कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १७ जानेवारी, २०१८

शाही तुकडा:

शाही तुकडा:

एक स्लाईस ब्रेड( 300 ग्रॅम), दूध दोन ली, दोन टीस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, एक वाटी( 200 ग्रॅम) साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, केशर किंवा रोज सिरप, बदाम काप दोन टीस्पून, पिस्ते काप दोन टीस्पून( हे दोन्ही सजावटीसाठी आहे, त्याने चवीत फरक पडत नाही.), तूप.

कृती: 

दूध कढईत घेऊन आटवत ठेवावे. थोड्या गार दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यावी. दूध थोडे आटल्यावर त्यात कस्टर्ड पावडर मिक्स केलेले दूध आणि साखर मिसळावी. साधारणपणे निम्मे दूध झाले आणि दाटपणा आला की वेलची पावडर घालून गार करत ठेवावे. ब्रेडचे आवडीप्रमाणे तुकडे करून तुपात तळावेत किंवा तव्यावर थोडे तूप लावून शॅलो फ्राय करावेत. तयार तुकडे खोल ट्रे किंवा थाळ्यात लावावेत. त्यावर आटवलेलं दूध स्प्रेड करावं. त्यावर केशर किंवा रोज सिरप आणि बदाम पिस्ते काप घालून सजवावे. दोन तास फ्रिजरला सेट करावे. ब्रेड तसाच कुरकुरीत राहतो आणि आटवलेल्या दुधाने चव अहाहा!!!
तुम्हाला साखर कमी हवी असेल तर ब्रेडवर मध स्प्रेड करा आणि दुधात अगदी कमी साखर घाला.


हिरव्या चिंचेचं सार:

हिरव्या चिंचेचं सार:
 माझ्या माहेरच्या घरासमोर दीड/दोनशे वर्ष जुनं चिंचेचं झाड आहे. इतकी वर्षे अनेक पिढ्यांना साथ देणाऱ्या या झाडाने आमच्या कुटुंबाला आणि शिक्षणाला खूप मोठा आर्थिक आधार देण्याचं काम केलंय. जेव्हा सिझनला हिरव्या चिंचा मिळायला लागतात.
साहित्य:

आंबापोळी, फणसपोळी, अशा गोष्टी संपत येतात त्यावेळी चिंचा पिकायला सुरुवात होते. परत चिंचा संपतायत तोवर कोकम, फणस, आंबे सुरू!! त्याचबरोबर निसर्गाच्या ऋतुबदलाप्रमाणे अनेक प्रकारचे पक्षी या झाडावर दरवर्षी हजेरी लावतात. या डेरेदार वृक्षा बद्दल कृतज्ञता म्हणून ही पोस्ट!! या
 सहा सात हिरव्या चिंचा, दोन ओल्या मिरच्या, एक नारळाचं खोबरं, सात आठ चमचे साखर, दोन चमचे मीठ, दोन चमचे आरारूट, दोन चमचे तूप, अर्धा चमचा जीरं, पाव चमचा हिंग, कढिलिंबाची चार पाने, कोथिंबीर, सुक्या मिरच्या दोन तीन
कृती: 

चिंचा धुवून कुकरला वाफवून घ्या. गार करायला ठेवा. नारळाचं दोन तीनदा पाणी घालून दूध काढून घ्या. खोबरं फिरवताना त्यात ओल्या मिरच्या पण फिरवा. चिंचा गार झाल्या की त्याची सालं काढून घ्या. आता थोड्या पाण्यात त्या कोळून घ्या. चिंचेचा कोळ मिक्सरला फिरवून गाळून घ्या. नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, मीठ, साखर, आरारूट घाला. (कॉर्न फ्लोअर अजिबात नका वापरू आरारूट ऐवजी) आरारूट नीट मिक्स करून घ्या. तूपाची हिंग, जीरं, सुक्या मिरच्या घालून फोडणी करा. ती साराला द्या. कढिलिंबाची पाने घाला. लागेल तसे पाणी घाला. उकळी काढा. गरमागरम सार कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

बुधवार, १० जानेवारी, २०१८

मिश्र भाज्यांचे लोणचे

मिश्र भाज्यांचे लोणचे:
साहित्य: 
अर्धा की फ्लॉवर, एक वाटी मटार, चार गाजरं, एक बोटभर आल्याचा तुकडा, एक बोटभर ओली हळद किंवा आंबे हळदीचा तुकडा, चार लिंबं, एक वाटी तेल, एक चमचा मोहोरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद पावडर, चार चमचे लाल तिखट, तीन चमचे मीठ, एक पाकीट लोणचे मसाला(100 ग्रॅम)
कृती:
फ्लॉवर साफ करून मिठाच्या पाण्यात तुरे टाकावेत. गाजराचे तुकडे करावेत. आलं, हळदीच्या चकत्या कराव्यात. मटार सोलावेत. फ्लॉवर पाण्यातून काढून कोरडा करायला फडक्यावर पसरावा. सर्व भाज्या कोरड्या कराव्यात. लिंबाचा रस काढावा.  तेलाची मोहोरी, हिंग, हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून फोडणी करावी. गार करत ठेवावी. फोडणीत तिखट घातल्याने लोणच्याला रंग छान येतो. फ्लॉवर, मटार, गाजराचे तुकडे, ओल्या हळदीचे तुकडे, आल्याचे तुकडे सर्व स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ,100 ग्रॅम लोणचे मसाला, लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावे. गार झाली की फोडणी मिक्स करावी. तयार लोणचे काचेच्या बरणीत भरावे.
मस्त टेस्टी लोणचं तयार आहे!
टीप: ओले आणि कोवळे मिरी दाणे असतील तर ते पण दोन टीस्पून यात घाला, छान लागतात.

मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

अननसाचा गोड भात

  • साहित्य 
  • एक वाटी तांदूळ
  • एक वाटी साखर
  • चार पाच लवंगा
  • एक वाटी अननसाच्या फोडी
  • एक वाटी अननसाचा रस
  • एक चमचा अननस इसेन्स(ऐच्छिक)
  • काजूगर
  • बेदाणे
  • चार चमचे तूप
  • खाण्याचा पिवळा रंग
  • मीठ 
  •  कृती:
    1. तांदूळ धुवावेत, चाळणीवर निथळत ठेवावेत.
    2. अननस कापून मधला जाड दांडा आणि साल काढून फोडी कराव्यात.
    3. एक वाटी रस होईल एवढया फोडी ज्युसर जारला फिरवून रस गाळून घ्यावा.
    4. एक वाटी फोडी तशाच ठेवाव्यात.
    5. कढईत तूप तापत ठेवावे.
    6. त्यात लवंगा घालाव्यात.
    7. लवंगा तळल्या की त्यात तांदूळ घालून परतावेत.
    8. तांदूळ परतले की कुकरच्या डब्यात काढून त्यात दुप्पट पाणी घालून आणि चिमुटभर खायचा रंग घालून भात शिजवून घ्यावा.
    9. शिजलेला भात परातीत मोकळा करायला ठेवावा.
    10. कढईत साखर, अननसाचा रस, मीठ घालून साखर विरघळून घ्यावी.
    11. इसेन्स घालावा.
    12. काजूगर बेदाणे घालावे.
    13. आता त्यात तयार भात मिसळावा.
    14. बाजूने तूप सोडून पाच मिनिटं वाफ काढावी.
    15. भात तयार झाला की सर्व्ह करताना अननसाच्या फोडींनी सजवून वाढावा.
     

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

महाराष्ट्र टाइम्समध्ये माझी रेसिपी


स्ट्रॉबेरी मुरांबा:

स्ट्रॉबेरी मुरांबा:

साहित्य: अर्धा की स्ट्रॉबेरी, अर्धा की साखर, पाव चमचा वेलची पावडर

कृती:

 स्ट्रॉबेरी थोडी कच्ची असावी, म्हणजे आंबटपणा असावा. स्ट्रॉबेरी स्वच्छ करून घ्याव्यात. आवडीप्रमाणे तुकडे करावेत. साखर बुडेपर्यंत पाणी घालून पाक करायला ठेवावा. एक तारी पाक झाला की त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून परत पाक उकळत ठेवावा. वेलची पावडर घालावी. आता मिश्रण घट्ट होत आलं की डिशमध्ये पाकाचा थेंब टाकून पहावा. थेंब पसरला नाही की गॅस बंद करावा. गार झाला की बरणीत भरून ठेवावा. मुरंब्याचा रंग खूप छान येतो.

पडवळाच्या बियांचा चटका:

पडवळाच्या बियांचा चटका:
एक वाटी पडवळाच्या कोवळ्या बिया, दोन ओल्या मिरच्या, दोन चमचे मेतकूट, मीठ, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जीरं, अर्धा चमचा तूप, दीड वाटी दही, कोथिंबीर, दोन वाट्या पाणी




कृती:

 पडवळाची भाजी करताना बिया कोवळ्या असतील तर त्या टाकू नका. त्या बियांचे दोर काढून घ्या. कढईत तूप तापत ठेवा. तापलं की त्यात जीरं, मिरच्यांचे तुकडे घाला. ते परतले की बिया घाला. थोडं परता.
आता त्यात दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवा. दहा मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्या. मधूनच पाणी आहे ना पहा. बिया शिजल्या की रंग बदलतो आणि चमच्याने बीचा तुकडा पडतो. आता झाकण काढून पाणी राहिले असेल तर पूर्ण आटवा. बिया एक बाऊलमध्ये काढा. कोथिंबीर धुऊन बारीक चिरा. बियांमध्ये मेतकूट, साखर, मीठ, कोथिंबीर घाला. दही मिसळा. मस्त तोंडीलावणं तयार आहे!

आवळा मावा:

आवळा मावा:
साहित्य:
 अर्धा की आवळे, तीनशे ग्रॅम साखर, पन्नास ग्रॅम आलं अर्धा चमचा मीठ

कृती:

 आवळामावा करायला घेताना सकाळी घ्या, म्हणजे दिवसाचे ऊन मिळते. आवळे स्वच्छ धुवा, पुसून घ्या. आता ते सगळे आवळे किसून घ्या. त्यात साखर मीठ घालून नीट मिक्स करा. धुवून सालं काढून आलं किसून घ्या. या किसलेल्या आवळ्यात मिसळा आणि तासभर तसेच झाकून ठेवा.

तासाभरात साखर विरघळते मग पसरट थाळ्यात किस उन्हात वाळत ठेवा. साखर मिठामुळे जो रस सुटेल तो तसाच ठेवून वाळवा, काढून घेऊ नका. पूर्ण कीस वाळायला सात आठ दिवस लागतात. अगदी मोकळा झाला की मावा घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. पित्तावर रामबाण घरगुती उपाय आहे!

आवळा पेठा:

साहित्य:  
एक की आवळे, पाऊण की साखर, एक चमचा मीठ



कृती: आवळे स्वच्छ धुवावेत. पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. उकळी आली की धुतलेले आवळे त्यात घालून परत पाच मिनिटं उकळावे. दोन मिनिटं गॅस बंद करून झाकण ठेवावे. मग शिजलेले आवळे चाळणीवर काढून गार होऊ द्यावे. गार झाल्यावर त्याच्या फोडी कराव्यात किंवा अख्खे ठेवायचे असतील तर सुरीने फक्त चिरा द्याव्यात. आता त्यात साखर, मीठ मिसळून डब्यात भरून ठेवावे.

 तीन दिवस आवळे तसेच मुरू द्यावे, फक्त अधूनमधून हलवावेत. चौथ्या दिवशी पातेल्यावर चाळण ठेवून त्यात आवळे ओतावेत.

 पूर्ण पाक खाली जमा झाला की ते आवळे थाळ्यात ठेवून उन्हात सहा सात दिवस वाळवावेत.

पातेल्यात जमा झालेला पाक गॅसवर ठेवून एकतारी होईल असा आटवावा, अर्धा चमचा वेलची पूड घालावी आणि गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरावा. आता हवं तेव्हा पाणी घालून सरबत करता येईल! घरगुती आवळा सरबत तयार!!!