कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

मसूर पुलाव

 मसूर पुलाव:


साहित्य: मसूर अर्धा कप, तांदूळ एक कप, दोन कांदे, दोन टॉमेटो, चार मिरी, चार लवंगा, दालचिनी तुकडा, आलं पेस्ट 1 टीस्पून, बडीशेप अर्धा टीस्पून, जीरं अर्धा टीस्पून मसाल्यात आणि अर्धा टीस्पून फोडणीत, धने एक टीस्पून, मीठ, चीज क्यूब्स तीन, तूप दोन टेबलस्पून, पाणी

कृती: मसूर चार पाच तास आधी भिजत घाला. तांदूळ धुवून ठेवा.   मसूर निवडून असे शिजवून घ्या की शिजले पाहिजेत पण मोडायला नको. कढईत सगळे मसाले कोरडे भाजून घ्या. बाजूला ठेवा. आता त्यात तूप घालून  तांदूळ परतून घ्या. एका पातेल्यात काढा. तांदळाच्या दुप्पट पाणी आणि मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्या. कांदा, टॉमेटो चिरून घ्या.  कढईत तूप घाला, तापल्यावर जीरं घाला. ते तडतडल्यावर कांदा, टॉमेटो घालून मऊ होईपर्यंत परता.  भाजलेला मसाला पावडर करून घ्या. तो मसाला, शिजलेले मसूर, आलं पेस्ट कांदा टॉमेटो वर घाला, आता या मसाल्यात लागेल एवढंच मीठ त्यात घाला. तयार मोकळा भात मिक्स करा. नीट मिक्स झालं की बाजूने तूप सोडून पाच मिनिटं मंद गॅसवर वाफ येऊ द्या.


झाकण काढून वरून चीज किसून सजवा. 

गरमागरम भात सूप सोबत सर्व्ह करा.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

मटार सूप

 मटार सूप: 


साहित्य: मटार 1 कप, कांदे दोन, लसूण पाकळ्या सात आठ, मिरी दहा, दालचिनी तुकडा, कांदा पात दहा बारा, आमचूर पावडर 2 टीस्पून, साखर 1 टीस्पून, मीठ, लोणी

 कृती: मटार सोलून घ्या. कांदे सोलून लांब चिरा. लसूण सोलून घ्या. कढईत लोणी किंवा बटर घाला. त्यात कांदा ,लसूण, मटार, मिरी, दालचिनी घालून परता, मटार मऊ झाले पाहिजेत. आता हे सर्व गार करून घ्या


. मिक्सर जारमध्ये हे मिश्रण, एक कप पाणी, आमचूर पावडर घालून छान वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण गाळून घ्या. दाट वाटत असेल तर अजून एक कप पाणी घाला, मीठ आणि साखर घाला. एक उकळी काढा. वरून कांदा पात बारीक चिरून घाला. किंवा कोथिंबीर पण घालू शकता. गरमागरम सूप बटर/लोणी घालून सर्व्ह करा.

टीप: कलर साठी मी थोडा अगदी मूठभर पालक कच्चा घातला बारीक करताना.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

हरभऱ्याची उसळ

हरभऱ्याची उसळ:

साहित्य: एक कप हरभरे, पाच कांदे, दहा बारा लसूण पाकळ्या, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून धने, एक सुक्या खोबऱ्याची वाटी, दहा बारा मिरी दाणे, चार लवंगा, एक तुकडा दालचिनी, मीठ, लाल तिखट एक टीस्पून, तेल एक टेबलस्पून, पाणी
कृती: हरभरे आदल्या रात्री भिजत घालावेत. सकाळी निवडून धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यावेत.  खोबऱ्याची वाटी आणि दोन कांदे  गॅसवर भाजून घ्यावेत. बाकी मसाला गरम करून घ्यावा. भाजलेले कांदे सोलून, खोबरं, मसाला सगळं वाटून घ्यावे.कढईत हे शिजलेले हरभरे काढावेत. त्यात  उरलेले तीन कांदे चिरून घालावेत. लागेल तसं पाणी घालून उकळत ठेवावे. मसाल्याचा गोळा घालावा. कच्चं तेल घालावं. मीठ, तिखट घालून मंद गॅसवर दहा मिनिटं उकळू द्यावं. गरमागरम उसळ भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी.

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

मसुरडाळ डोसा

 मसुरडाळ डोसा: 


साहित्य: 1 कप तांदूळ, दोन कप मसुरडाळ, 1 टीस्पून मेथी, 4 सुक्या मिरच्या, पाणी, तेल

कृती: सकाळी डाळ तांदूळ मेथी धुवून भिजत घाला. त्यात भिजताना सुक्या मिरच्या घाला. रात्री जास्तीचं पाणी बाजूला करून मिश्रण गुळगुळीत वाटून झाकून ठेवा


म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी छान फुगून येईल. सकाळी मीठ आणि पाणी घालून पीठ डोसे करण्यासाठी सारखं करा. तवा मध्यम आचेवर तापवा. थोड्या पाण्यात मीठ घालून ते पाणी तव्यावर शिंपडा. मग पळी भर मिश्रण मंद गॅसवर गोलाकार पसरा.

गॅस मोठा करा. बाजूने तेल सोडून भाजा.

कुरकुरीत डोसा चटणीबरोबर सर्व्ह करा.

 मी डोश्याला लाल चटणी तव्यावर लावून  भाजून घेतला. http://minalmangesh.blogspot.com/2021/01/blog-post_25.html?m=1 लाल चटणी रेसीपी इथे मिळेल.


✍🏻 मीनल सरदेशपांडे


सोमवार, २५ जानेवारी, २०२१

डोश्याची लाल चटणी

 डोश्याची लाल चटणी: 


साहित्य: दोन मध्यम कांदे, दहा बारा लसूण पाकळ्या, एक टीस्पून  तीळ, 1 टीस्पून डाळं, अर्धा टीस्पून उडीद डाळ, बारा सुक्या मिरच्या, 1 टीस्पून जीरं, अर्धा टीस्पून मेथी, मीठ, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल तिखट, 1 टीस्पून तेल, पाणी, चिंच 1 तुकडा

कृती: गरम पाण्यात सुक्या मिरच्या भिजत घाला. कांदा सोलून चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात जीरं, मेथी, उडीद डाळ, तीळ एक घालून परता. आता कांदा, लसूण घालून कच्चटपणा जाईपर्यंत परता. गार होऊ द्या. मिक्सर जार मध्ये भिजवलेल्या सुक्या मिरच्या, डाळं, चिंच, मीठ आणि परतलेले जिन्नस घालून बारीक वाटून घ्या. छान गुळगुळीत होण्यासाठी थोडं पाणी घाला. काश्मिरी लाल तिखट घालून एकदा फिरवा. मस्त चविष्ट लाल चटणी तयार आहे!☺️


✍🏻मीनल सरदेशपांडे

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

हिरव्या ग्रेव्हीतला दोडक्याचा कोफ्ता

 हिरव्या ग्रेव्हीतला दोडक्याचा कोफ्ता: 


साहित्य: 

ग्रेव्हीसाठी: दहा बारा पालकाची पाने, अर्धा कप कोथिंबीर,  एक टेबलस्पून पुदिना पेस्ट,पाच हिरव्या मिरच्या, आलं एक इंच तुकडा, लसूण 10 पाकळ्या, तीन कांदे, अर्धा कप दही, मीठ

मसाला: एक टीस्पून जीरं, एक टीस्पून धने, 10 मिरी दाणे, चार लवंगा, दोन हिरवी वेलची, एक  इंच तुकडा दालचिनी

कोफ्ता: अर्धा की दोडका, पाव कप मूगडाळ, लाल तिखट एक टीस्पून, कॉर्न फ्लोअर आणि बेसन  प्रत्येकी दोन टेबलस्पून, मीठ, ओवा एक टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, मीठ 

कांदे दोन बारीक चिरून, लोणी/तेल/ बटर 1 टेबलस्पून, तेल तळणीसाठी

कृती:  रात्री मूगडाळ भिजत घालावी.दोडका सालं काढून घ्यावा, त्याचवेळी कडू नाहीय ना ते बघावं.

 सोललेले तुकडे किसावे. त्यात एक टीस्पून मीठ लावून दहा मिनिटं तसंच ठेवावं.  3 कांदे सोलून घ्यावे. लसूण सोलून घ्यावी, आलं धुवून सोलून घ्यावं.  या तिन्ही गोष्टी एकत्र थोड्या पाण्यात पाच मिनिटं उकळून गार करत ठेवावे. त्यातच उकळताना शेवटी  एक मिनिटं पालकाची पानं घालावीत. सगळं गार होऊ द्यावं.  दही फडक्यात बांधून टांगून ठेवावे. मसाल्याचे सर्व पदार्थ गरम करून घ्यावेत त्याची पावडर करावी. उकळलेल्या ग्रेव्हीच्या साहित्यात कोथिंबीर, मिरच्या आणि पुदिना धुवून मिक्स करावं आणि सगळं मिश्रण वाटून पेस्ट करावी. दोन कांदे सोलून आवडीप्रमाणे चिरून घ्यावे. लोण्यावर कांदा परतावा.    दह्यात मसाला पावडर मिक्स करून ते कांद्यावर घालावे, परतावे. दोन मिनिटांनी सगळं वाटपाचे साहित्य घालून मिक्स करावे. किसलेला दोडका पिळून त्याचं पाणी गाळून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. लागलं तर थोडं  पाणी आणि दोडक्याचा रस घालून उकळी काढावी. ग्रेव्ही बाजूला ठेवावी.  

 कोफ्ता: पिळून ठेवलेला दोडका परातीत घ्यावा. भिजलेली मूगडाळ पाणी काढून भरड वाटावी. ती दोडक्यात मिक्स करावी, तिखट, हळद, ओवा, कॉर्नफ्लोअर, बेसन घालून सगळं मिश्रण एकत्र करून चव बघावी. लागलं तर मीठ घालावं कारण आपण आधी मीठ लावून ठेवलं होतं. मिश्रण सैल झालं तरी घाबरू नका किंवा त्यात पीठ वाढवू नका त्याचे कोफ्ते व्यवस्थित होतात


. कढईत तेल तापत ठेवा. चमच्याने किंवा हाताने छोटे छोटे कोफ्ते घालून भाज्यांसारखे तळून घ्या.

  सर्व्ह करताना ग्रेव्ही गरम करा, भांड्यात आधी कोफ्ते ठेवा त्यावर ग्रेव्ही घालून सर्व्ह करा. 

 टीप: कोफ्ते खूप वेळ ग्रेव्हीत घालून ठेवू नका. नाहीतर ते सगळी ग्रेव्ही शोषून घेतील. 

 तुम्हाला ग्रीन ग्रेव्ही नको असेल तर कांदा, टॉमेटो आलं लसूण घालून रेड ग्रेव्ही पण करू शकता.

 #दोडक्याचीभाजी #कोफ्ताकरी

#ridgeguard #homemade #koftacurry #तुरईसब्जी


गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

बाजरी नवलकोल वडे

 बाजरी नवलकोल वडे: 


साहित्य: 1 कप बाजरी पीठ, पाव कप कणिक, पाव कप बेसन, ओवा एक टीस्पून, तीळ एक टीस्पून, मोहनासाठी तेल दीड टीस्पून, मीठ, चार पाच ओल्या मिरच्या, आलं एक टीस्पून, दही पाव कप, हळद पाव टीस्पून, पाणी, नवलकोल ची पाने अर्धा कप, तळणीसाठी तेल

कृती: सगळी पिठं एकत्र करा.  पिठात ओवा, तीळ, मीठ मिक्स करा. नवलकोल ची कोवळी पाने धुवून बारीक चिरून घ्या.  दीड टीस्पून तेल गरम करा.  गरम तेलाचे मोहन पिठावर घाला. आलं मिरची वाटून पिठात घाला. हळद घाला. चिरलेली पानं घालून पीठ मळा, चव बघून तिखट मीठ वाढवा. लागेल तसं पाणी घ्या. मी खूप घट्ट नको खूप सैल नको, हाताने वडे थापता आले पाहिजेत. गोळे करून घ्या.


तुमच्या आवडीप्रमाणे केळीच्या पानावर किंवा पिशवीवर वडे थापा.


  कढईत तेल  गरम करून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजू तळून घ्या. एक कप दह्यात अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून साखर आणि चवीला मीठ घालून नीट मिक्स करा, या चटणी सोबत गरमागरम वडे सर्व्ह करा.

टीप: नवलकोल ऐवजी मेथी किंवा कोथिंबीर वापरू शकता.


दही नसेल तर पीठ भिजवताना अर्धा कप ताक घेतलं तरी चालेल.

✍🏻 मीनल सरदेशपांडे