गार्लिक आंबोळी:
नमस्कार मंडळी😊
आहे त्यातच थोडासा बदल केला तरी छान वेगळी चव येते.
आंबोळी चटणी किंवा काळा वाटाणा उसळ हा न्याहारीचा बेत असतोच. हल्ली तर मिसळ आंबोळी पण मिळते इकडे.
पण माझ्या सारख्या आळशी बाईला चटणी पण करायची नसते मग असे पर्याय शोधते.
मी नेहमी आंबोळी पीठ कोरडे
दळून ठेवते. तुम्ही आयत्या वेळी पण डाळ तांदूळ भिजवून करू शकता.
साहित्य: आंबोळी पीठ चार वाट्या, दहा बारा लसूण पाकळ्या, सोसतील तेवढ्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, थोडे ताक आणि पाणी, तेल
कृती: करायला घेताना तयार आंबोळी पिठात एक वाटी ताक आणि बाकी लागेल तसं पाणी घाला. मिरची आणि लसूण भरड वाटून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
पिठात ही लसूण मिरची, कोथिंबीर आणि दोन चमचे तेल आणि मीठ घालून पीठ भिजवा.
अगदी लगेच आंबोळी करायला घेता येते.
बिडाच्या तव्यावर तेल सोडून आंबोळी घालून दोन्ही बाजू छान भाजून घ्या. अजून प्रोटीन रीच वगैरे हवं तर दुसरी बाजू भाजून झाल्यावर त्यावर पनीर किसून घाला. पनीर घातलं तर त्यावर तिखट मीठ किंवा चाट मसाला भुरभुरावा.
टीप: मला बारा पंधरा जणांना करताना प्रत्येक आंबोळीला वरून सेपरेट
लसूण मिरची घालून भाजणे शक्य नाही पण थोड्या प्रमाणात असेल तर तव्यावर आधी तेलावर ते थोडं पसरून त्यावर आंबोळी घालू शकता.
यात मी कोथिंबीर घातली तिथे मेथी, दोन पानी मेथी पण छान लागते.
या सिझनला लसूण पात पण मिळते मोठ्या शहरात ती पण घालता येईल मग वेगळी लसूण लागणार नाही.
गार्लिक ब्रेड पेक्षा पौष्टिक होईल.
मी पुडी चटणी आणि लोण्या बरोबर खाल्ली.
बऱ्याचदा तयार पीठ भिजवताना अंदाज कसा घ्यावा कळत नाही त्यासाठी साधारण मध्यम वाटी सुकं पीठ असेल तर त्यात तीन आंबोळ्या होतात. असं माणशी मोजून घ्यायचं.
माझ्याकडे खोल डाव आहे त्याने मोजून घेते म्हणजे परफेक्ट होतं प्रमाण.
✍️मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा