कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १९ जून, २०१९

शेवगा आणि पालकची पातळ भाजी:

शेवगा आणि पालकची पातळ भाजी:



शेवग्याचा पाला अतिशय पौष्टिक असतो आणि या दिवसात त्याची भाजी मुद्दाम केली जाते.
थोडं वेगळं कॉम्बिनेशन केलंय!
साहित्य:
एक कप शिजलेला पालक, अर्धा कप शेवग्याची पानं, दोन टेबलस्पून डाळीचं पीठ, एक टीस्पून गोडा मसाला, एक टीस्पून सांडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ, एक टेबलस्पून गूळ, मीठ, दोन टेबलस्पून शेंगदाणे, एक टेबलस्पून चणाडाळ, पाच सहा सुक्या मिरच्या, पाव टीस्पून मेथी दाणे, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाणी दीड लीटर, एक टेबलस्पून ओलं खोबरं, तेल एक टेबलस्पून

कृती: 
शेंगदाणे आणि चणाडाळ तीन तास भिजत ठेवा.पालक निवडून धुवून घ्या. चिरून शिजवून घ्या. शेवग्याची पानं काढून शिजवून घ्या. गार होऊ द्या. भिजलेले शेंगदाणे आणि चणाडाळ शिजवून घ्या. पालक आणि शेवगा पानं मिक्सरला थोडं फिरवा. चिंचेचा कोळ काढून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. दोन सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवा. तेलात मोहोरी घाला. तडतडली की मेथी दाणे, लाल मिरच्या घाला. हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. आता फिरवून घेतलेला पालक आणि शेवगा पानं घालून परता. एक लिटर पाणी घ्या. त्यात डाळीचं पीठ नीट मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका. हे पाणी कढईत घाला. चवीनुसार मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घाला. सांडगी मिरची मिक्सरमधून बारीक करून ती घाला. गोडा मसाला घाला. उरलेलं पाणी अंदाज बघून घाला.  शिजलेले डाळ दाणे घाला. ओलं खोबरं घालून उकळी काढा. चव बघून लागेल ते वाढवा.  पातळ अळूसारखी मस्त लागते ही भाजी!
✍🏻मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा