नमस्कार मंडळी😊
झाली का पुरण पोळीची तयारी?
मी मात्र आज
Odisha ची स्पेशल रेसिपी केलीय
#छेनापोडा :
काय झालं एका मैत्रिणीने घरच्या दुधाचे पनीर आणि चक्का दिला.
चक्क्याचे तर श्रीखंड करून संपले पण..तशी वड्या करायची सणक आली होती पण समोर कांद्याचा नि ऑर्डरचा ढीग दिसत होता त्यामुळे
त्या फंदात पडले नाही. पण सुगरण मैत्रिणीने दिलंय तर त्यातून काहीतरी वेगळी डिश व्हायला हवीच.
पनीर आज सकाळी बाहेर काढलं.
आधी केलेलं असल्याने किंचित कोरडे
होईल म्हणून थोडे थोडे बारीक करून, मिळून येईल पण मूळ पनीरचे रवाळपण जाणार नाही इतपत करून घेतले.
तीन वाट्या पनीर होते त्यात तीन टेबलस्पून बारीक रवा, सव्वा वाटी साखर मिक्स केली. पनीर जर घरी केलेलं असेल तर पनीरचे पाणी वापरता येते. मी एक वाटी दूध घेतले. पनीर साखर रवा दूध थोडं थोडं घालत मिक्स केलं. किंचित चवीला मीठ घातलं. आवडेल तो सुकामेवा आणि वेलची पावडर घातली. तीन चमचे तूप घातले. सर्व मिश्रण अर्धा तास झाकून ठेवले. आता फ्रायपॅनला तुपाचा हात लावला. तिकडे कसलीतरी पानं
वापरतात..मी केळीची घेतली. पान किंचित पोळून घेतलं म्हणजे मऊ पडते.
ते पान फ्रायपॅनमध्ये ठेवून त्याला पण तूप लावलं आणि तयार मिश्रण त्यात ओतलं. झाकण ठेवून मंद गॅसवर अर्धा तास भाजून घ्या. सुरीचे
टोक घालून चिकटत
नाही ना बघा. माझं प्रमाण जास्त असल्याने मला पाऊण तास लागला.
चव काय सगळं अफलातून त्यामुळे सुंदरच येते.
टीप: दिसणारा रंग काळपट वाटत असला तरी खाली पान असल्याने करपत नाही. उलट तोच भाग खमंग लागतो.
साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. रवा मिळून येण्यासाठी असतो फक्त.
✍️ मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा