कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० जून, २०१९

कुटणी: एक रानभाजी

कुटणी: एक रानभाजी


               लहानपण खेडेगावात गेल्यामुळे अनेक रानभाज्या खायला मिळाल्यात. आता रत्नागिरीत त्या विकत मिळतात पण रानात जाऊन काढून आणण्यात खरी मजा आहे! बाबा होते तोपर्यंत त्यांच्या पिशवीतून खजिना आणून द्यायचे मला दरवर्षी.. आता हे काम नवऱ्याला करावं लागतं...म्हणजे तो ते आनंदाने करतोही! पावसाळ्यात लाँग ड्राईव्हला जायला मला खूप आवडतं....आजूबाजूला मस्त हिरवागार निसर्ग आणि कोकणातला धो धो कोसळणारा पाऊस! यात अजून एक हेतू असतो कुटणीची पानं शोधून आणणे...दरवर्षी हे काम लागल्यामुळे नवऱ्याने कुंडीत एक वेल लावून टाकलीय😃 त्यामुळे आता हवी तेव्हा भाजी करू शकते! 
साहित्य: 10/12 कुटणीची पाने
पाव वाटी चिंचेचा कोळ
पाव वाटी गूळ
दीड चमचा लाल तिखट
पाव चमचा हळद
तीन वाट्या पाणी
दोन वाट्या थालिपीठ भाजणी
अर्धी वाटी तेल
अर्धा चमचा मोहोरी
पाव चमचा हिंग
पाव वाटी ओलं खोबरं
मीठ
कोथिंबीर
कृती: कुटणीची पानं धुवून पुसून घ्या.
त्याच्या शिरा काढून घ्या.
एका भांड्यात भाजणी घ्या.
त्यात तिखट मीठ चिंच गूळ घाला.
आपण तीन वाट्या पाणी घेतलंय त्यातलं लागेल तसं घाला.
पानावर लावता येईल असं मिश्रण व्हायला हवं
पान उलट करा.
त्याच्या मागच्या बाजूला पीठ लावा.
समोरच्या पानाच्या बाजू दुमडा, त्यावर पीठ लावा.
त्यावर परत एक पान ठेवा.त्यालाही असंच पीठ लावा.
अशी लहानमोठी पाच सहा पानं एकावर एक ठेवूंन पीठ लावा. दोन्ही बाजू दुमडा गुंडाळी करा.
तयार गुंडाळ्या चाळणीत ठेवून मोदकासारखे 20 मिनिटं वाफवून घ्या. गार झाल्यावर वडी चिरून घ्यावी.
कढईत तेल तापवावे.
त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
त्यात चिरलेल्या
वड्या घालून परता.
त्यावर खोबरं कोथिंबीर घाला.
भाजणीची कुटणी
वडी खमंग आणि पौष्टिक !

ही वेल पहिल्या एक दोन पावसात उगवते, लालसर रंगाची अळू इतकी नाही तरी बदामाच्या आकाराची मोठी पानं येतात. नुसती बारीक चिरून पीठ पेरून पण छान होते. वर चांगला अर्धा नारळ खवून खोबरं घातलं की नाश्ता म्हणून नुसती खाऊ शकता. ही वडी तळता पण येते.
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा