कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २० जानेवारी, २०२४

फ्रेश स्ट्रॉबेरी प्लम केक

 एगलेस फ्रेश स्ट्रॉबेरी प्लम केक:

 काल लेकासाठी त्याच्या आवडीचा प्लम केक केला. पुण्याहून येताना स्ट्रॉबेरी घेतली होती म्हणून तीच वापरली.


साहित्य: दहा बारा स्ट्रॉबेरी, एक कप मिक्स ड्राय फ्रुट्स, (यात बदाम, काजूगर, मनुका, बेदाणे, चेरी,  जरदाळू, किंवा थोडी टूटी फ्रूटी घेऊ शकता.)

दोन कप मैदा, एक टीस्पून बेकिंग पावडर, एक टीस्पून


खायचा सोडा, दोन टीस्पून लिंबू रस, अर्धा कप दही, १०० ग्रॅम बटर  किंवा  तेल, दीड कप पिठी साखर, दोन टीस्पून व्हॅनिला इसेन्स


कृती: दहा बारा स्ट्रॉबेरी अर्धा कप पाणी घालून बारीक करून घ्या. या तयार ज्युसमध्ये ड्राय फ्रूटस भिजवून ठेवा कमीतकमी चार तास.

केक करायला घेताना आधी ओव्हन १८० डिग्री ला पाच मिनिटं प्रिहिट करा.

एका भांड्यात दही, पिठीसाखर आणि बटर किंवा तेल एकत्र करून फेटा. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. आता मैदा, बेकिंग पावडर आणि सोडा चाळून यात मिसळा, परत एकदा मिश्रण नीट एकत्र करा. 

आता त्यात भिजवलेली ड्राय फ्रुटस ज्यूस सह मिक्स करा. आता मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर थोडं दूध घाला.

केक टिन तेल लावून गोल बटर पेपर खाली ठेवून आणि कडाना तेल लावून तयार करा. 

आता त्या मिश्रणात लिंबू रस किंवा व्हिनेगर घालून पटापट ढवळा आणि केक टिन मध्ये मिश्रण ओतून बेक करायला ठेवा.

किमान ४५ मिनिटं बघू नका. 

त्यानंतर बघून लागलं तर परत दहा मिनिटं ठेवा.

ओव्हन बंद केल्यावर थोडा वेळ केक असुदे त्यात मग काढून गार करा.


टीप: कढईत करताना, खाली मीठ पसरून त्यावर स्टँड ठेवून झाकण ठेवून पाच मिनिटं मोठ्या गॅसवर तापवा. मग केक टिन ठेवून मध्यम गॅसवर पंधरा मिनिटं आणि अर्धा तास मंद गॅसवर भाजा. 

चेक करून लागलं तर आणखी ठेवा.

मला एक तास लागला.

हा घरच्या साहित्यात केलेला अगदी बेसिक प्लम केक आहे.


यात मी स्ट्रॉबेरी ज्यूस वापरलाय पण कोणताही ज्यूस घेता येईल. 

यात स्ट्रॉबेरी नसेल तर कॉफी पावडर पण चार चमचे चांगली लागते.

✍️ मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा