कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० जानेवारी, २०२४

लाल भोपळ्याची कोफ्ता करी

 लाल भोपळ्याची कोफ्ता करी:



 मंडळी काहीही आहे हे असं म्हणून पुढे जाऊ नका खरंच छान झाली होती, खूप आवडली सगळ्यांना!


साहित्य: 1 कप लाल भोपळ्याचा कीस, पाव कप मुगडाळ, आलं, लसूण,  एक कप कांदा पात किंवा कोथिंबीर, मीठ, एक टेबलस्पून बेसन किंवा कॉर्न फ्लोअर, एक टीस्पून लाल तिखट, थोडीशी हळद, तेल तळणीसाठी


करी साठी:  अर्धा टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून जीरं पावडर, अर्धा कप सुकं खोबरं, 1 टेबलस्पून तीळ, सात आठ काजू, सात आठ लसूण पाकळ्या, 1 टीस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून दही, चार कांदे, अर्धा कप कांदा पात,  आलं एक तुकडा, काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून, दोन टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जीरं, मीठ, अर्धा टीस्पून आमचुर पावडर, चिमूटभर साखर.


कृती: मुगडाळ चार तास तरी भिजत ठेवा. भोपळा किसून घ्या. भिजलेली मुगडाळ त्यात सात आठ पाकळ्या लसूण, आल्याचा तुकडा घालून भरड वाटून घ्या. भोपळ्याचा कीस, वाटलेलं मिश्रण, मीठ, तिखट आणि कांदा पात किंवा कोथिंबीर, हळद आणि बेसन घालून पीठ तयार करा, थोडं सैल असुदे.


याचे छोटे कोफ्ते तळून बाजूला ठेवा.


करी: आधी खोबरं, तीळ, काजू, आलं लसूण नुसतं किंचित तेलावर भाजून बाजूला ठेवा. आता कढईत तेल घाला, त्यात जीरं घालून ते तडतडल्यावर कांदा आणि कांदा पात घालून परतत रहा. त्यात काश्मिरी लाल तिखट आणि थोडं मीठ घाला. तेलावर भाजलेले जिन्नस दही घालून वाटून घ्या, ते परतलेल्या कांद्यावर घालून तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. परतताना धने जीरं पावडर, तिखट घाला. तेल सुटलं की मीठ, आमचुर आणि साखर ( ऐच्छिक) घाला. तुम्हाला ग्रेव्ही हवी  दाट पातळ तसं पाणी घाला. 

आता चव बघा लागलं तर तिखट, मीठ वाढवा. जेवायच्या आधी दोन मिनिटं ग्रेव्हीत कोफ्ते सोडून एक उकळी काढा.

मस्त होते😊 यात आपण बेसन अगदी नावाला वापरलं आणि भिजलेली डाळ घातलीय.

टीप: तुम्ही टॉमेटो आणत असाल तर दह्या ऐवजी टॉमेटो वापरा. मला तरी दही आवडतं. सांगूनही कोणाला त्यात लाल भोपळा आहे हे कळत नाही. 

कोफ्ते आधी पासून घातले तर ग्रेव्ही शोषून घेतात म्हणून आयत्यावेळी मिक्स करा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा