऊन त्यात जिरं, सुक्या मिरच्या बारीक गॅसवर तळून घ्याव्या. गॅस बंद करून लाल तिखट घालावे.

ही फोडणी तयार आमटीला देऊन सर्व्ह करावी.


टीप: बऱ्याच जणांना तीन प्रकारे तिखट घातलेय त्यामुळे खूप तिखट होईल असे वाटेल. पण सुक्या मिरच्या तिखट नसतात त्याने खमंग होते. लाल तिखट फक्त हिरव्या रंगावर छान दिसते म्हणून. ओल्या मिरच्या दोनच वाटून आहेत त्या तुम्हाला तिखट आवडत असेल तशा कमी जास्त करा.


मला अशा वाटपाच्या आमटीत गूळ नाही आवडत पण हवाच असेल तर किंचित घालायला हरकत नाही.

हळद मी नाही घालत.

आता सिझन आहे म्हणून कैरी.

✍️ मीनल सरदेशपांडे


#मिनलरेसिपिज 

#रोजचास्वयंपाक 

#आमटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा