मसाला पडवळ :
यात कुठलाही मसाला नाहीये उगाच आपलं नाव दिलं.
पडवळ डाळिंब्या, चणाडाळ पडवळ, पांढरा वाटाणा पडवळ, नुसत्या काचऱ्या हे प्रकार असतातच.
भरलं पडवळ मस्त लागतं पण वेळ नसेल तर हा सोपा पर्याय... बघा करून!
साहित्य: पडवळ अर्धा किलो, कांदे दोन, ओलं खोबरं दोन टेबलस्पून, दाण्याचं कूट दोन टेबलस्पून, तीळ एक टेबलस्पून, कोथिंबीर दोन टेबलस्पून, आमचूर एक टीस्पून, बेसन दोन टेबलस्पून, मीठ, तिखट, साखर
फोडणीचे साहित्य
कृती: पडवळ धुवून काचऱ्या करून घ्या. कांदे अर्धे लांब चिरा.
एका भांड्यात खोबरं, कोथिंबीर, तीळ, दाण्याचं कूट, बेसन, तिखट, मीठ, साखर, आमचूर हा सगळा मसाला एकत्र करा. यात जे तिखट मीठ येईल ते या मसाल्याला व्यवस्थित चव येईल एवढच असुदे.
आता कढई तापत ठेवा. त्यात नेहमीपेक्षा किंचित जास्त तेल घाला. मोहोरी घालून ती तडतडली की कांदा घालून एक मिनिट परता. आता त्यात पडवळ घालून परता.
झाकण ठेवून गोळा शिजवायचे नाही. फक्त परतून परतून किंचित मऊ होऊ द्या. आता त्यात हळद, हिंग, पडवळ
आहे त्याप्रमाणे मीठ तिखट घाला. मसाल्यात वेगळं आहे. पडवळ किती परतलं तो फोटो शेअर केलाय.
आता तयार मसाला भाजी अलगद मिक्स करा. आणि झाकण ठेवून दोन मिनिटं छान वाफ येऊ दे.
बेसन शिजायला हवं.
चव बघून काही हवं तर वाढवा.
टीप: बेसन न घेता भाजणी घेऊ शकता.
यात पाणी अजिबात वापरायचं नाही. छान येते चव.
मी तीळ आणल्यावर भाजून ठेवते त्यामुळे डायरेक्ट मिक्स केलेत.
कांदा घालावा का आणि किती हे ऐच्छिक आहे.
✍️मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा