कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० जून, २०१९

कुटणी: एक रानभाजी

कुटणी: एक रानभाजी


               लहानपण खेडेगावात गेल्यामुळे अनेक रानभाज्या खायला मिळाल्यात. आता रत्नागिरीत त्या विकत मिळतात पण रानात जाऊन काढून आणण्यात खरी मजा आहे! बाबा होते तोपर्यंत त्यांच्या पिशवीतून खजिना आणून द्यायचे मला दरवर्षी.. आता हे काम नवऱ्याला करावं लागतं...म्हणजे तो ते आनंदाने करतोही! पावसाळ्यात लाँग ड्राईव्हला जायला मला खूप आवडतं....आजूबाजूला मस्त हिरवागार निसर्ग आणि कोकणातला धो धो कोसळणारा पाऊस! यात अजून एक हेतू असतो कुटणीची पानं शोधून आणणे...दरवर्षी हे काम लागल्यामुळे नवऱ्याने कुंडीत एक वेल लावून टाकलीय😃 त्यामुळे आता हवी तेव्हा भाजी करू शकते! 
साहित्य: 10/12 कुटणीची पाने
पाव वाटी चिंचेचा कोळ
पाव वाटी गूळ
दीड चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
तीन वाट्या पाणी
दोन वाट्या थालिपीठ भाजणी
अर्धी वाटी तेल
अर्धा चमचा मोहोरी
पाव चमचा हिंग
पाव वाटी ओलं खोबरं
मीठ
कोथिंबीर
कृती: कुटणीची पानं धुवून पुसून घ्या.
त्याच्या शिरा काढून घ्या.
एका भांड्यात भाजणी घ्या.
त्यात तिखट मीठ चिंच गूळ घाला.
आपण तीन वाट्या पाणी घेतलंय त्यातलं लागेल तसं घाला.
पानावर लावता येईल असं मिश्रण व्हायला हवं
पान उलट करा.
त्याच्या मागच्या बाजूला पीठ लावा.
समोरच्या पानाच्या बाजू दुमडा, त्यावर पीठ लावा.
त्यावर परत एक पान ठेवा.त्यालाही असंच पीठ लावा.
अशी लहानमोठी पाच सहा पानं एकावर एक ठेवूंन पीठ लावा. दोन्ही बाजू दुमडा गुंडाळी करा.
तयार गुंडाळ्या चाळणीत ठेवून मोदकासारखे 20 मिनिटं वाफवून घ्या. गार झाल्यावर वडी चिरून घ्यावी.
कढईत तेल तापवावे.
त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
त्यात चिरलेल्या
वड्या घालून परता.
त्यावर खोबरं कोथिंबीर घाला.
भाजणीची कुटणी
वडी खमंग आणि पौष्टिक !

ही वेल पहिल्या एक दोन पावसात उगवते, लालसर रंगाची अळू इतकी नाही तरी बदामाच्या आकाराची मोठी पानं येतात. नुसती बारीक चिरून पीठ पेरून पण छान होते. वर चांगला अर्धा नारळ खवून खोबरं घातलं की नाश्ता म्हणून नुसती खाऊ शकता. ही वडी तळता पण येते.
✍🏻मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, २८ जून, २०१९

भोपळी मिरची भाजणी पेरून:

  • भोपळी मिरची भाजणी पेरून: 
  • साहित्य:


  •  अर्धा की भोपळी मिरची, 
  • 1 कांदा, 
  • अर्धा कप भाजणी, 
  • लाल तिखट अर्धा टीस्पून, 
  • मीठ, 
  • साखर अर्धा टीस्पून, 
  • तेल दोन टेबलस्पून,
  •  फोडणीचे साहित्य
  • कृती:
  •  भोपळी मिरची स्वच्छ धुवा आणि पुसून बिया काढून घ्या. 
  • बारीक चिरा. कांदा सोलून चिरून घ्या. 
  • कढईत तेल तापवा. मोहोरी, हळद, लाल तिखट घालून फोडणी करा. 
  • कांदा आणि भोपळी मिरची फोडणीत घालून परता. 
  • झाकण ठेवून पाच मिनिटं बारीक गॅसवर वाफ येऊ द्या. 
  • मिरची शिजली की त्यात मीठ , साखर घालून ढवळा. 
  • भाजणी पेरून  नीट ढवळा. परत एक वाफ काढा, चवीनुसार लागेल ते वाढवा. 
  • मस्त भाजी तयार आहे!
  • टीप: भाजणी ऐवजी बेसन पण वापरू शकता, पण भाजणी खमंग लागते.
  • पीठ तुम्हाला हवं तर थोडं आणखी घ्या, पण पीठ जास्त झालं तर भाजी कोरडी होते.
  • ओलं खोबरं, कोथिंबीर आवडीप्रमाणे घालू शकता.
  • भोपळी मिरची तिखट नसते त्यामुळे तिखट आणखी लागू शकते.

पडवळ वाटाणा भाजी:



  • पडवळ मुलांना फारसं आवडत नाही. पडवळ डाळिंबी, पडवळ चणाडाळ अशी एकत्र भाजी छान लागते. पडवळ, दुधी, दोडका या भाज्या करताना त्यात कसलं तरी कडधान्य, डाळी घातल्यामुळे त्यात प्रथिनंही वाढतात आणि चव वेगळी येते त्यामुळे मुलं पण आवडीने खातात.
  • साहित्य: 
  • पडवळ पाव की, 
  • 1/4 कप हिरवा किंवा पांढरा वाटाणा,
  •  तेल एक टेबलस्पून,
  •  मोहोरी 1/4 टीस्पून, 
  • हिंग 1/4 टीस्पून, 
  • हळद 1/4 टीस्पून, 
  • लाल तिखट 1/2 टीस्पून, 
  • ओलं खोबरं एक टेबलस्पून, 
  • गूळ 1 टीस्पून( ऐच्छिक), 
  • मीठ  
  • कृती:
  • रात्री वाटाणे गार पाण्यात भिजत घाला. 
  • सकाळी निवडून धुवा, अर्धा कप पाणी आणि पाव टीस्पून मीठ घालून शिजवून घ्या.
  • पडवळ धुवून चिरा, काचऱ्या करतो त्यापेक्षा थोडं जाड असुद्या, बिया कोवळ्या असतील तर भाजीत घाला किंवा त्याचा चटका छान होतो. 
  • तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करा.
  •  त्यात पडवळ घालून परता. 
  • अर्धा कप पाणी घालून मंद गॅसवर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्या. 
  • पाच मिनिटांनी शिजलं का बघून त्यात गूळ, मीठ, ओलं खोबरं घाला. 
  • लक्षात ठेवा वाटाण्यात मीठ घातलंय त्यामुळे पडवळा पुरतं मीठ घाला.
  •  उकळी येऊ द्या, शिजलेले वाटाणे घालून परत नीट ढवळून एक उकळी काढा. चव बघून जे लागेल ते वाढवा. 
  • टीप: काहींना गूळ आवडत नाही त्यानी तो वगळा, तिखट हवं असेल तर वाढवा.
  • कडधान्य शिजताना मीठ घातलं की ही मोठी कडधान्य नुसती चावताना त्याला चव लागते, नाहीतर रसाला चव लागते पण कडधान्य अळणी लागतं.
  • यात मोड आलेले मूग, मटकी, चवळी सुद्धा घालू शकता.

शनिवार, २२ जून, २०१९

गूळ नारळ पोहे:

गूळ नारळ पोहे: 


       आता मुलांना भूक लागली की मॅगी आठवते, आम्हाला मात्र पोहे आठवायचे. घरात असलेल्या पदार्थांपासून तयार होणारा आरोग्यदायी नाश्ता! 
        चार वाट्या जाड पोहे घ्या. दीड वाटी ताजं ओलं खोबरं घ्या. एक वाटी नारळ पाण्याचा पोह्यांवर हबका मारा. गूळ बारीक चिरून घ्या. पोह्यात ताजं ओलं खोबरं, चिमूटभर मीठ, दोन  टेबलस्पून गूळ  घालून पोहे नीट कालवून घ्या. थोडा वेळ दडपून ठेवा. उगीच तुम्हाला हवी तर वेलची पावडर भुरभुरवा. गूळ खोबऱ्याचा खमंगपणा येतो छान... आणि मधेच एखादा गुळाचा खडा आला की काय मस्त लागतं.. अहाहा!! यात खोबरं मात्र ताजंच हवं. नारळ पाणी नसेल तर दुधाचा हबका मारू शकता. पोहे चावून चावून खायला नको असतील पातळ पोहे घेऊ शकता. बघा कधीतरी असा नाश्ता करून!

बुधवार, १९ जून, २०१९

शेवगा आणि पालकची पातळ भाजी:

शेवगा आणि पालकची पातळ भाजी:



शेवग्याचा पाला अतिशय पौष्टिक असतो आणि या दिवसात त्याची भाजी मुद्दाम केली जाते.
थोडं वेगळं कॉम्बिनेशन केलंय!
साहित्य:
एक कप शिजलेला पालक, अर्धा कप शेवग्याची पानं, दोन टेबलस्पून डाळीचं पीठ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून सांडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, मीठ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, एक टेबलस्पून चणाडाळ, पाच सहा सुक्या मिरच्या, पाव टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाणी दीड लीटर, एक टेबलस्पून ओलं खोबरं, तेल एक टेबलस्पून

कृती: 
शेंगदाणे आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा.पालक निवडून धुवून घ्या. चिरून शिजवून घ्या. शेवग्याची पानं काढून शिजवून घ्या. गार होऊ द्या. भिजलेले शेंगदाणे आणि चणाडाळ शिजवून घ्या. पालक आणि शेवगा पानं मिक्सरला थोडं फिरवा. चिंचेचा कोळ काढून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. दोन सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवा. तेलात मोहोरी घाला. तडतडली की मेथी दाणे, लाल मिरच्या घाला. हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. आता फिरवून घेतलेला पालक आणि शेवगा पानं घालून परता. एक लिटर पाणी घ्या. त्यात डाळीचं पीठ नीट मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका. हे पाणी कढईत घाला. चवीनुसार मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घाला. सांडगी मिरची मिक्सरमधून बारीक करून ती घाला. गोडा मसाला घाला. उरलेलं पाणी अंदाज बघून घाला.  शिजलेले डाळ दाणे घाला. ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून लागेल ते वाढवा.  पातळ अळूसारखी मस्त लागते ही भाजी!
✍🏻मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ४ जून, २०१९

टॉमेटो रस्सम:


  • टॉमेटो रस्सम:
  • रस्सम पावडर:
  • साहित्य: पाच टेबलस्पून तूर डाळ, पाच टेबलस्पून चणाडाळ, पाच टीस्पून धने, दोन टीस्पून जीरं, दोन टीस्पून मिरी, सुक्या मिरच्या दहा बारा, काश्मिरी लाल तिखट 1 टीस्पून
  • कृती: डाळी, धने, जीरं, मिरी, मिरच्या सगळं वेगवेगळं भाजून घ्या. गार करून पावडर करा, शेवटी लाल तिखट घालून परत एकदा फिरवा.
  • डब्यात भरून ठेवा.



  • साहित्य:
  • 1/4 कप तुरडाळ, 
  • 4 टॉमेटो, 
  • रस्सम पावडर दोन टीस्पून, 
  • लाल तिखट 1 टीस्पून, 
  • कढीलिंबाची पानं 4/5,
  •  तेल 1 टेबलस्पून, 
  • 1 टीस्पून चिंचेचा कोळ, 
  • 1/2 टीस्पून हिंग पावडर
  • कृती:
  • दोन तीन वेळा स्वच्छ धुवून दुप्पट पाणी घालून तूरडाळ कूकरमध्ये शिजवून घ्या. 
  • टॉमेटो चार भाग करून शिजवून घ्या. 
  • गार होऊ द्या. 
  • मिक्सरमधून शिजलेले टॉमेटो फिरवून घ्या, फक्त लक्षात ठेवा अगदी बारीक व्हायला नको. 
  •  कढईत तेल तापवा. 
  • मोहोरी, हिंग घाला. 
  • लाल तिखट, रस्सम पावडर घालून मंद गॅसवर परता. 
  • कढीलिंबाची पानं घाला.
  •  आता फिरवलेला टॉमेटो, तूरडाळ घोटून फोडणीत घाला. 
  • दोन कप पाणी घाला.
  •  चिंचेचा कोळ घाला.
  •  चवीनुसार मीठ घाला. 
  • उकळी  येऊ द्या. 
  • चव बघून हवं असेल ते वाढवा. 
  • गरमागरम रस्सम भातासोबत सर्व्ह करा.
  • ✍🏻 मीनल सरदेशपांडे

चित्रान्न:

चित्रान्न:

  • साहित्य:
  • 250 ग्रॅम तांदूळ, 
  •  2 टेबलस्पून तेल, 
  • दोन कांदे अर्धे लांब चिरून( ऐच्छिक), 
  • पाच/ सहा कढीलिंबाची पानं,
  •  दोन टेबलस्पून शेंगदाणे, 
  • दोन टेबलस्पून काजूगर,
  •  1 टीस्पून उडीद डाळ, 
  • 1 टीस्पून चणाडाळ, 
  • सुक्या मिरच्या चार, 
  • अर्धा टीस्पून मोहोरी, 
  • अर्धा टीस्पून हळद,
  •  हिंग अर्धा टीस्पून, 
  • कैरीचा किस 2 टेबलस्पून, 
  • मीठ , 
  • पाणी
  • कृती
  • तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
  •  शेंगदाणे, काजूगर, चणाडाळ दहा मिनिटं गरम पाण्यात भिजत घालावे.
  •  कैरी किसून घ्यावी. 
  • सुक्या मिरच्या तुकडे करून घ्याव्यात. 
  • तांदुळात दुप्पट पाणी आणि एक टीस्पून मीठ घालून मोकळा शिजवून घ्यावा. 
  • कढईत तेल तापत ठेवावे. 
  • त्यात मोहोरी घाला.
  •  मोहोरी तडतडली की उडीद डाळ घालून थोडी परता. 
  • आता त्यात सुक्या मिरच्या घाला, दोन मिनिटं परतून कांदा घाला. 
  • तो परतला की चणाडाळ, शेंगदाणे, काजूगर एका पाठोपाठ एक परतून घ्या. 
  • कढीलिंबाची पानं  परता. 
  • आता त्यात हळद, हिंग घालुन परता. 
  • किसलेली कैरी घालून परता. 
  • या सगळ्यात अर्धा टीस्पून मीठ घालून तयार भात एकत्र करा. 
  • सगळं नीट मिक्स करून चव बघा. 
  • एक वाफ येऊ द्या. 
  • कोथिंबीर बारीक चिरून  भातावर घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • ✍🏻मीनल सरदेशपांडे