कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

हिरव्या ग्रेव्हीतला दोडक्याचा कोफ्ता

 हिरव्या ग्रेव्हीतला दोडक्याचा कोफ्ता: 


साहित्य: 

ग्रेव्हीसाठी: दहा बारा पालकाची पाने, अर्धा कप कोथिंबीर,  एक टेबलस्पून पुदिना पेस्ट,पाच हिरव्या मिरच्या, आलं एक इंच तुकडा, लसूण 10 पाकळ्या, तीन कांदे, अर्धा कप दही, मीठ

मसाला: एक टीस्पून जीरं, एक टीस्पून धने, 10 मिरी दाणे, चार लवंगा, दोन हिरवी वेलची, एक  इंच तुकडा दालचिनी

कोफ्ता: अर्धा की दोडका, पाव कप मूगडाळ, लाल तिखट एक टीस्पून, कॉर्न फ्लोअर आणि बेसन  प्रत्येकी दोन टेबलस्पून, मीठ, ओवा एक टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, मीठ 

कांदे दोन बारीक चिरून, लोणी/तेल/ बटर 1 टेबलस्पून, तेल तळणीसाठी

कृती:  रात्री मूगडाळ भिजत घालावी.दोडका सालं काढून घ्यावा, त्याचवेळी कडू नाहीय ना ते बघावं.

 सोललेले तुकडे किसावे. त्यात एक टीस्पून मीठ लावून दहा मिनिटं तसंच ठेवावं.  3 कांदे सोलून घ्यावे. लसूण सोलून घ्यावी, आलं धुवून सोलून घ्यावं.  या तिन्ही गोष्टी एकत्र थोड्या पाण्यात पाच मिनिटं उकळून गार करत ठेवावे. त्यातच उकळताना शेवटी  एक मिनिटं पालकाची पानं घालावीत. सगळं गार होऊ द्यावं.  दही फडक्यात बांधून टांगून ठेवावे. मसाल्याचे सर्व पदार्थ गरम करून घ्यावेत त्याची पावडर करावी. उकळलेल्या ग्रेव्हीच्या साहित्यात कोथिंबीर, मिरच्या आणि पुदिना धुवून मिक्स करावं आणि सगळं मिश्रण वाटून पेस्ट करावी. दोन कांदे सोलून आवडीप्रमाणे चिरून घ्यावे. लोण्यावर कांदा परतावा.    दह्यात मसाला पावडर मिक्स करून ते कांद्यावर घालावे, परतावे. दोन मिनिटांनी सगळं वाटपाचे साहित्य घालून मिक्स करावे. किसलेला दोडका पिळून त्याचं पाणी गाळून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. लागलं तर थोडं  पाणी आणि दोडक्याचा रस घालून उकळी काढावी. ग्रेव्ही बाजूला ठेवावी.  

 कोफ्ता: पिळून ठेवलेला दोडका परातीत घ्यावा. भिजलेली मूगडाळ पाणी काढून भरड वाटावी. ती दोडक्यात मिक्स करावी, तिखट, हळद, ओवा, कॉर्नफ्लोअर, बेसन घालून सगळं मिश्रण एकत्र करून चव बघावी. लागलं तर मीठ घालावं कारण आपण आधी मीठ लावून ठेवलं होतं. मिश्रण सैल झालं तरी घाबरू नका किंवा त्यात पीठ वाढवू नका त्याचे कोफ्ते व्यवस्थित होतात


. कढईत तेल तापत ठेवा. चमच्याने किंवा हाताने छोटे छोटे कोफ्ते घालून भाज्यांसारखे तळून घ्या.

  सर्व्ह करताना ग्रेव्ही गरम करा, भांड्यात आधी कोफ्ते ठेवा त्यावर ग्रेव्ही घालून सर्व्ह करा. 

 टीप: कोफ्ते खूप वेळ ग्रेव्हीत घालून ठेवू नका. नाहीतर ते सगळी ग्रेव्ही शोषून घेतील. 

 तुम्हाला ग्रीन ग्रेव्ही नको असेल तर कांदा, टॉमेटो आलं लसूण घालून रेड ग्रेव्ही पण करू शकता.

 #दोडक्याचीभाजी #कोफ्ताकरी

#ridgeguard #homemade #koftacurry #तुरईसब्जी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा