कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

भोगीची भाजी

भोगीची भाजी:
या सीझनला येणाऱ्या सगळ्या भाज्यांचा यात समावेश असतो.
साहित्य: पावटा, मटार, हरभरे, मक्याचे दाणे सर्व मिळून एक वाटी, तीन छोटी वांगी, एक मध्यम बटाटा, एक छोटं गाजर, एक शेवग्याची शेंग, दीड चमचा चिंचेचा कोळ, दीड चमचा गूळ, मीठ, गोडा मसाला एक चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, खसखस एक चमचा, तीळ एक टेबलस्पून, दाण्याचं कूट एक चमचा, सुकं खोबरं एक टेबलस्पून,  मीठ, कांदा एक, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, पाणी, तेल एक टेबलस्पून, मोहोरी पाव चमचा, हळद पाव चमचा
कृती: सगळ्या शेंगा सोलून दाणे मीठ आणि थोडं पाणी घालून वाफवून घ्या. शेवग्याच्या शेंगेचे छोटे तुकडे करून मीठ आणि थोडं पाणी घालून तीही वाफवून घ्या. बटाटा, वांगी चिरून वेगवेगळी पाण्यात ठेवा. गाजर आवडीप्रमाणे तुकडे करा. कढई तापत ठेवून मंद गॅसवर खसखस, खोबरं, तीळ वेगवेगळे भाजा. शेंगदाणे भाजून घ्या. सर्व भाजलेले एकत्र वाटून घ्या. कढईत तेल तापवा.मोहोरी घाला. कांदा घालणार असाल तर  बारीक चिरून मोहोरी तडतडली की परता.  आता हळद घालून परता. बटाटा घालून परता आणि दोन मिनिटं झाकण ठेवा. दोन मिनिटांनी गाजर तुकडे, वांगी घालून परता आणि थोडे पाणी घालून झाकण ठेवा. पाच मिनिटांनी भाज्या शिजल्यावर त्यात वाफवलेले दाणे, शेवगा घाला. वाटलेलं वाटप, लाल तिखट, गूळ, चिंच, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला( ऐच्छिक), मीठ घाला. सैल हवे असेल तेवढे पाणी घालून उकळी काढा. चव बघून जे लागेल ते वाढवा. मस्त भाजी बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.

६ टिप्पण्या: