कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

नवलकोलचा पळवा: कालनिर्णय पुरस्कार प्राप्त रेसिपी

अलकोलचा( नवलकोल) पळवा:
भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे.
साहित्य: 12/ 15 नवलकोलची पाने, दोन टीस्पून चिंच कोळ, दोन टीस्पून गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी ओलं खोबरं,कोथिंबीर
कृती: नवलकोलची पानं स्वच्छ करून पुसून घ्यावीत. त्याच्या मधल्या शिरा काढून घ्याव्या. चिंच पाण्यात भिजवून कोळ काढावा.  गूळ बारीक चिरून घ्यावा. तीन वाट्या पाणी घ्यावं. त्यात गूळ, मीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद घालावं. चव बघावी. आता भाजणी मिसळावी. पीठ पानावर पसरून लावता येईल इतपतच सैल करावे.
लागल्यास पाणी घालावे. नवलकोलचे पान उलट करावे. त्यावर पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवावे. अशी चार पाच पाने उलट सुलट ठेवून पीठ लावावे. समोरची बाजू आणि कडा आत दुमडून परत पीठ लावावे.
आता वडी घट्ट गुंडाळून घ्यावी.

मोदकाप्रमाणे 20 मिनीटं वाफ काढावी.
उंडे छोट्या चौकोनी फोडी करून चिरावे. कढईत तेल तापत ठेवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे तिखट घालून  त्यात चिरलेल्या नवलकोलवड्या घालाव्यात.
ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी. छान परतावं. तयार आहे नवलकोलचा पळवा!
मिनल सरदेशपांडे

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

स्ट्रॉबेरी सरबत

साहित्य: 

स्ट्रॉबेरी, साखर, मीठ, वेलची पावडर


कृती:
स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवा आणि तुकडे करा. ज्युसर जार मध्ये साखर, मीठ आणि थोडं पाणी घालून फिरवा. गाळून घ्या. आवश्यक त्यानुसार पाणी घाला, वेलची पावडर घालून गारेगार सर्व्ह करा.

मखाणे खीर

मखाणे खीर:
मखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या...असं मी ऐकलंय.. ह्या खूप पौष्टिक असतात.
साहित्य: मखाणे तीन वाट्या, दूध तीन ली, साखर पाऊण वाटी, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, बदाम काप, केशर काड्या, तूप
कृती: मखाणे चमचाभर  तुपावर परतून घ्या. त्यातले छोटे थोडे तसेच घालायला बाजूला ठेवा.  बाकीचे मिक्सरला फिरवून घ्या. कढईत दूध आटवत ठेवा. साखर आटवताना घाला. दोन लिटर झालं की त्यात मखाणे पावडर, अख्खे मखाणे, वेलची, दुधात खलून केशर, जायफळ सर्व घाला. उकळू द्या. बदाम काप आणि जे ड्रायफ्रूटस् हवे असतील ते घाला. चव बघून लागली तर साखर घाला. गार करून किंवा गरम आवडीप्रमाणे सर्व्ह करा.
✍🏻मिनल सरदेशपांडे

रविवार, २७ जानेवारी, २०१९

भाताच्या लाह्यांचे लाडू

भाताच्या लाह्यांचे लाडू:
बहिणीने घरच्या भाताच्या लाह्या करून पाठवल्या होत्या, त्या खूपच होत्या म्हणून त्याचं काहीतरी करून पहायचं ठरवलं!
साहित्य: लाह्या चार वाट्या, गूळ दीड वाटी, एक टीस्पून सुंठ पावडर, एक टीस्पून तूप
कृती: लाह्या सालं म्हणजे करल काढून निवडून घेतल्या. मऊ वाटल्या म्हणून थोड्या भाजून घेतल्या.  कढईत दीड वाटी गूळ, तूप घालून मंद गॅसवर विरघळू द्या. गूळ विरघळू लागला की त्यात सुंठ पावडर घाला. पूर्ण विरघळला की त्यात भाजलेल्या लाह्या घालून पटापट मिक्स करा. गॅस बंद करा. हाताला तूप लावून गरम असताना लाडू वळा. मस्त कुरकुरीत चुरमुऱ्या सारखे लाडू होतात.
टीप: एक वेळी दीड वाटी पेक्षा जास्त गुळाचे करू नका...पटापट गार होतं आणि लाडू वळले जात नाहीत.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

कोबीची वडी

कोबीची वडी:
साहित्य: कोबी बारीक करून दोन वाट्या, बेसन दोन वाट्या, रवा दोन चमचे, लाल तिखट एक टीस्पून, आलं लसूण पेस्ट एक टीस्पून, ओवा एक टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, तेल दोन टीस्पून, खायचा सोडा अर्धा टीस्पून, मीठ
फोडणीसाठी: तेल दोन टेबलस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, पांढरे तीळ दोन टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, खोबरं, कोथिंबीर
कृती: कोबी बारीक चिरा. एका पातेल्यात कोबी, बेसन, रवा, तिखट, मीठ, हळद, ओवा, आलं लसूण पेस्ट एकत्र करा. दोन टीस्पून तेल घाला.
कुकरमध्ये जाळी ठेवून, जाळी बुडेल एवढे पाणी घाला, गॅस लावून पाणी गरम होऊ द्या. तोपर्यंत तयार मिश्रणात पाणी घालून ढोकळ्या च्या पिठाएवढे सैल करा. थोडी कोथिंबीर चिरून घाला. एका डब्याला तेल लावून घ्या. मिश्रणात सोडा घालून ढवळा, तेल लावलेल्या डब्यात मिश्रण ओता आणि कुकरमध्ये डबा ठेवून शिट्टी न लावता  झाकण लावा. 15 मिनिटं वाफ येऊ द्या. सुरीचे टोक घालून चिकटत नाही ना ते पहा. गार होऊ द्या.
कढईत तेल तापवा. तीळ, मोहोरी, हळद घालून फोडणी करा. वड्या करून फोडणीत परता किंवा वड्यांवर वरून फोडणी द्या. खोबरं, कोथिंबीर घालून सजवा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

रविवार, २० जानेवारी, २०१९

मासवडी

मासवडी:
साहित्य: सारण: पाऊण वाटी खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी तीळ, पाव वाटी खसखस, दोन कांदे, पाव वाटी लसूण, कोथिंबीर चिरून अर्धी वाटी, तिखट एक चमचा, गरम मसाला एक चमचा, मीठ
बाहेरचं आवरण: एक वाटी बेसन पीठ, एक चमचा मैदा, दीड वाटी पाणी, अर्धा चमचा तिखट, मीठ, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, दोन चमचे तेल, जाड प्लास्टिक पिशवी
कृती: खोबरं, तीळ, खसखस वेगवेगळे भाजून घ्या. कांदा बारीक चिरा. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. कढईत एक चमचा तेल घालून त्यात कांदा आणि लसूण सोनेरी रंगावर परतून घ्या. खोबरं,  तीळ, खसखस मिक्सरला भरडसर वाटून घ्या. कांदा, लसूण मिक्सरला फिरवा. तीळ, खोबरं, खसखस आणि कांदा, लसूण वाटप एकत्र करा, त्यात थोडी कोथिंबीर, मीठ, तिखट, गरम मसाला सगळं घालून नीट मिक्स करा. याची चव सणसणीत हवी. हे सारण दोन वाटी बेसनाला पुरते.
आता एका भांड्यात एक वाटी बेसन, मैदा चमचाभर, तिखट,मीठ आणि दीड वाटी पाणी एकत्र करा. बेसनाची गुठळी मोडून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, ओवा, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात तयार पीठ घालून मंद गॅसवर ढवळत रहा. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढा. तेवढ्यात पिशवीच्या दोन बाजू कापून घ्या. एका बाजूवर कोथिंबीर पसरा. बेसनाला वाफ आली, घट्ट गोळा झाला की गॅस बंद करा. बेसन थोडं गार होऊ द्या. आता कोथिंबीर लावलेल्या भागावर तो गोळा ठेवा. पिशवीचा दुसरा भाग त्यावर ठेवून लाटण्याने पटापट लाटून घ्या.
पिशवीचा वरचा भाग बाजूला करा. लाटलेल्या बेसनावर सारण पसरा.
एका बाजूने पिशवी सोडवत गुंडाळून रोल करा.
सुरीने वड्या कापा.

मस्त साईड डिश तयार आहे! चव एकदम चमचमीत!
✍🏻 मिनल सरदेशपांडे

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

स्ट्रॉबेरी लोणचे

स्ट्रॉबेरी लोणचे:
आता तुम्ही म्हणाल स्ट्रॉबेरी नुसती खायची सोडून हे उद्योग कशाला? पण काही वेळा आंबट निघतात मग असं चविष्ट करायचं😊
साहित्य: दोन वाट्या स्ट्रॉबेरीचे तुकडे, पाव वाटी साखर, दीड टीस्पून लाल तिखट, मीठ, पाव टीस्पून मेथी, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, दोन टीस्पून तेल
कृती: स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून, पुसून आवडीप्रमाणे तुकडे करा.    कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, मेथी, हिंग हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा, गार होऊ द्या. स्ट्रॉबेरीच्या तुकड्यात साखर, मीठ आणि तिखट मिसळा, गार झालेली फोडणी मिसळून ठेवा. मेथांब्यासारखी चव येते.
हे लोणचं टिकाऊ नाही..लगेच वापरता येते.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

भोगीची भाजी

भोगीची भाजी:
या सीझनला येणाऱ्या सगळ्या भाज्यांचा यात समावेश असतो.
साहित्य: पावटा, मटार, हरभरे, मक्याचे दाणे सर्व मिळून एक वाटी, तीन छोटी वांगी, एक मध्यम बटाटा, एक छोटं गाजर, एक शेवग्याची शेंग, दीड चमचा चिंचेचा कोळ, दीड चमचा गूळ, मीठ, गोडा मसाला एक चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, खसखस एक चमचा, तीळ एक टेबलस्पून, दाण्याचं कूट एक चमचा, सुकं खोबरं एक टेबलस्पून,  मीठ, कांदा एक, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, पाणी, तेल एक टेबलस्पून, मोहोरी पाव चमचा, हळद पाव चमचा
कृती: सगळ्या शेंगा सोलून दाणे मीठ आणि थोडं पाणी घालून वाफवून घ्या. शेवग्याच्या शेंगेचे छोटे तुकडे करून मीठ आणि थोडं पाणी घालून तीही वाफवून घ्या. बटाटा, वांगी चिरून वेगवेगळी पाण्यात ठेवा. गाजर आवडीप्रमाणे तुकडे करा. कढई तापत ठेवून मंद गॅसवर खसखस, खोबरं, तीळ वेगवेगळे भाजा. शेंगदाणे भाजून घ्या. सर्व भाजलेले एकत्र वाटून घ्या. कढईत तेल तापवा.मोहोरी घाला. कांदा घालणार असाल तर  बारीक चिरून मोहोरी तडतडली की परता.  आता हळद घालून परता. बटाटा घालून परता आणि दोन मिनिटं झाकण ठेवा. दोन मिनिटांनी गाजर तुकडे, वांगी घालून परता आणि थोडे पाणी घालून झाकण ठेवा. पाच मिनिटांनी भाज्या शिजल्यावर त्यात वाफवलेले दाणे, शेवगा घाला. वाटलेलं वाटप, लाल तिखट, गूळ, चिंच, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला( ऐच्छिक), मीठ घाला. सैल हवे असेल तेवढे पाणी घालून उकळी काढा. चव बघून जे लागेल ते वाढवा. मस्त भाजी बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.

बुधवार, २ जानेवारी, २०१९

पालक/ मेथी/ कोथिंबीर मसाला देठी

पालक/ मेथी/ कोथिंबीर ची मसाला देठी: 
बऱ्याचदा वरची पानं घेऊन भाज्यांचे दांडे, देठ टाकून दिले जातात, त्याच देठांची ही चविष्ट भाजी!
साहित्य: दोन वाट्या वाफवलेले देठ, एक टेबलस्पून दाण्याचं कूट, एक टेबलस्पून ओलं खोबरं, एक टीस्पून गूळ, एक टीस्पून चिंचेचा कोळ, अर्धा टीस्पून गोडा मसाला, अर्धा टीस्पून  
लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, पाणी, दोन टीस्पून तेल, पाव टीस्पून जीरं, मोहोरी, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून हळद
कृती: पालकचे देठ कापून सोलून धुवून चिरा. मेथी, कोथिंबीर यापैकी जे उपलब्ध असतील ते कोवळे दांडे धुवून चिरा. सगळे एकत्र करून थोडं पाणी घालून वाफवून घ्या. थोडी चिंच भिजत घाला. कढईत तेल तापवा. मोहोरी, जीरं घाला, ते तडतडल्यावर हिंग, हळद, लाल तिखट घालून वाफवलेली देठी घालून परता. पातळ हवी असेल तेवढं पाणी घाला. दाण्याचं कूट, खोबरं, चिंचेचा कोळ, गूळ मीठ घालून उकळी काढा. कोथिंबीर घालून गरमागरम मसाला देठी पोळी, भातासोबत फस्त करा.